सप, काँग्रेस आणि शिवसेनेच्याही मतांवर मुस्लिम विभाजनाचा परिणाम होणार

पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकांमध्ये जी करामत मनसेने केली होती, त्या ठिकाणी या वेळी असादुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष उभा आहे. मुस्लीम, दलित अजेंडा घेऊन आलेल्या या पक्षामुळे सपा व काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता तर आहेच, पण कुर्ला, वडाळा, गोवंडी तसेच शहरामधील इतर गरीब वस्त्यांमध्ये जम बसवलेल्या सेनेला मुस्लीम मतांच्या विभाजनाचा थोडाफार फायदा होऊ शकतो.

नावापुरती उरलेली राष्ट्रवादी आणि अंतर्गत विरोधामुळे अवकळा आलेली काँग्रेस यामुळे सेना-भाजप युतीला विरोधी पक्षच राहिला नव्हता. ती कमतरता सत्ताधाऱ्यांनी एकमेकांच्या विरोधात उभी राहून भरून काढली. मात्र मुंबईची निवडणूक केवळ या दोघांभोवती फिरण्याची शक्यता नाही. याला कारण आहे मुंबईतील सुमारे १५ टक्के मुस्लीम लोकसंख्या आणि मतदानासाठी बाहेर पडण्याचे त्यांचे प्रमाण. कडव्या िहदुत्वाचा प्रचार करणाऱ्या सेना-भाजपविरोधातील मतांचा हैदराबादहून आलेल्या ओवेसींच्या ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहदुल मुस्लिमीन अर्थात आयएमआयएमला फायदा होऊ शकतो.

एमआयएमने आतापर्यंत पालिका निवडणुकीसाठी दोन टप्प्यांमध्ये ३४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यातील चार उमेदवार वगळता इतर मुस्लीम आहेत. या उमेदवारांपकी १२ पश्चिम उपनगरांमधून, १५ पूर्व उपनगरांमधून तर सात दक्षिण भागातील आहेत. समाजवादी पार्टीचा जम बसलेल्या गोवंडीमध्ये एमआयएमने फक्त दोनच उमेदवार घोषित केले आहेत. मात्र आणखी १५ ते २० उमेदवारांची यादी जाहीर होणे बाकी असून त्यात गोवंडीसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा होईल, असे पक्षाचे भायखळा येथील आमदार वारिस पठाण यांनी सांगितले. आमच्या विरोधातील मते विभाजित होऊ शकतात, त्याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही. विकासाच्या मुद्दय़ावर लोकांकडून मिळणाऱ्या सकारात्मक मतांचा आम्ही विचार करत आहोत. आम्ही मुस्लिमांसाठी नाही तर समाजाच्या प्रवाहापासून दूर राहिलेल्या लोकांसाठी काम करू इच्छितो आणि म्हणूनच आमच्या यादीत चार गरमुस्लीम दलित उमेदवारही आहेत, असे पठाण म्हणाले. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि अखिल भारतीय सेनेमध्ये मतविभाजन होऊन एमआयएमचे वारिस पठाण अवघ्या १,३५७ मतांच्या फरकाने निवडणूक जिंकले होते.

एमआयएम हा केवळ विभाजनावर लक्ष देणारा पक्ष आहे. एमआयएमच्या दोन्ही आमदारांनी गेल्या अडीच वर्षांत विधानसभेत कोणतीही कामगिरी बजावलेली नाही. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर मुंबईतही काँग्रेस व सपाची युती करण्याबाबत विचार होता. मात्र काँग्रेसकडून कोणतेही उत्तर अद्याप आलेले नसल्याने युती होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे, असे सपाचे नेता रईस शेख यांनी सांगितले. सपाने पहिली २४ उमेदवारांची यादी जाहीर केली असून आणखी ३० ते ३५ उमेदवारांची नावे घोषित केली जाणार आहेत. काँग्रेसच्या नगरसेविका आणि स्थायी समितीतील सदस्या वकारुन्निसा अन्सारी आणि अल्पसंख्याक गटाचे प्रमुख निझामुद्दीन रयीन यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला आहे. अंतर्गत वाद व कुरघोडींनी जेरीस आलेल्या काँग्रेसने मुस्लीम मते टिकवून ठेवण्यासाठी मुस्लीमबहुल भागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मुस्लीम उमेदवारांना प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. सपा आणि काँग्रेसकडे जाणाऱ्या मुस्लीम मतांना एमआयएमची झळ पोहोचण्याची शक्यता आहे.

शिवडी, वडाळा, कुर्ला, धारावी, गोवंडी, मानखुर्द, शिवाजी नगर, वांद्रे पूर्व, जोगेश्वरी, भायखळा, उमरखाडी या ठिकाणी मुस्लीमबहुल वस्ती आहे. या ठिकाणी आतापर्यंत काँग्रेस आणि सपासोबत शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्याही लक्षणीय आहे. एकटय़ा कुल्र्यात दहापकी चार नगरसेवक सेनेचे तर एक मनसेचा आहे. सेनेचे कार्यकत्रे तळागाळात काम करत असतात. स्थानिक पातळीवर उमेदवारांचे काम पाहून मते दिली जात असल्याने वर्षांनुवष्रे सेनेचा या विभागात जम आहे, असे सेनेच्या एका नेत्याने सांगितले. जोगेश्वरी, कुर्ला, गोवंडी या ठिकाणीही काँग्रेस व सपाला शिवसेनेच्या उमेदवारांशी लढत द्यावी लागते. सेना-भाजप युती तुटल्यामुळे गोवंडीत सपाला फायदा होणार असल्याचे रईस शेख यांचे म्हणणे आहे. या भागात सेनेच्या उमेदवारांना लढत द्यावी लागते. मात्र आता होत असलेल्या मतविभाजनामुळे सपाला फायदा होईल, असा त्यांचा अंदाज आहे. गेल्या निवडणुकीत सेनेला यापकी काही ठिकाणी मनसेचा फटका बसला होता. या वेळी मनसेचा प्रभाव क्षीण झाला असला तरी भाजपसोबतची युती तुटल्याने सेनेला काही मते गमवावी लागतील. राष्ट्रवादीचाही प्रभाव कमी झाला आहे. काँग्रेस, सपा व एमआयएममध्येही मतविभाजन होण्याचीही शक्यता आहे.

एमआयएमचा पालिका निवडणुकांचा प्रवास

* दोन टप्प्यांत जाहीर केलेल्या ३४ उमेदवारांपकी ३० मुस्लीम

* मुस्लीमबहुल परिसर असलेल्या गोवंडीत आतापर्यंत केवळ दोनच उमेदवार जाहीर

* कुर्ला येथे सात उमेदवार जाहीर

* मुस्लीम मते एकवटण्यासाठी नाही तर विकासाच्या मुद्दय़ावर लढण्याची एमआयएमची घोषणा.

* काँग्रेसचे अल्पसंख्य गट प्रमुख तसेच नगरसेविका एमआयएममध्ये.

* एमआयएमचे उमेदवार उभे राहिलेल्या ३४ वॉर्डपकी १० ठिकाणी काँग्रेस, सात वर शिवसेना, प्रत्येकी सहावर राष्ट्रवादी व सपा तसेच उर्वरित जागांवर अपक्ष निवडून आले होते.

* एमआयएमने उमेदवारी दिलेल्या मालाड, वर्सोवा, सांताक्रूझ या भागांत सेना किंवा काँग्रेसचे नगरसेवक जिंकले असले तरी या परिसरात सरासरी २० ते २५ उमेदवार उभे राहिले होते व त्यातील ८० टक्के उमेदवार मुस्लीम होते.

* विभाजित होणारी मुस्लीम मते एकगठ्ठा झाल्यास एमआयएमला काही यश मिळू शकेल.

* पश्चिम उपनगरात कांदिवलीतील गणेश नगर, मालाड पूर्व येथील शांताराम तलाव, दिंडोशी, पश्चिमेकडे मढ, मालवणी, अंधेरीतील गावदेवी डोंगरी, हनुमान टेकडी, बेहराम बाग, सांताक्रूझ येथील गोळीबार नगर, वांद्रे येथील भारत नगर आणि गरीब नगर येथे एमआयएमने उमेदवार जाहीर केले आहेत.

* पूर्व उपनगरात कुर्ला, शिवाजी नगर, धारावी, हनुमान नगर येथून उमेदवार उभे.

* दक्षिण भागात भायखळा, झवेरी बाजार, बीपीटी कॉलनी, कामाठीपुरा, उमरखाडी येथे उमेदवारी.

*भायखळ्यात आमदार निवडून आल्याने अखिल भारतीय सेनेच्या वंदना गवळी व गीता गवळी यांच्या परिसरात एमआयएमने उमेदवार जाहीर केले आहेत.