सर्वच पक्षांकरिता प्रतिष्ठेची बनलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. समाजमाध्यमांतूनही परस्परांवर जोरदार हल्ले केले जात आहेत. अशा परिस्थितीत या निवडणुका निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडणे हे राज्य निवडणूक आयोगासमोरील मोठे आव्हान आहे. निवडणूक आयोगानेही यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखले जावे यासाठी अनेक उपाययोजना करत नवनवीन उपक्रमही हाती घेतले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने निवडणुका मोकळ्या व भयमुक्त वातावरणात पार पाडण्याकरिता आयोगाने कंबर कसली आहे. एकूणच सार्वत्रिक निवडणुकीच्या या आव्हानाचा निवडणूक आयोग कसा मुकाबला करणार आहे याबाबत राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांच्याशी केलेली ही बातचीत.

राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत असून दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार निवडणुकीत उभे राहत आहेत. त्याला कसा पायबंद घालणार?

गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे मतदारांवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी आयोगाने खबरदारी घेतली आहे. यंदा प्रथमच आपला उमेदवार कसा आहे, याची माहिती आयोगाच्या माध्यमातून मतदारांना दिली जाणार आहे. त्यासाठी मतदान केंद्राच्या बाहेर आपल्या विभागातील उमेदवार कसे आहेत, त्यांच्या गुन्हेगारी पाश्र्वभूमीबद्दलची सर्व माहिती मोठय़ा फलकावर प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच मतदानाच्या दिवशी स्थानिक वृत्तपत्रांमधूनही ही माहिती प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे मतदारांना सुयोग्य उमेदवाराची निवड करण्यास मदत होईल.

निवडणुकीतील अनुचित प्रकार टाळण्यासाठी..

या निवडणुकीत सर्वसामान्यांनाही निवडणूक आणि प्रचारावर नजर ठेवता यावी यासाठी आयोगाने कॉप (सिटिझन ऑन पेट्रोल) हे अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून आचारसंहिता भंगाच्या तक्रारी अत्यंत सुलभ पद्धतीने करता येतात. प्रचारादरम्यान काही गैरप्रकार आढळल्यास छायाचित्रासह तो अ‍ॅपच्या माध्यमातून तात्काळ निवडणूक यंत्रणेपर्यंत पोहोचविता येईल. तसेच निवडणुकीदरम्यान कोणचाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कुख्यात गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांचा बंदोबस्त करणे, अवैध शस्त्रे जप्त करणे, भरारी पथकाच्या माध्यमातून प्रचार, निवडणुकीवर लक्ष ठेवण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले असून त्यांनीही चोख तयारी केली आहे. बँका आणि आयकर विभागाच्या माध्यमातून प्रचारादरम्यान होणाऱ्या रोख रकमेच्या व्यवहारावरही लक्ष ठेवण्यात येत आहे.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आयोगाने काय उपाययोजना केल्या आहेत?

– शहरी भागातील कमी मतदानाची टक्केवारी ही सर्वाच्याच दृष्टीने चिंताजनक बाब आहे. सर्वत्र विशेषत: मुंबई, ठाणे, उल्हासनगर अशा भागांतील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आयोगाने यंदा महाविद्यालये, विद्यापीठ, गृहनिर्माण संस्थांची मदत घेतली असून सर्वानी चांगले सहकार्य केले आहे. जाहिराती, पथनाटय़ाच्या माध्यमातून मतदार जागृती केली जात आहे. यंदा चित्ररथाच्या माध्यमातूनही मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले जात आहे. मतदानाच्या दिवशी मतदारांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आयोगामार्फत मतदान चिठ्ठी घरपोच वाटली जाणार आहे. तसेच मतदारांच्या सोईसाठी ‘टू व्होटर’ हे मोबाइल अ‍ॅपही आयोगाने विकसित केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून मतदारांना आपले नाव व मतदान केंद्र शोधता येईल. तसेच गुगल मॅपच्या माध्यमातून मतदान केंद्र शोधता येईल. उमेदवारांनी शपथपत्राद्वारे भरलेली माहिती पाहता येईल. उमेदवारांनाही या अ‍ॅपच्या माध्यमातून निवडणूक खर्च जमा करण्यास सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वृद्ध मतदारांना उमेदवाराचे नाव वाचण्यास त्रास होऊ नये, त्यांना उमेदवाराचे नाव स्पष्ट दिसावे यासाठी प्रथमच नावाचा आकार १६ पॉइंटवरून २४ पर्यंत वाढविण्यात आला आहे. तसेच मतदान वाढावे यासाठी राजकीय पक्षांनीही खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे.

गडचिरोलीसारख्या नक्षलवादी भागात निवडणुका उधळून लावण्याची धमकी नक्षलवाद्यांनी दिली आहे. त्यामुळे मतदारांमध्ये भीतीचे वातावरण असून याचा मुकाबला आयोग कसा करणार?

– नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्य़ात निर्भयपणे निवडणूक पार पडावी यासाठी आयोगाने विशेष खबरदारी घेतली आहे.  सुरक्षा यंत्रणांवर ताण पडू नये यासाठी दोन टप्प्यांत या जिल्ह्य़ांत निवडणुका घेण्यात आल्या आहेत. लोकांमध्ये भीतीचे वातावरण अजिबात नाही. काही महिन्यांपूर्वीच या भागात नगरपालिका निवडणूक झाली तेव्हा ७० टक्क्यांहून अधिक मतदान झाले. या वेळीही चांगले मतदान होईल अशी अपेक्षा आहे. सुरक्षा यंत्रणा सज्ज असून राज्यात आणि गडचिरोलीतही मतदान शांततेत पार पडेल असा विश्वास आहे.

मुलाखत : संजय बापट