मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ठाणे महापालिका निवडणुकीत एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यात सध्या शिवसेनेची सत्ता आहे. त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आघाडी केली आहे. काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या चर्चेसाठी नारायण राणे यांच्या निवासस्थानी आज महत्त्वाची बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. आघाडीसंबंधी बराच वेळ चर्चा झाली. त्यानंतर आघाडीसाठी सकारात्मक असल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. ठाण्यासह कळवा, मुंब्रा परिसरात राष्ट्रवादीचे वर्चस्व असले तरी, तेथील काही जागा काँग्रेसला देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने दाखवल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. आता दोन्ही पक्षांकडून उमेदवारांची यादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पाठवण्यात येणार असून, आघाडीसंबंधी अंतिम निर्णय ते घेणार आहेत, असे कळते.

विशेष म्हणजे, मुंबई महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीत आघाडी झाली नसली तरी, ठाणे महापालिकेसाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची आघाडी व्हावी, अशी मानसिकता आहे. महापालिका निवडणुका जाहीर होण्याआधीपासून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना गळती लागली असून शिवसेना-भाजपने या दोन्ही पक्षात मोठी फूट घडवून आणली आहे. विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांना मानणारा नगरसेवकांचा एक मोठा गट यापूर्वीच शिवसेना-भाजपमध्ये गेल्याने ठाणे शहर, घोडबंदर, कोपरी, वागळे पट्टय़ात राष्ट्रवादीचे आव्हान संपुष्टात आल्यासारखे चित्र आहे. काँग्रेसची परिस्थिती तर याहून बिकट असून दोन-तीन विद्यमान नगरसेवकांचा अपवाद वगळला तर इतरांनी दुसऱ्या पक्षाची साथ धरली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात १३१ जागांवर या दोन्ही पक्षांना स्वबळावर उमेदवार सापडणेही कठीण असून त्यामुळे आघाडी करावी याविषयी या नेत्यांचे एकमत झाले आहे.

ठाणे शहर, कोपरी पाचपाखाडी आणि ओवळा-माजिवडा या विधानसभा मतदारसंघात आघाडीची गाडी चर्चेच्या रुळावर असली, तरी कळवा-मुंब्य्रातील थांब्यामुळे दोन्ही पक्षांच्या इच्छुकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कळव्यातील १६ आणि मुंब्य्रातील २० जागांपैकी प्रत्येकी पाच जागा काँग्रेसला सोडाव्यात, अशी या पक्षाच्या नेत्यांची मागणी आहे. ही मागणी राष्ट्रवादीला अमान्य असून स्थानिक नेत्यांसोबत चर्चेच्या गुऱ्हाळात अडकण्यापेक्षा यासंबंधीचा वस्तुनिष्ठ अहवाल काँग्रेस नेते नारायण राणे यांच्यापुढे मांडण्याची तयारी राष्ट्रवादीने दाखवली होती. दोन्ही पक्षांमध्ये आघाडीची मानसिकता होती. त्यामुळे आघाडीबाबत चर्चेसाठी नारायण राणे यांच्या निवासस्थानी आज बैठक झाली. या बैठकीत दोन्ही पक्षांकडून सकारात्मक चर्चा झाली आहे. महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने हातमिळवणी करण्याची तयारी दाखवली आहे.