एकाने सेनाप्रमुखांना शब्द दिल्याने, तर दुसऱ्याने भाजपच्या धसक्याने

युती संपुष्टात आल्यानंतर भाजपशी टक्कर घेताना एकेकाळी नगरसेवकपद भूषविलेल्या जुन्या जाणत्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. हमखास विजयासाठी माजी महापौर महादेव देवळे आणि शुभा राऊळ यांना निवडणुकीच्या आखाडय़ात उतरविण्याची उद्धव ठाकरे यांची तीव्र इच्छा होती. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शब्द दिल्याने महादेव देवळे यांनी, तर गुजराथी बहुल भागातील भाजपच्या वाढत्या वर्चस्वाचा धसका घेत माजी महापौर शुभा राऊळ यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. अखेरच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरे या दोघांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी आग्रह करीत होते. मात्र या दोघांनी सपशेल नकार दिल्यामुळे अखेर पक्षप्रमुखांना अन्य व्यक्तीचा विचार करणे भाग पडले. शिवसेनेला गरज असताना या दोघांनी पाठ फिरविल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

दिलेले काम चोखपणे करणारे मनमिळावू नगरसेवक म्हणून महादेव देवळे सर्वाना परिचित होते. तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी ते एक होते. त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे यांनी महादेव देवळे यांना महापौरपदी विराजमान केले होते. महापौर झाल्यानंतर वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत अनेकांशी त्यांनी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापीत केले होते. सर्वसामान्य मुंबईकरांना महादेव देवळे आपले महापौर वाटू लागले होते. मुंबईकरांनी त्यांच्यावर भरभरुन प्रेम केले. आजही रस्त्याने जात असताना अनेक जण महादेव देवळे यांना महापौर म्हणूनच संबोधत असल्याचे दृष्टीस पडते. महादेव देवळे यांनी प्रभाग क्रमांक १९५ मधून पालिकेची निवडणूक लढवावी अशी उद्धव ठाकरे यांची इच्छा होती. महादेव देवळे यांना ‘मातोश्री’वर बोलावून उद्धव ठाकरे यांनी त्यांना निवडणूक लढविण्यासाठी आग्रहही केला होता. परंतु महापौर पद भूषविल्यानंतर आपण पालिकेची निवडणूक लढविणार नाही, असा शब्द बाळासाहेब ठाकरे यांना दिला आहे. त्यामुळे आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही, असे महादेव देवळे यांनी ठामपणे सांगितले. पक्षाला आता जुन्या जाणत्या आणि हमखास निवडून येऊ शकतील अशा चेहऱ्याची गरज आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्याबाबत फेरविचार करावा अशी आग्रही भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली होती. मात्र शिवसेनाप्रमुखांना दिलेला शब्द मोडता येणार नाही असे स्पष्ट करीत गहिवरलेल्या महादेव देवळे यांनी निवडणूक लढविण्यास स्पष्ट नकार दिला.

[jwplayer 5i2fQEnk]

उच्च शिक्षित असलेल्या माजी महापौर शुभा राऊळ यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यासाठी उद्धव ठाकरे उत्सूक होते. शुभा राऊळ तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्यांनी महापौर पदही भूषविले. महापौर असताना पर्यावरणविषयक अनेक प्रश्न धसास लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. मुंबईतील दुषित झालेल्या नद्या स्वच्छ करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा चांगली आहे. जनमानसामध्ये उत्तम प्रतिमा असलेला उमेदवार हमखास निवडून येऊ शकतो. त्यामुळे शुभा राऊळ यांना दहिसर येथील प्रभाग क्रमांक ८ मधून उमेदवारी देण्याच्या विचारात उद्धव ठाकरे होते. परंतु शुभा राऊळ यांनी सुरुवातीपासूनच आगामी निवडणूक लढण्यास नकार दिला. ‘मातोश्री’वर बोलावून त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्नही उद्धव ठाकरे यांनी केले. परंतु शुभा राऊळ आपल्या मतावर ठाम राहिल्या. दहिसर परिसर गुजराथी बहुल झाला आहे. त्यामुळे या भागात भाजपचे वर्चस्व वाढू लागले आहे. तीन वेळा नगरसेविका आणि एकदा महापौर पद भूषविल्यानंतर आता नव्या चेहऱ्याला संधी द्यावी, असे मत शुभा राऊळ यांनी व्यक्त केले होते. आपण द्याल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करू, असा शब्द शुभा राऊळ यांनी उद्धव ठाकरे यांना देत निवडणूक लढविण्यास नकार दिला. मात्र भाजपच्या वाढत्या वर्चस्वामुळे पराभवाचा फटका बसू नये या भितीपोटी त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्याची चर्चा या विभागामध्ये सुरू आहे.

हे दोन माजी महापौर रिंगणात उतरले असते तर तर उद्धव ठाकरे यांना हमखास विजयाची शाश्वती होती. मात्र देवळे यांच्याऐवजी महापौर स्नेहल आंबेकर यांना प्रभाग क्रमांक १९५ मधून, तर राऊळ यांच्याऐवजी मनसेतून शिवसेनेत आलेल्या उपविभाग संघटक दीपा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

[jwplayer FqqQpTzp]