शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची गर्जना; तिसऱ्या आघाडीचे सूतोवाच

भाजपला आता मित्राची गरज उरलेली नसल्याने महापालिका निवडणुकीनंतर कोणताही समझोता नाहीच, उलट आता भाजप सरकारला नोटीस दिली असून त्यांचा प्रतिसाद पाहून सत्तेतून बाहेर पडण्याबाबतचा निर्णय घेईन, असे खडे बोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुनावले. भाजप-शिवसेनेत कटुता वाढली असून आता कधीही सरकारचा पाठिंबा काढला जाऊ शकतो, असेही ठाकरे यांनी स्पष्टपणे बजावले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार अपेक्षांची पूर्ती करण्यात अपयशी ठरले आहे.  काँग्रेसनंतर भाजपनेही जनतेचा विश्वास गमावल्याने जनता प्रादेशिक पक्षांना पसंती देत असल्याचे अनेक राज्यांमध्ये दिसून येत आहे.

केंद्र व राज्य सरकारमध्ये सामील असलेल्या शिवसेनेने महापालिका निवडणुकीमध्ये भाजपशी युती तोडून स्वबळावर कडवी लढत देण्यास सुरुवात केल्याच्या पाश्र्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अनेक राजकीय मुद्दय़ांवर भाष्य केले. भाजपवर कडवट टीका करतानाच शिवसेनेच्या भावी वाटचालीबद्दल संकेत देत भाजपच्या संगतीमध्ये ‘राम’ राहिला नसल्याचीच खंत त्यांनी व्यक्त केली. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यात २५ वर्षे राहिलेले ऋणानुबंध दोन्ही पक्षांच्या पुढील पिढीतील नेत्यांमध्ये आले नसले तरी विधानसभेच्या वेळी युती तुटूनही ते स्मरून भाजप सरकारला पाठिंबा दिला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार गेल्याने आता अपशकुन नको, यासाठी महत्त्वाच्या खात्यांचा किंवा अन्य कोणत्याही बाबींचा आग्रह न धरता सरकारमध्ये सामील झालो. ज्या पद्धतीने भाजप नेते वागत आहेत, ते पाहता त्यांना मित्राची गरज उरलेली नाही. पूर्वीच्या नेत्यांमध्ये जो सुसंवाद व स्नेहसंबंध होते, ते राहिलेले नाहीत. त्यामुळे आता उगाच सोबत कशाला, असे सांगत भाजपला नोटीस दिली असून अपेक्षित बदल न झाल्यास सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

प्रादेशिक पक्षांच्या साथीने..

काँग्रेसला हटविल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार हा जनतेने विश्वास टाकलेला हा शेवटचा पर्याय आहे, त्याला तडा जाऊ देऊ नका, असे मी सांगितले होते. पण नोटाबंदी करून जनतेचे हाल केले.  ‘सर्जिकल स्ट्राईक’ केले, पण पाकिस्तानला कोणता धडा शिकविला, असे सवाल ठाकरे यांनी केले. स्वीस बँकेतून काळा पैसा आणू, राम मंदिर बांधू अशी दिलेली अनेक आश्वासने फोल ठरली. मोदी सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे जनतेचा कौल आता प्रादेशिक पक्षांकडे वाढत असल्याचे तामिळनाडू, पश्चिम बंगाल, बिहार व अन्य राज्यांमधील निवडणुकांवरून दिसून येते. त्यामुळे या प्रादेशिक पक्षांनी एकत्र येऊन समर्थ पर्याय द्यावा, असा प्रयत्न असून काही नेत्यांशी बोलणी सुरू झाली असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे तिसऱ्या आघाडीची चर्चा यशस्वी झाली, तर भविष्यात शिवसेना रालोआतून बाहेर पडण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असेच संकेत अप्रत्यक्षपणे दिले.