उद्धव ठाकरे यांची टीका; श्रेष्ठींना खूश ठेवण्यासाठी खोटी माहिती

केंद्र शासनाने केलेल्या आर्थिक पाहणी अहवालातच मुंबई महापालिका ही पारदर्शक कारभारात प्रथम क्रमांकाची असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. परंतु अर्धवटराव मुख्यमंत्र्यांना ‘वरच्या’ मोदींना खूश करण्यासाठी रेटून खोटे बोलावे लागत आहे. मुंबईची पाटण्याशी तुलना करून देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांचा व पाटण्यातील लोकांचाही अपमान केला आहे. हिम्मत असेल तर ही तुलना सिद्ध करून दाखवा अन्यथा राजकारण सोडा, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलुंड येथे सभा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हैदराबादचा पहिला क्रमांक असून मुंबईचा क्रमांक तिसरा असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर उद्धव यांनी कांदिवली येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देवेंद्र फडणवीस यांचे पुरते वाभाडे काढले. मुंबई महापालिका ही देशात पहिल्या क्रमांकाची पारदर्शक असल्याचे भाजपच्या केंद्रातील अर्थमंत्र्यांनीच जाहीर केले. ते गाढव आहेत का, ते मुख्यमंत्र्यांनीच सांगावे, असे सांगत उद्धव यांनी आर्थिक पाहाणी अहवाल फडकवला. याच अहवालात शेवटून सहा महापालिका या भाजपच्या ताब्यातील असून यातही नागपूर महापालिकेचा साधा उल्लेखही नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील महापालिकेत मोठा भ्रष्टाचार असून त्याच्या नंदलाल समितीने केलेल्या चौकशीचा अहवालही जाहीर करा. नरेंद्र मोदी म्हणतात देश बदल रहा है.. ते खरंच बोलतात, कारण ते रोज नव्या देशात जातात. त्यामुळे त्यांच्यासाठी देश बदलतच असतो, असे सांगून हे किती वेळा संसदेत आले ते त्यांनी जाहीर करावे असे आवाहनही उद्धव यांनी केले. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला हरविण्यासाठी मोदी २७ वेळा महाराष्ट्रात आले. आताही महापालिका निवडणुकीसाठी या. आमचे खासदार तुम्हाला शिवसेनेच्या विजय मेळाव्याचे आमंत्रण देतील, असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री आता परिवर्तनाच्या तसेच पारदर्शकतेच्या गप्पा मारत आहेत. मोदींचा फोटो लावून आता मत मिळणार नाही, हे लक्षात आल्यामुळेच तेलगीच्या स्टॅम्प पेपरचा वापर यांनी जाहीरनाम्यावर केल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही ७०० उद्याने केली. आरोग्य सेवेसाठी रुग्णालये बांधली. यापुढे पालिकेची आरोग्यसेवा मोफत करू तसेच सफाई कामगारांना घरेही देऊ. मोफत डायलिसीस सेवा पालिकेतर्फे  दिली जाईल, असे सांगून आम्ही थापा मारत नाही तर जे बोलतो ते करून दाखवतो असेही उद्धव यांनी सांगितले.

राम मंदिर बांधण्याच्या घोषणा २७ वर्षे करणाऱ्या भाजपने राम मंदिर बांधले.. कोठे बांधले.. कधी बांधले विचारू नका.. पण राम मंदिर बांधले.. आता ते पारदर्शक असल्यामुळे दिसणार नाही, एवढेच.. यांच्या दाताचे बोळके झाले आहे.. पारदर्शक असल्यामुळे आरपार दिसते.  -उद्धव ठाकरे , शिवसेना पक्षप्रमुख