News Flash

पालिकेबाबत कावकाव करणारे बरेच!

मुंबई महापालिकेच्या सभागृहात प्रबोधनकार ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण सोमवारी करण्यात आले.

समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण सोमवारी मुंबई महापालिका सभागृहात करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.

मुंबई महापालिकेतील कारभारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते सातत्याने टीका करीत असताना, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शकच आहे, मात्र त्याबाबत कावकाव करणारे बरेच आहेत, असा टोला सोमवारी मुख्यमंत्र्यांसमक्षच लगावला; मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यावर प्रतिटोला न लगावता नरमाईचाच सूर लावणे पसंत केले!

मुंबई महापालिकेच्या सभागृहात प्रबोधनकार ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण सोमवारी करण्यात आले. प्रख्यात चित्रकार एस. एम. पंडित यांनी काढलेल्या व सेनाभवनात लावण्यात आलेल्या प्रबोधनकारांच्या तैलचित्राची ही डिजिटल प्रिंट आहे. त्या कार्यक्रमास मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे एकत्र आले होते. महापालिका निवडणुका जवळ येत असताना उभय पक्षांत सातत्याने कुठल्या ना कुठल्या मुद्दय़ावर वाद होत आहेत. त्यामुळे, हे दोघे एकत्र आल्यावर राजकीय जुगलबंदी कशी रंगते याकडे सगळ्यांचे लक्ष होते. उद्धव ठाकरे यांनी आपल्या बोलण्याची सुरुवातच, हल्ली दोन हजार म्हटले की धाकधुक वाटते, पण मी तुम्हाला दोन हजार सतरा या वर्षांच्या शुभेच्छा देत आहे, अशा वाक्याने केली. त्यास संदर्भ अर्थातच नोटाबंदीचा होता. त्यानंतर उद्धव यांनी पालिकेवर टीका करणाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. ‘कावळ्याला वाचवताना अग्निशमन दलातील जवानाचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या अशा बहादूर जवानांच्या त्यागाचे मोल खूप जास्त आहे’, असे म्हणत त्यांनी आपल्या बोलण्याची गाडी   दुसरीकडे वळवली. इकडे पालिकेतील कारभाराबद्दल कावकाव करणारेही बरेच आहेत, असा टोला त्यांनी लगावला. गेल्या पाच वर्षांत भाजपने आमच्या खांद्याला खांदा लावून काम केल्याने शहरात एवढी विकासकामे करता आली, असे म्हणत त्यांनी भाजपाला धन्यवादही दिले. पालिकेत विकासाची कामे होत नसून, केवळ मुदतठेवी वाढवत असल्याबद्दल श्वेतपत्रिका काढण्याची मागणी भाजपाने गेल्याच आठवडय़ात केली होती, हे येथे उल्लेखनीय.

उद्धव यांनी केलेल्या टीकेला उत्तर देणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळले. प्रबोधनकार ठाकरे यांच्या कार्याची महती त्यांनी सांगितली. विपरीत स्थितीत समाजाच्या भल्यासाठी चळवळ करतो तो खरा समाजसेवक. प्रबोधनकारांनी संघर्ष करून समाजाला दिशा दिली. प्रबोधनकारांचा लढा ब्राह्मणांविरुद्ध नव्हे तर बामणांविरुद्ध होता. मंदिरांवर वर्षांनुवर्षे कब्जा करून बसलेल्या पुरोहितांच्या तावडीतून त्यांनी देव मोकळा केला, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यांची दखल घेण्यास थोडा उशीरच झाला, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

पालिकेकडून परवाना देण्याची पद्धत ऑनलाइन नसल्याने इज ऑफ डुईंग बिझनेसला जागतिक बँकेने आक्षेप घेतला होता. आता ऑनलाइन प्रणालीमुळे कारभारात पारदर्शकता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

यावेळी महापालिका शाळांच्या १७५ इमारतींमध्ये सॅनिटरी नॅपकीनची व्हेंडिग मशीन लावण्याच्या उपक्रमाचेही उद्घाटन करण्यात आले. पुढील तीन महिन्यात ही यंत्रे शाळेत लावली जातील. याशिवाय काही उपक्रमांचे लोकार्पण आणि अग्निशमन दलाच्या ‘कॉफी टेबल बुक’ चे प्रकाशनही यावेळी झाले.

मुख्यमंत्र्यांसमक्ष उद्धव ठाकरे यांचा टोला

पुढील महापौर शिवसेनेचाच : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-सेना युती होईल की नाही, याबाबत अद्याप साशंकता आहे. या पाश्र्वभूमीवर, ‘निवडणुकानंतर मार्चमध्ये मी पुन्हा येथे येईन तेव्हा सेनेचाच भगवा फडकलेला असेल व सेनेचेच महापौर येथे बसले असतील’, असे उद्गार उद्धव यांनी या कार्यक्रमात काढले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 2:12 am

Web Title: uddhav thackeray slam on bjp
Next Stories
1 निवडणुकांसाठी भाजपचे ‘उत्तर भारतीय कार्ड’
2 स्वबळ अजमावत भाजपचे युतीसाठी चर्चेचे गुऱ्हाळ
3 मुंबईत कृष्णनीतीच चालणार!
Just Now!
X