शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे…त्यांचे भाषण…त्यांचे शब्द म्हणजे धगधगता निखारा…कानात प्राण आणून त्यांचे शब्द ऐकणारा जनसमुदाय…आता तो आवाज हरपलाय. ढाण्या वाघाची डरकाळी काँक्रिटच्या जंगलात आता लुप्त झालीय, अशा प्रतिक्रिया शिवसैनिकांच्याच नव्हे; तर मराठी जनांच्याही तोंडी ऐकायला मिळत होत्या. पण मराठीजनांच्या आणि शिवसैनिकांच्या मनात अंगार जागृत करणारा हाच ‘बाळासाहेबांचा आवाज’ काल, गुरुवारी गोरेगावमधील मेळाव्यात घुमला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून उपस्थितांनी तो अनुभवला. ‘बाळासाहेब परत या’ म्हणणारे आता ‘बाळासाहेब परत आले’ असे म्हणू लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या या आवेशपूर्ण भाषणानंतर “आज पहिल्यांदा उद्धवसाहेबांच्या भाषणात बाळासाहेबांसारखे तेज पाहायला मिळाले”, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहेत.

मुंबईतील गोरेगावमध्ये शिवसेना पदाधिकारी, विभाग आणि गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे पदाधिकारी, विभागप्रमुख, गटप्रमुखांच्या मुंबईतील गोरेगाव येथे आयोजित मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक आणि आवेशपूर्ण शैलीत भाषण केले. शिवसैनिकांकडून, जनतेकडून त्यांनी ‘वचन’ मागून भाजपसोबतची युती तोडण्याची घोषणा केली. या भाषणानंतर सोशल मीडियावरही उद्धव ठाकरे यांचीच चर्चा होती. ”साहेब तुमचे भाषण ऐकले, आज तुमच्या मुखातून प्रत्यक्ष मोठे साहेबच बोलल्याचा भास झाला. भाषण ऐकताना आनंदाश्रू आले.”, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.

ऐका, उद्धव ठाकरे काय म्हणाले?

शिवसैनिकांनी मला वज्रमुठ द्यावी, दात मी पाडून दाखवतो. तुमची साथ असल्यास भविष्यात शिवसेना महाराष्ट्रावर एकट्याने भगवा फडकवेल. या सत्तेमध्ये कोणीही वाटेकरी नसेल, ही सत्ता एकट्या शिवसेनेचीच असेल.

देशाचे पंतप्रधानपद तुमच्याकडे आहे, राज्याचे मुख्यमंत्रिपद तुमच्याकडे आहे, मंत्रिमडळातील चांगली खाती तुमच्याकडे आहेत, त्यावर आम्ही काही बोललो नाही. मात्र, शिवसेनेला कोणी कमी लेखत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. त्याला मी जागेवर शिल्लक ठेवणार नाही.

आता नव्या वर्षात मी तुमच्यासमोर शिवसेनेच्या नव्या वाटचालीची दिशा स्पष्ट करत आहे. यापुढे शिवसेना महाराष्ट्रात एकटी भगवा फडकवेल. महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, आता भविष्यात कुठेही युती करणार नाही. आता यापुढे लढाई सुरू झालेली आहे. मला आता एकच ध्यास आहे, ही संधी आहे, करीन तर आत्ताच आणि ते मी केल्याशिवाय राहणार नाही.

तुम्ही मला वचन देत असाल तर आज मी निर्णय घेतोय, आता याच्या पुढे भविष्यात शिवसेना एकटी महाराष्ट्रावर भगवा फडकवेल, आता यापुढे मी युतीसाठी कुणाच्याही दारात कटोरा घेऊन जाणार नाही. जे काही असेल ते माझ्या भगव्याचं, माझ्या शिवसेनाप्रमुखांचं माझ्या शिवसैनिकांचं असेल.

महाराष्ट्रात सरकारचा उधळलेला बैल रोखा, रस्त्यावर उतरून लढा.