शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईच्या विलेपार्ले परिसरात गुरूवारी आयोजित करण्यात आलेली प्रचारसभा रद्द करण्यात आली आहे. काल रत्नागिरी येथे झालेल्या भीषण अपघातात विलेपार्ल्यातील सात शिवसैनिकांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार असल्याने उद्धव ठाकरे यांनी विलेपार्लेची सभा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. मात्र, उद्धव यांनी अंधेरीतली दुसरी प्रचारसभा नियोजित वेळेनुसारच होणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर पालीजवळील खानू गावाजवळ गुरूवारी सकाळी झालेल्या भीषण कार अपघातात सात जण जागीच ठार झाले, तर एक जण जखमी झाला होता. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून कार झाडाला धडकल्याने हा भीषण अपघात झाला होता. यामध्ये सचिन सावंत, प्रशांत गुरव, अक्षय केरकर (चालक) निहाल कोटीयन, केदार तोडणकर, वैभव मनवे आणि मयूर बेलणेकर (सर्व जण २५ ते ३५ वयोगटातील) यांचा मृत्यू झाला होता. अपघातात अभिषेक कांबळी हा तरूण बचावला. हे सर्वजण विलेपार्ले आणि मालाड परिसरातील रहिवाशी होते. बुधवारी मध्यरात्री हे तरूण झायलो गाडीने मुंबईहून गोव्याला निघाले होते. मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबापासून सुमारे १२ किलोमीटरवर खानू गावाजवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी विरूध्द दिशेला रस्त्याकडेच्या फणसाच्या झाडावर आदळून उलटली आणि १० ते १२ फूट खोल खड्डयात कोसळली. या अपघातात गाडीचा चक्काचूर झाला. स्थानिक ग्रामस्थ तत्काळ मदतीला धावले. क्रेनच्या साहाय्याने गाडी खड्डयातून बाहेर काढून गॅसकटरने गाडीचा पत्रा कापून या तरूणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. अपघातातील तरूणांचे मृतदेह संध्याकाळी उशिरा त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.