स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के प्रभाग आरक्षित असले तरी प्रत्यक्षात खुल्या प्रभागांमधूनही महिलांना उमेदवारी देण्याकडे राजकीय पक्षांचा कल असून यावेळी ११३ खुल्या प्रभागांपैकी ८० ठिकाणी महिला उमेदवारही रिंगणात उतरल्या आहेत. यातील ३४ प्रभागातील महिला उमेदवारांना राजकीय पक्षांचे पाठबळ असल्याने गेल्या सभागृहापेक्षा यावेळी महिला नगरसेविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

पाच वर्षांपूर्वी महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण जाहीर झाले तेव्हा निकाल लागल्यावर प्रत्यक्षात पालिकेत १०६ पुरुष नगरसेवक व १२१ महिला नगरसेविकांनी प्रवेश केला. यातील ९८ नगरसेविका पहिल्यांदाच विजयी झाल्या होत्या. या नगरसेविकांची कामगिरी कशी राहील याबाबत तेव्हा अनेक चर्चा झाल्या. सुरुवातीची दोन वर्षे प्रश्न, चर्चा याबाबत महिला पिछाडीवर होत्या. मात्र पाच वर्षांनंतर सभागृहातील उपस्थिती आणि प्रश्नांचा दर्जा व चर्चा अशा एकूण कामगिरीत पुरुषांपेक्षा महिलांनी आघाडी घेतली. आता याच सभागृहातील पन्नास टक्क्य़ांहून अधिक महिला पुन्हा निवडणूक लढवत आहेत.

प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्यावर घराणेशाही टिकवण्यासाठी अनेकदा कुटुंबातील महिलांना पुढे केले जाते आणि आरक्षण उठवल्यानंतर पुन्हा पुरुषांकडे सत्ता सोपवली जाते. महापालिका निवडणुकीतही कमी अधिक फरकाने ही स्थिती दिसते. मात्र आता यात फरक पडू लागला असून उंबऱ्याबाहेर पडलेल्या महिलांनी सत्तासूत्रे स्वतच्या ताब्यात ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महिलांसाठी आरक्षित नसलेल्या मात्र मागासवर्गीय आरक्षण असलेल्या ३० पैकी १८ ठिकाणी तर अनुसूचित जाती व जमातींसाठी राखीव असलेल्या ८ पैकी ६ ठिकाणी महिला उमेदवार लढत देत आहेत. कोणतेही आरक्षण नसलेल्या ७५ खुल्या प्रभागांमध्ये सर्वाधिक स्पर्धा असून सरासरी २० उमेदवार रिंगणात आहेत. मात्र इथेही महिलांनी माघार घेतलेली नाही. तब्बल ५६ प्रभागांमध्ये महिला उमेदवार उभ्या आहेत. या ८० प्रभागातील ३४ ठिकाणी महिलांना राजकीय पक्षांचे पाठबळ आहे. या महिलांमध्ये शिवसेनेच्या तृष्णा विश्वासराव, कोमल जामसंडेकर, संध्या दोषी काँग्रेसच्या ज्योत्स्ना दिघे, राष्ट्रवादीच्या राखी जाधव आणि एमआयएममध्ये गेलेल्या वकारुन्निसा अन्सारी अशा ज्येष्ठ नगरसेविकांचा समावेश आहे.

*  २०१२ मधील पालिका निवडणुकीत १२१ महिला तर १०६ पुरुष नगरसेवक.

*  यापैकी ९८ महिला प्रथमच पालिकेत नगरसेवक म्हणून दाखल.

*  या निवडणुकीत पन्नास टक्क्य़ांहून अधिक विद्यमान नगरसेविकांना पुन्हा उमेदवारी

*  खुल्या गटात ३३ विद्यमान नगरसेविकांना उमेदवारी

*  शिवसेनेकडून १२, भाजप व काँग्रेसकडून प्रत्येकी ५, राष्ट्रवादीकडून ७ तर मनसेकडून ४ महिलांना खुल्या प्रभागात उमेदवारी.