सभा, कार्यक्रम परवानगी, प्रचार साहित्याची कामे युवा सैनिकांकडे

शिवसैनिकांना डावलून युवा सैनिकांना पालिका निवडणुकीची उमेदवारी द्यायची नाही यावर शिवसेना पक्षप्रमुखांनी शिक्कामोर्तब केले आहे. मात्र युवा सैनिकांना घरात बसविण्याऐवजी निवडणुकीच्या कामात त्यांनाही सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सभा, कार्यक्रमांसाठी स्थानिक पोलीस ठाणे, वाहतूक विभागाकडून लागणारी परवानगी मिळविणे, प्रचार साहित्य तयार करण्यास मदत करणे, त्याचे वितरण आदींची जबाबदारी युवा सैनिकांवर टाकण्यात आली आहे. त्यामुळे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासह सर्वच जण कामाला लागले आहेत. यानिमित्ताने निवडणुकीच्या कामाची शिकवणी युवा सैनिकांना लावल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

मुंबईतील अनेक विभागांमधील युवा सैनिक पालिका निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक होते. त्यामुळे अनेक ठिकाणी इच्छुकांच्यात संघर्ष झडले जाण्याची चिन्हे होती. ‘शिवसैनिक विरुद्ध युवा सैनिक’ या मथळ्याखाली याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता, मुंबई’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर शिवसेना आणि युवा सेनेमध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता. शिवसैनिक आणि युवा सैनिक एकमेकांसमोर ठाकून नवा संघर्ष निर्माण होऊ नये यासाठी युवा सैनिकांना उमेदवारी न देण्याचा निर्णय ‘मातोश्री’ने घेतला. या निर्णयामुळे युवा सैनिकांमध्ये निराशा पसरली होती.

पालिका निवडणुकीच्या तोंडावर युवा सैनिकांचे खच्चीकरण होऊ नये, शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात त्यांनाही काम करण्याची संधी मिळावी, भविष्यात युवा सेनेतून चांगले नेते तयार व्हावेत, निवडणुकीच्या प्रक्रियेतील बारकावे समजावेत, तसेच निवडणुकीच्या कामाचा अनुभव मिळावा आणि मुख्य म्हणजे युवा सैनिकांमध्ये आलेली निराशा झटकली जावी या उद्देशाने पालिका निवडणुकीतील काही कामाचा भार त्यांच्यावर टाकण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.पालिका निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईमध्ये प्रचार सभा, चौक सभा, मोठय़ा नेत्यांच्या पदयात्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस, निवडणूक आयोगाच्या परवानगीची आवश्यकता असते. निवडणुकीच्या प्रचारात उमेदवार आणि अन्य शिवसैनिक व्यस्त असल्याने या परवानग्या मिळविण्यासाठी त्यांची धावपळ उडते. त्यामुळे आता या परवानग्या मिळविण्याची जबाबदारी विभागातील युवा सैनिकांवर सोपविण्यात येणार आहे. निवडणुकीमध्ये प्रचार साहित्याची आवश्यकता असते.

काही प्रचार साहित्य पक्षाकढून उपलब्ध केले. पक्षातर्फे देण्यात येणाऱ्या प्रचार साहित्य कसे असावे याबाबतही युवा सैनिकांचे मत घेण्यात येणार आहे. प्रचार साहित्याच्या वितरणाची जबाबदारीही युवा सैनिकांवर सोपविण्याचा विचार सुरू आहे.

युवा सैनिकांना निवडणुकीच्या कामाचा अनुभव मिळावा या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आहे. ही कामे उत्तम प्रकारे करणाऱ्या युवा सैनिकांना भविष्यात शिवसेनेच्या मुख्य प्रवाहात सहभागी करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूर्तास निवडणुकीच्या रिंगणात युवा सैनिकांना उतरविण्यात येणार नसले तरी भविष्यात मात्र त्यांचा विचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.