जिल्हा परिषदांमध्ये ६८ टक्के मतदान

विशेष म्हणजे मतदानादरम्यान राज्यात कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही

निवडणूक आयोग, प्रसारमाध्यमे आणि राजकीय पक्षांनी राज्यभरात राबविलेल्या मतदार जनजागृती मोहिमेमुळे यंदा मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे, पिंपरी- चिंचवडसह राज्यातील १० महानगरपालिकांमध्ये मतदानाचा टक्का वधारला आहे. प्राथमिक अंदाजानुसार या महापालिकांमध्ये सरासरी ५६ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगातील सूत्रांनी सांगितले. त्याचप्रमाणे  ११ जिल्हा परिषदा व त्यांतर्गत येणाऱ्या ११८ पंचायत समित्यांमध्येही मतदारांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळाला असून प्राथमिक अंदाजानुसार ६८ टक्के मतदान झाले आहे. विशेष म्हणजे मतदानादरम्यान राज्यात कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. या सर्व ठिकाणी गुरूवारी मतमोजणी होणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दुसऱ्या टप्यात आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती या जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्या तसेच गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत कोरची, कुरखेडा, देसाईगंज (वडसा), आरमोरी, गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा या आठ पंचायत समित्या तसेच वर्धा जिल्हा परिषदेच्या दोन आणि यवतमाळ जिल्हा परिषदेच्या सहा जागांबरोबरच त्यांतर्गतच्या पंचायत समितीच्या १६ जागांसाठी आज सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. ग्रामीण भागात  संध्याकाळी साडेपाचनंतरही मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. गडचिरोलीत नक्षवाद्यांच्या धमक्यांनंतरही मतदार उस्फूर्तपणे बाहेर पडले त्यामुळेच भामरागड, एटापल्ली,अहेरी या भागात मतदारांनी मोठय़ा प्रमाणात मतदान केल्याचे राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितले.

प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या १० महापालिकांमध्ये ५६ टक्क्यांच्या आसपास मतदान झाले आहे. नागपूर, अकोला, अमरावती, पुणे, नाशिक, ठाण्यात मोठय़ा प्रमाणात मतदान झाल्याचेही सांगितले.

१० महापालिकांच्या एक हजार २६८ जागांसाठी तब्बल नऊ हजार २०८ उमेदवारांचे राजकीय भवितव्य आता मतदान यंत्रात बंद झाले असून त्याचा त्याचा फैसला येत्या २३ फेब्रुवारीस होईल.

मतदान यंत्राची पूजा भोवणार?

पुणे : मतदान करण्यापूर्वी माजी महापौर चंचला कोद्रे आणि माजी उपमहापौर सुनील उर्फ बंडू गायकवाड या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करण्यापूर्वी केलेली मतदान यंत्राची पूजा भोवण्याची शक्यता आहे. याबाबत चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. चंचला कोद्रे आणि सुनील उर्फ बंडू गायकवाड हे उमेदवार मतदान करण्यासाठी मुंढवा मगरपट्टा सिटी या प्रभाग पोहोचले. मतदान करण्यापूर्वी त्यांनी मतदान यंत्राची पूजा केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 67 percentage in zp election

ताज्या बातम्या