देशाच्या आर्थिक राजधानीवर सत्तेसाठी चढाओढ; आरोप-प्रत्यारोपांमध्ये शहराच्या विकासाचे मुद्दे गायब

मुंबई.. देशाची आर्थिक राजधानी. वाढती लोकसंख्या, अस्ताव्यस्त पसरलेल्या बकाल झोपडपट्टय़ा, अपुरा पाणीपुरवठा, मलनिस्सारण वाहिन्यांचे दुबळे जाळे, तुंबणारी गटारे-नाले, साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव, पावसाळ्यात जलमय होणारे सखल भाग, नद्यांची दुर्दशा, निर्माण होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या सक्षम प्रक्रियेचा अभाव, खड्डेमय रस्ते, फेरीवाल्यांचा सुळसुळाट, वाहतूक कोंडी, अपुरी शौचालये अशा एक ना अनेक प्रश्नांनी या शहराला ग्रासले आहे. मात्र तरीही देशामधील कानाकोपऱ्यातील नागरिकांना आणि देशी-विदेशी पर्यटकांना या शहराची ओढ लागते हे विशेष.

मुंबापुरी आणि मुंबईकरांना उत्तमोत्तम नागरी सुविधा देण्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेवर आहे. एका मध्यम राज्याइतका म्हणजे ३७ हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेली मुंबई महापालिका मात्र सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरली आहे. हे अपयश नेमकं कोणाचं? पालिकेच्या सर्व कामांची अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासनाचं की लोकांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांचं? अपयशाचं धनी व्हायची वेळ आल्यानंतर प्रशासन आणि नगरसेवक दोघेही कायम एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करीत हात झटकण्याच्याच पवित्र्यात असतात. दोघांच्याही या प्रवृत्तीमुळे एकेकाळी सुंदर दिसणारी मुंबापुरी मात्र दिवसेंदिवस बकाल होऊ लागली आहे. याचे सोयरसुतक ना मुंबईकरांनी कररूपात पालिका तिजोरीत जमा केलेल्या निधीतून नागरी कामे करून स्वत:च्या श्रेयाचा ढोल पिटणाऱ्या नगरसेवकांना ना याच रकमेतून लठ्ठ वेतन घेणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना. त्यात मुंबईची अवस्था बिकट बनून मुंबईकर मात्र भरडला जात आहे.

शिवसेनेची संघटनात्मक बांधणी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संघटन बांधणीमुळे मुंबईत शिवसेनेची पाळेमुळे घट्ट रोवली गेली आहेत. शिवसैनिकांची मोठी फौज शिवसेनेच्या दिमतीला आहे. मुंबईतील प्रत्येक प्रभागामध्ये शिवसेनेतील किमान चार-पाच आणि कमाल १०-१५ इच्छुकांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एकाच उमेदवाराला तिकीट मिळणार असल्याचे उर्वरित इच्छुकांची समजूत काढण्याचे मोठे आव्हान शिवसेनेपुढे आहे. इच्छुकांची नाराजी दूर होऊ शकली नाही, तर शिवसेनेत मोठे बंड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याउलट परिस्थिती भाजपची. गेली अनेक वर्षे पालिकेच्या सत्तास्थानी असतानाही भाजपला मुंबईमधील काही ठरावीक भागातच आपले वर्चस्व निर्माण करता आले आहे. तळागाळात बांधणी नसल्याने शिवसेनेच्या तुलनेत भाजपकडे कार्यकर्त्यांची फौज अपुरीच आहे. युती होऊ शकली नाही, तर २२७ प्रभागांपैकी अनेक ठिकाणी उमेदवार मिळविण्यासाठी भाजपला जंगजंग पछाडावे लागले आहे. त्यासाठी भाजपची अन्य पक्षांतील निवडणुकीत विजयी होण्याची क्षमता असलेल्या नेते, कार्यकर्त्यांवर नजर आहे. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच पालिका निवडणुकीत भाजपच्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी फौज सज्ज आहे. हीच फौज ताकद बनून मतांची रसद मिळवून अनेक प्रभागांमध्ये भाजपच्या विजयाचा मार्ग सुकर करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शिवसेनेची उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर बनलेले, गेल्या पाच वर्षांमध्ये दुर्लक्षित राहिलेले अनेक शिवसैनिक भाजपच्या वाटेवर आहेत. शिवसेनेतील हे नाराज मोहरे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत भाजपवासीय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा दलबदलूंची संख्या वाढल्यास त्याचा शिवसेनेला काही अंशी फटका सहन करावा लागणार आहे.

गटबाजीचा काँग्रेसला फटका

गेल्या पाच वर्षांमध्ये पालिकेतील विरोधकांनाही चोख भूमिका बजावता आलेली नाही. तुलनेत शिवसेनेनंतर अधिक नगरसेवक संख्या असलेला काँग्रेस कायम दुबळा ठरला. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे परस्परांना शह-काटशह देण्यातच पाच वर्षे निघून गेली. गेल्या पाच वर्षांमध्ये अंतर्गत राजकारणामुळे तीन वेळा विरोधी पक्षनेता बदलण्याची वेळ काँग्रेसवर ओढवली. भाजपमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेले प्रवीण छेडा यांना विरोधी पक्षनेतेपदाच्या आसनावर विराजमान केल्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला. अनेक नगरसेवक बैठकांनाही येईनासे झाले. पण त्याची दखलही काँग्रेसच्या नेत्यांना घेता आली नाही. मनसेने काही विषयांमध्ये आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु नगरसेवकांच्या अपुऱ्या संख्येमुळे तो दुबळाच ठरला. एकंदर परिस्थितीत विरोधक सत्ताधाऱ्यांना रोखण्यात अपयशी पडले. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांनी मनमानी करीत हवे ते प्रस्ताव मंजूर करून घेतले. गेली अनेक वर्षे एकमेकांशिवाय करमत नसलेल्या शिवसेना-भाजपने हातात हात घालून पालिकेमधील सत्ता उपभोगली. प्रत्येक कामात हे दोन्ही पक्ष वाटेकरी बनले. पण विधानसभा निवडणुकीत अधिक जागा मिळविणाऱ्या भाजपच्या आकांक्षा वाढल्या आहेत. भाजपचे आमदार असलेल्या मतदारसंघातील प्रभाग आपल्याला मिळावेत असा आग्रह भाजपच्या नेत्यांनी धरला आहे. चर्चेच्या फेऱ्यांमध्ये भाजप नेते ११४ वरच अडून बसल्याने अखेर शिवसेनेने ६० प्रभाग देण्याची तयारी दर्शवत भाजपला खिजविण्यास सुरुवात केली. त्यामुळे उभयतांमधील चर्चेला खीळ बसली. मात्र ‘युती होणे नाही’ असे एकाही पक्षाचा नेता बोलायला तयार नाही. पालिकेच्या मागील निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासाठी सोडलेल्या जागांसह ९० प्रभाग देण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून पाठविण्यात आल्याची जोरदार चर्चा मुंबईत सुरू आहे. परंतु त्याबद्दल भाजपकडून कोणतीच हालचाल होताना दिसली नाही. उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत युतीचा हा खेळ सुरू राहण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये युती होणार की नाही हा विषय या उभय पक्षांमधील आहे. परंतु पालिकेतील सत्तास्थानी बसून ज्यांना नागरी सुविधा द्यायच्या आहेत त्या मुंबईकरांना मात्र दोन्ही पक्ष गृहीत धरत आहेत. पालिकेची सत्ता हे दोन्ही पक्ष मिळवणार नाहीत, तर योग्य वाटणाऱ्या पक्षाच्या हातात मुंबईकर सत्ता देणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांचा विचार निवडणुकीपूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी करायला हवा.

घोटाळ्यांचे राजकारण

गेल्या वर्षभरात पालिकेतील नालेसफाई, रस्ते, वाहनतळ, कचरा आदी नागरी कामांमधील घोटाळे उघडकीस आले. घोटाळ्यांची पाळेमुळे खणून काढण्याऐवजी सत्ताधारी शिवसेना आणि भाजप एकमेकांवर कुरघोडय़ा करण्याचे राजकारण खेळत बसले. तर सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू झालेल्या कलगीतुऱ्याची गंमत पाहात विरोधकांनी धन्यता मानली. त्यामुळेच करदात्यांच्या पैशांची लूट होत असल्याचे उघडकीस आल्यानंतरही पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्यांना कडक शासन होऊ शकलेले नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल. गेली २०-२२ वर्षे एकमेकांच्या हातात हात घालून पालिकेमध्ये सत्ताधीश बनलेले शिवसेना आणि भाजप आज बहुमत मिळवून एकहाती सत्ता मिळविण्यासाठी परस्परांशी झगडू लागले आहेत. गेले वर्षभर आगामी निवडणुकीत पालिकेत आपलीच सत्ता येणार, आपलाच महापौर आसनस्थ होणार अशा बढाया दोन्ही पक्षांचे नेते मारत आले. शिवसेना आणि भाजपमध्ये युतीची चर्चा झाली. एकंदर सुरू असलेल्या चर्चेवरून या दोन्ही पक्षांना खरंच युती करायची आहे का, असाच प्रश्न आता मुंबईकरांना पडला आहे. दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या संयुक्त बैठकांमध्ये युतीसाठी अनेक वेळा चर्चा झाल्या. या चर्चामध्ये केवळ एकमेकांना शह-काटशह कसा देता येईल, युतीमध्ये कसे विघ्न येईल याचीच दोन्ही पक्षांकडून काळजी घेण्यात आल्याचे समोर आले आहे.