भाजपचे संपर्कसत्र सुरू; सेनेत हलकल्लोळ, निष्ठावंतांची करडी नजर

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ५१२ इच्छुक उमेदवारांची यादी तयार असल्याचे जाहीर करणाऱ्या भाजपने सोमवारपासून मुंबईतील ठिकठिकाणच्या शिवसेनेतील वजनदार, तसेच नाराज आजी-माजी नगरसेवक, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुखांसह अनेकांशी संपर्क साधण्याचा सपाटा लावला आहे. भाजपमधील अनेक कार्यकर्ते मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या शिवसैनिकांशी संपर्क साधून ‘येताय का’ अशी खासगीत विचारणा करू लागले आहेत. यामुळे सोमवारी संध्याकाळपासून शिवसेनेत हलकल्लोळ माजला असून शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करण्याची शक्यता असलेल्यांवर शिवसैनिकांमार्फत बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात झाली आहे. मात्र शिवसेनेतील किती मासे भाजपच्या गळाला लागतात ते पालिका निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी उघड होणार आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये युतीचे चऱ्हाट सुरू झाले. उभय पक्षांमध्ये सुरू असलेल्या चर्चानाटय़ावरून  शिवसेना-भाजपला युती करायची आहे की नाही याबाबत मुंबईकरांमध्ये संभ्रम निर्माण होऊ लागला आहे. युती नको, एकदा होऊन जाऊ देच, अशी चर्चा शिवसेना शाखा आणि भाजप कार्यालयांबाहेर गटागटाने उभ्या राहणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे. या पाश्र्वभूमीवर भाजपने २२७ प्रभागांसाठी ५१२ इच्छुक उमेदवारांची यादी तयार असल्याचे घोषित केले. मात्र इच्छुकांची मोठी यादी हाती असताना शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपने सोमवारी दुपारनंतर गिरगाव, वरळी, लालबाग, परळ, दादर, शिवडी, प्रभादेवी, गोरेगाव, बोरिवली, दहिसर, घाटकोपर, मुलुंड, कांजूरमार्ग, कुर्ला आदी परिसरांतील तमाम शिवसैनिकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केल्याचे समजते. त्यात शिवसेनेचे आजी-माजी नगरसेवक, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, ठिकठिकाणच्या विभागांमध्ये वर्चस्व असलेले, परंतु शिवसेनेत दुर्लक्षित असलेल्या नेत्यांचा समावेश आहे. शिवसेनेतील इच्छुकांच्या यादीतील अनेकांचे मन वळविण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसैनिकांशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली असून मैत्रीपूर्ण संबंधातून शिवसैनिकांना आपलेसे करीत शिवसेनेला खिंडार पाडण्याची चाणक्यनीती भाजपने आखली आहे.

भाजपने शिवसैनिकांबरोबर अवलंबलेल्या संपर्कनीतीमुळे ‘मातोश्री’च्या चिंतेत भर पडली आहे. भाजपच्या चाणक्यनीतीची कुणकुण लागताच सोमवारी संध्याकाळी शिवसेना भवन आणि ‘मातोश्री’वर नेते मंडळींमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या. शिवसेना सोडून कोण कोण जाऊ शकते यावर विचार करण्यात आला. निवडणुकीच्या तोंडावर केवळ उमेदवारी मिळत नसल्याने शिवसेना सोडून जाणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी शिवसेनेतील नेते मंडळींचे एकमत झाले आहे. त्यामुळे शिवसेना सोडून जाण्याची शक्यता असलेल्या शिवसैनिकांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यास सुरुवात झाली आहे.

सैनिकांमध्ये द्विधा

गेल्या पाच वर्षांमध्ये विविध प्रकरणांमुळे ‘मातोश्री’ची नाराजी ओढवून घेतलेले, तसेच समिती न मिळाल्यामुळे रुसलेले शिवसेनेचे नगरसेवक, त्याचबरोबर माजी महापौर भाजपच्या रडारवर आहेत. शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार की नाही याचा अंदाज येत नसल्यामुळे आजी-माजी नगरसेवकांची चलबिचल सुरू झाली आहे. एकीकडे भाजपचे निमंत्रण आले आहे, पण दुसरीकडे शिवसेनेच्या उमेदवारीबाबत काहीच कळत नाही त्यामुळे शिवसेनेतील अनेकजण द्विधा मन:स्थितीत आहेत. मात्र येत्या दोन-तीन दिवसांमध्ये मुंबईमध्ये मोठय़ा प्रमाणावर दलबदल होण्याची चिन्हे आहेत. या दलबदलामध्ये शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.