जागावाटपाची चर्चा सुरू; सकारात्मक प्रतिसादाची आशा

मुंबईसह राज्यातील दहा महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भाजपबरोबर युती करण्याची रिपब्लिकन पक्षाने अधिकृत घोषणा केल्यानंतर, लगेचच या दोन पक्षांच्या नेत्यांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे. मुंबईतील ६५ जागांबरोबरच अडीच वर्षे महापौरपद व उपमहापौरपद रिपब्लिकन पक्षाला द्यावे, असा प्रस्ताव या पक्षाच्या नेत्यांनी भाजपपुढे ठेवला आहे.

भाजपबरोबरची युती संपुष्टात आल्याचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच जाहीर केल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती फिस्कटल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाने भाजपची सोबत करण्याचा निर्णय घेतला. त्याबदल्यात आठवले यांना आधी राज्यसभेची खासदारकी आणि नंतर केंद्रात मंत्रिपद देण्यात आले.

आता मुंबईसह अन्य महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपबरोबर युती करण्याचे रिपब्लिकन पक्षाने जाहीर केले आहे.  शुक्रवारी रात्री मुंबई भाजपचे अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार आणि रिपाइंचे नेते अविनाश महातेकर, सुमंतराव गायकवाड, गौतम सोनावणे, तानसेन ननावरे आदी पदाधिकारी यांच्यात जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे.