रविवार साधून मुंबई, ठाण्यात जाहीर सभांचा धडाका; परस्परांवर टीकेचे प्रहार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महानगर पालिका निवडणुकांचा दिवस जवळ येत असताना, रविवारचा मुहूर्त साधत भारतीय जनता पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी मुंबई व ठाण्यात जाहीर सभांचा धडाका लावला होता. भाजपकडून खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यत शिवसेनेला अत्यंत आक्रमक शैलीत लक्ष्य केले; तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जशास तसे उत्तर देत मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली. तर, राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांवर खास आपल्या बोचऱ्या शैलीत टीका करीत दोन्ही पक्षांच्या नेत्यांना धारेवर धरले.

जयस्वालप्रकरणी  गुन्हे का नाहीत?

‘ठाण्याचे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला जात होता, असे वक्तव्य करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत संबंधितांवर कारवाई का केली नाही’, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी ठाण्यातील वागळे इस्टेट येथील जाहीर सभेत उपस्थित केला. ‘जयस्वाल यांनीच ही माहिती आपल्याला दिली’, असे मुख्यमंत्र्यांनी शनिवारी जाहीरपणे सांगितले होते. ‘या प्रकरणी गुन्हा का दाखल केला नाही’, असे पवार म्हणाले. कळवा येथील जाहीर सभेत बोलताना, ‘मुख्यमंत्र्यांना गुंडगिरीबाबत बोलण्याचा नैतिक अधिकारच उरलेला नाही’, अशी टीका पवार यांनी केली.

भाजपकडून पुन्हा टोलमुक्तीचा राग

ठाणे : महाराष्ट्राला टोलमुक्त करण्याचे आश्वासन देत दोन वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या भाजपने यंदाच्या महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा टोलमुक्तीचा राग आळवला आहे. ‘ठाणे महापालिकेत सत्ता मिळाल्यास ठाणेकरांना टोलमुक्ती दिली जाईल’, असे आश्वासन रविवारी जाहीर झालेल्या पक्षाच्या वचननाम्यात देण्यात आले आहे.

‘स्वत:च्या गुहेत प्रत्येकजण वाघ’

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत आक्रमक टीका करीत, ‘नोटाबंदीमुळे तुमचाही काळा पैसा बुडाला की काय’, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी त्यांना उद्देशून जाहीर सभेत केला. ‘आपल्या गुहेत प्रत्येकजण वाघ असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानमध्ये लक्ष्यभेदी कारवाई करण्याची हिंमत दाखवली, तशी तुमच्यात आहे का’, असे शरसंधानही मुख्यमंत्र्यांनी उद्धव यांच्यावर केले. त्याचवेळी, ‘प्रचारसांगता सभेसाठी वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानाचा आग्रह मोठय़ा भावाच्या भूमिकेतून भाजप सोडून देत आहे.. उगाच त्यांचे रडगाणे नको’, असे सांगत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी सेनेला पुन्हा डिवचले.

वाघाशी खेळू नका..

‘वाघाशी खेळू नका, तो कधी फटका मारेल, ते समजणारही नाही’, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी भारतीय जनता पक्ष, व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना  गोरेगावमध्ये लक्ष्य केले. ‘सैनिकांच्या जीवावर राजकीय पोळ्या भाजणाऱ्या मुख्यमंत्र्यांची लाज वाटते’, असा हल्ला फडणवीस यांच्यावर करीत त्यांनी आपल्या टीकेची धार आणखी वाढवली. तर, दिंडोशी येथील सभेत बोलताना,  अशी कोणती बुद्धी पंतप्रधान  मोदी यांना  झाली व त्यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला’, असा प्रश्न केला.

मराठीतील सर्व मुंबई महापालिका निवडणूक २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp shiv sena and ncp giant leaders take rally in mumbai and thane
First published on: 13-02-2017 at 03:48 IST