पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी बाथरूमछाप राजकारण टाळायला हवे, असा खोचक सल्ला देत शिवसेनेने भाजपवर पुन्हा एकदा शरसंधान साधले आहे. पंतप्रधानांनी दिल्लीकडे व मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राकडे पाहावे. दुसऱ्यांच्या बाथरूममध्ये डोकावून पाहणे कुणालाच शोभत नाही, असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखात म्हटले आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाकयुद्ध दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील प्रचारसभेत बोलताना मुंबईची तुलना पाटण्याशी केली होती. याच मुद्द्यावरून शिवसेनेने मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत. जर मुंबईचे पाटणा झाले असे मुख्यमंत्री म्हणत असतील तर त्यांचे गृहखाते झोपले आहे काय? , असा रोकडा सवाल सेनेने मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

पाटणा शहर आता बऱ्यापैकी आकार घेत आहे व पारदर्शकतेच्या क्रमवारीत पाटणा नागपूरच्या वर आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांनी भाजपचा पराभव केल्यापासून पाटण्याची जनता अधिक सुरक्षित झाल्याचे बोलले जाते. त्यामुळे मुंबईत बसून पाटण्यावर हल्ले करण्यापेक्षा नागपूर शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष देणे गरजचे आहे. पाटण्याचे काय करायचे ते नितीशकुमार पाहतील. उत्तर प्रदेशचा निकाल जो लागायचा तो लागेलच. पंतप्रधानांनी दिल्लीकडे व मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राकडे पाहावे. बाथरूममध्ये डोकावून पाहणे (दुसऱ्यांच्या) कुणालाच शोभत नाही. हे टाळायला हवे, असे सामनातील अग्रलेखात म्हटले आहे.

याशिवाय, काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय विरोधकांच्या कुंडल्या बाहेर काढू, या धमकीवजा वक्तव्याचाही सेनेकडून समाचार घेण्यात आला आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी पक्षीय प्रचाराच्या शेणफेकीपासून दूर रहावे, असे आम्हाला वाटते. ज्या सरकारी कवचकुंडलात व शासकीय इतमामात तुम्ही प्रचारासाठी फिरता व बोलता तो एक प्रकारे निवडणूक भ्रष्टाचारच म्हणावा लागेल.पण तो आपल्या देशात राजरोस सुरूच आहे. मुख्यमंत्री व पंतप्रधान प्रचार सभांमध्ये जाऊन जे इशारे, धमक्या, घोषणा, वचने देत असतात ते कायद्याच्या कोणत्या चौकटीत बसते? विरोधकांच्या कुंडल्या तुमच्या हातात आहेत. कारण तुम्ही त्या सत्तेच्या खुर्चीवर जनतेच्या कृपेने आज विराजमान आहात. कुंडल्या काढून तुम्ही एकप्रकारे सत्तेचा गैरवापरच करीत आहात ना? अशा कुंडल्या काढण्यासाठी तुम्हाला लोकांनी सत्ता दिलीय असे वाटत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसुद्धा अधूनमधून ‘विरोधकांच्या कुंडल्या काढू, माझ्या हातात आहेत’ असे सांगत असतात. उद्या सत्तेवरून खाली उतरताच नव्या सत्ताधाऱ्यांच्या हाती तुमच्याही कुंडल्या लागू शकतात, अशा इशाराही सेनेने या अग्रलेखातून दिला आहे.