मतदान केंद्रांबाहेर विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना संकेत

कोणी खिशातून ‘भगवा’ रुमाल काढून हात हलवतोय, तर कोणी दुसऱ्याला बोलावताना ‘हाताचा पंजा’ दाखवतोय.. कोणी मनगटावरील ‘घडय़ाळ’ दाखवून वेळ सांगतोय, तर कोणी बाजूने जाणाऱ्या रेल्वे ‘इंजिना’कडे पाहून झुक्झुक् असा आवाज करतोय.. निवडणुकीच्या प्रचाराची वेळ रविवारी संध्याकाळी पाच वाजता संपूनही प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून निवडणूक आयोगाला चिमटीत पकडता येणार नाही, अशा पद्धतीने प्रचार सुरू होता.

वडाळ्यातील कमलानगर झोपडपट्टी येथे सकाळी साडेसात वाजता ८९ वर्षांच्या सावित्री पवार आपल्या दोन मुलींसह मतदानासाठी बाहेर पडल्या. केंद्राजवळ बसलेला काँग्रेसचा एक तरुण कार्यकर्ता या आजींना सामोरा आला आणि ‘काय आजी, बरे आहे ना..’ असे विचारत त्याने हाताचा पंजा आजींसमोर दाखवला. अनेक निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या पवार आजी हा हाताचा पंजा बघून गालातल्या गालात हसल्या आणि ‘सगळं उत्तम’ असे म्हणून मतदान करण्यासाठी पुढे गेल्या.

माहीम रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या मतदान केंद्रावरही असाच प्रकार घडला. रेल्वेमार्गावरून एक लांबपल्ल्याची गाडी जात असताना अचानक मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या गाडीकडे बोट दाखवून ‘इंजिन कसे छान खेचते गाडीला’ असे म्हणताच मतदारांमध्ये खसखस पिकली.

वांद्रे पश्चिमेकडे कलानगर परिसरात मतदानासाठी आलेल्या मतदाराला त्याच्या ओळखीच्या कार्यकर्त्यांने हाक मारली खरी, पण ती त्यावेळी त्याने खिशातून भगवा रुमाल काढला आणि तो रुमाल हातात फडकावत ही साद दिली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा असलेल्या वरळी नाका वगैरे भागात कार्यकर्ते मतदारांना घडय़ाळ दाखवून ‘काय दादा, किती वाजले? उशीर करू नका’ असे सांगत खुणावत होते. हे प्रकार निवडणूक आयोगाला चिमटीत पकडता येणारे नसल्याने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून अशा क्लृप्त्या सर्रास वापरल्या जात होत्या. त्यामुळे मतदान केंद्रांवरील वातावरण काहीसे हलकेफुलके होत असले, तरी मतदारांच्या निर्णयावर त्याचा प्रभाव पडण्याची शक्यताही काही मतदारांकडून वर्तवली जात होती.