कुठे उत्साह, कुठे नाराजी!

वर्सोवा, मढ, एरंगळ येथील कोळी महिलांनी पारंपरिक वेशात सकाळी जाऊन मतदान केले.

विक्रोळी येथील विकास हायस्कूलमध्ये भरउन्हात रांग लावून मतदारांनी मतदान केले. 2) मुलुंडच्या मनीषा फुलपगारे हिने बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शहराच्या विकासाच्या प्रश्नांवर मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर पोहोचलेल्या मुंबईकरांना ठिकठिकाणी अडथळय़ांचा सामना करावा लागला. मतदार याद्यांमधील गोंधळामुळे जवळपास शहरातील प्रत्येक भागांतून मतदारांच्या तक्रारी येत होत्या. काही ठिकाणी यावरून मतदार आक्रमक झाल्याचेही दिसले. त्यामुळे मंगळवारच्या दिवशी मुंबईतील मतदान प्रक्रियेत मतदार हाच घटक केंद्रस्थानी राहिला.

याचबरोबर नेहमीच निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी घडणाऱ्या घटनाही घडल्या. अशीच काही क्षणचित्रे.

‘व्हीआयपी’ किरीट सोमय्या यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपचे ‘डॅशिंग’

खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर चांगलेच शरसंधान केले. मुलुंड क्षेपणभूमीचा विषय धुमसता ठेवण्यापासून उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीचा वाद चेतवण्यापर्यंत अनेक गोष्टींमध्ये किरीट सोमय्या हिरिरीने पुढे होते. मुलुंडच्या उत्कर्ष शाळेतील मतदार यादीत नाव असलेले सोमय्या या शाळेत मतदान करण्यासाठी आले. या केंद्रावर सकाळपासूनच याद्यांमधील गोंधळामुळे नाराजी होती. सोमय्या यांनी गाडीतून उतरून मतदान केंद्रावर आपला क्रमांक येईपर्यंत ताटकळत उभ्या असलेल्या ‘मतदार राजा’च्या रांगेकडे नजर टाकली आणि थेट केंद्रात प्रवेश केला. पाचच मिनिटांत मतदानाचा आपला हक्क बजावत ते हसऱ्या चेहऱ्याने बाहेर पडले खरे, पण बाहेर उन्हात रांगेत उभ्या असलेल्या मतदारांच्या चेहऱ्यावर नाराजीचे रंग त्यांना पाहावे लागले. खासदार असले, तरी सोमय्या सर्वसामान्य मतदार म्हणून मतदान करायला आले होते. त्यांनी रीतसर रांगेत उभे राहून मतदान करणे अपेक्षित होते, अशी भावना मतदारांनी बोलून दाखवली.

माजी आमदारांचीही यादीमुळे वणवण

धारावी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व विधिमंडळात केलेले शिवसेनेचे माजी आमदार बाबूराव माने दुपारी दोनच्या सुमारास प्रभाग क्रमांक १८४ मधील होळी मैदान मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी हजर झाले. गेल्या पालिका निवडणुकीत माने यांचे नाव याच केंद्रावर होते. यंदा त्यांचे नाव शोधूनही न सापडल्याने ते हैराण झाले. कोणी तरी त्यांना शास्त्री नगर मतदान केंद्रावर त्यांचे नाव शोधण्याचे सुचवले. हे केंद्र थोडे लांब असूनही माने यांनी त्या केंद्रावर धाव घेतली, पण शास्त्री नगर मतदान केंद्रावरील यादीतही त्यांचे नाव नसल्याचे पाहून ते अचंबित झाले. याच भागातील रॉयल सिटी स्कूल या शाळेतही एक मतदान केंद्र होते. हे केंद्र शास्त्री नगर केंद्रापासून १५ ते २० मिनिटे अंतरावर होते. अखेर माने यांनी रॉयल सिटी स्कूल गाठले. तेथे सुदैवाने त्यांचे नाव मतदार यादीत सापडले आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावून सुटकेचा नि:श्वास सोडला.

तणाव, सौम्य लाठीमार

भांडुप येथील मंदार शाळा मतदान केंद्र आणि मानखुर्द येथील म्हाडा कॉलनी मतदान केंद्र या दोन ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण होते. एमआयएम आणि सपा या दोन पक्षांच्या उमेदवारांनी त्यांच्या मतदारांची नावे यादीतून वगळली गेल्याचा निषेध करत मतदान काही काळ रोखून ठेवले होते. मानखुर्द येथे हा निषेध मोडून काढण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. अखेर दुपारी परिस्थिती निवळली आणि मतदान पूर्ववत सुरू झाले.

‘अर्थ’पूर्ण व्यवहार!

एकीकडे मतदान केंद्रांवर गोंधळाच्या वातावरणात, तरीही उत्साहाने मतदान सुरू असताना दुसरीकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची ‘देवाण-घेवाण’ सुरू होती. वडाळ्यातील बन्सिधर अग्रवाल मॉडर्न हायस्कूल या केंद्राबाहेर एक व्यक्ती मतदानाला आलेल्या ओळखीच्या कुटुंबांना हेरून कुटुंब प्रमुखांना बाजूला बोलावत होती. त्यांच्यात काही ‘अर्थ’पूर्ण देवाणघेवाणही होत होती. त्याशिवाय ‘संध्याकाळी गल्लीत भेटा’, ‘रात्री ‘बसायचा’ कार्यक्रम नक्की केला आहे’, असे संवादही हमखास ऐकू येत होते.

धारावीतील एका रिक्षाचालकाने तर ‘मत अमुक अमुक पक्षाला देणार आहे. त्या पक्षातर्फे रात्री मेजवानी ठेवली आहे’, असेही सांगितले.

पारंपरिक वेशात कोळी महिलांचे मतदान

वर्सोवा, मढ, एरंगळ येथील कोळी महिलांनी पारंपरिक वेशात सकाळी जाऊन मतदान केले. याशिवाय मोठय़ा संख्येने कोळी नागरिकांनी मतदानासाठी उतरावे, असे आवाहन करीतही काही कोळी महिला फिरताना दिसत होत्या.

जेवण-पाण्याची व्यवस्था नसल्याची पोलिसांची तक्रार

मतदानाच्या दिवशी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना पाणी तसेच जेवणाची व्यवस्था नव्हती, अशी तक्रार अनेक बूथवरील पोलिसांनी केली. सकाळी सहा वाजल्यापासून आम्ही मतदान केंद्रावर होतो. परंतु मतदान केंद्रावर साधी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नव्हती. बाहेर जाऊन आम्हाला चहा घ्यावा लागला. सकाळी ११ वाजेपर्यंत पिण्याचे पाणीही मिळाले नाही, असे ते म्हणाले.

वांद्रय़ात उत्साह

वांद्रे पश्चिममधील पाली हिल, माऊंट मेरी यांसारख्या उच्चभ्रु वस्तीतील नागरिक मतदानासाठी उतरत नसल्याचे म्हटले जाते. मात्र यंदाच्या निवडणुकीत या भागातील नागरिक मोठय़ा संख्येने मतदानासाठी उतरले असल्याचे पाहावयास मिळाले. मात्र मतदार यादीतील गोंधळामुळे ज्येष्ठ नागरिकांना नाव शोधताना नाकीनऊ आले.

मतदान केंद्रावर मनसेची दिनदर्शिका

पाली हिल येथील ९५ प्रभागातील सेंट अँडय़्रूज या शाळेतील मतदान कक्षाच्या बाहेरच मनसे पक्षाची जाहिरात करणारी दिनदर्शिका आढळली. मात्र मतदान केंद्राच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होते.

माझ्या २१ वर्षांच्या मुलीचे नाव मतदार यादीत आहे, मात्र माझे नाव वगळण्यात आले आहे. पालिका मतदारांना मतदान करण्यासाठी प्रसिद्धी करावी, मात्र त्यांनी प्रथम कायदोपत्री गोंधळ दूर करावयास हवा. गेले दोन तास मी आमच्या प्रभागातील अनेक मतदान केंद्रांवर नाव तपासले. मात्र माझे नाव कुठेच नाही. ही आतापर्यंतची विस्कळीत निवडणूक आहे.

– मार्था शर्मा, माऊंट मेरी

आमच्या भागातील मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नाव मतदार यादीत आहे, मात्र माझे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले आहे. मी कायम मतदानाचा हक्क बजावतो. मात्र यंदा पालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका मतदारांना सहन करावा लागत आहे.

– आरिफ पावसकर, पाली हिल

मुळात अमुक एक टक्के मतदान झाले हे सांगण्याचा अधिकार आयोगाला नाही. शंभर गुणांच्या पेपरमध्ये प्रश्नच गायब आहेत. मग ते काय गुण देणार? त्यांच्याकडे प्रशिक्षित कर्मचारी नाहीत. मतदार ओळखपत्रांची प्रक्रिया गंभीरपणे केली तरच त्याचा खरा उपयोग होईल. त्यासाठी त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

भूषण वारे, मालवणी.

गिरगावमधील काही इमारतींमधील अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला मतदानासाठी कन्या शाळेत पोहोचले; परंतु तेथील मतदारयादीमध्ये या इमारतींमधील मतदारांची नावेच नसल्याचे समजले आणि एकच गोंधळ उडाला. 

– सागर बिवलकर, टिळकनगर, गिरगाव

लोकसभा, विधानसभा, पालिकेच्या निवडणुकांमध्ये आपण नियमितपणे मतदान करीत आलो; परंतु या वेळी मतदारयादीतून आपले नाव वगळण्यात आल्याचे पाहून धक्काच बसला. पत्नी आणि मुलाचे मतदारयादीत नाव असल्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला. आमच्या इमारतीमधील रहिवाशाचे १५ वर्षांपूर्वी निधन झाले. पण त्याचे नाव आजही मतदारयादीत आहे. हा सरकारी यंत्रणांचा गलथानपणा आहे.

– सुभाष सावंत, लँमिग्टन रोड

गेल्या १० वर्षांमध्ये झालेल्या लोकसभा, विधानसभा, पालिका निवडणुकांमध्ये आपण मतदानाचा हक्क बजावला होता. गिरगावातील विष्णूबाग मतदान केंद्रात मतदानासाठी गेल्यानंतर तेथील मतदारयादीत आपले नावच नसल्याचे समजले.  शिवसेनेच्या शाखेमध्ये जाऊन मतदारयादी तपासली. त्यातही माझे आणि माझ्या आईचे नाव नव्हते. मतदारांना कल्पना न देता यादीतून नावे कशी काय वगळण्यात आली?

– सुमित मोरे,  गिरगाव

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bmc elections 2017 mumbai voters voters complaints in bmc election

ताज्या बातम्या