लोकशाहीच्या उत्सवात मतदारांची जत्रा!

यंदा मात्र दुपारी बारा ते तीन या वेळेतही मतदारांमध्ये चांगलाच उत्साह होता.

मुंबईतील विविध मतदान केंद्रांवर मंगळवारी लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

 

मतदानासाठी मुंबईकर उत्साहाने घराबाहेर

‘शुभ प्रभात! आज मतदानाचा दिवस.. मतदान करून आपला हक्क बजावणार ना?’.. सकाळी सकाळी मुंबईकरांच्या मोबाइलवर व्हॉट्सअ‍ॅप तसेच लघुसंदेशाच्या माध्यमातून हा संदेश झळकला आणि मतदानाचा दिवस सुरू झाला. दर मंगळवारी नेमाने सिद्धिविनायकाला जाणाऱ्या भक्तांनीदेखील सकाळी सकाळी मतदान केंद्रांबाहेर रांगा लावायला सुरुवात केली आणि सकाळी नऊ-साडेनऊपासूनच शाई लावलेल्या डाव्या हाताच्या तर्जनीसह मतदारांची छायाचित्रे समाजमाध्यमांवर झळकण्यास सुरुवात झाली. ‘मी मतदान केले आणि तुम्ही?’ असा प्रश्न विचारत ‘पोस्ट’ केलेल्या छायाचित्रांची अहमहमिका सुरू झाली आणि मुंबईतील विविध मतदार केंद्रांवर रांगांमध्ये उभ्या असलेल्या मतदारांचा उत्साह  समाजमाध्यमांवरही उतू जाऊ लागला.  दहा-पंधरा दिवस मुंबईच्या गल्ल्यागल्ल्यांमध्ये, कोपऱ्यांवर, चौकाचौकांमध्ये चाललेली प्रचाराची धामधूम रविवारी संध्याकाळी ५ वाजता संपल्यापासूनच मंगळवारच्या मतदानाच्या दिवसाचे वेध कार्यकर्ते, उमेदवार आणि मतदार यांना लागले होते. सकाळी सातपासून विविध केंद्रांवर मतदान सुरू झाले आणि पहाटेचा फेरफटका मारून घरी परतणाऱ्या काही ज्येष्ठ नागरिकांनी गर्दी कमी असतानाच मतदानाचा हक्क बजावावा या विचाराने पहिल्यांदा मतदार केंद्रांकडे मोर्चा वळवला. सकाळपासूनच हळूहळू करत मतदान केंद्रांवर रांगा सुरू झाल्या. एरव्ही मुंबईत साधारण सकाळी सात ते बारा आणि दुपारी साडेतीन ते पाच या वेळेत मतदारांची संख्या जास्त असल्याचे अनुभवायला मिळते. यंदा मात्र दुपारी बारा ते तीन या वेळेतही मतदारांमध्ये चांगलाच उत्साह होता.

मुंबईत बोरिवली, दहिसर-कांदिवली या मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यवर्गीय अशी संमिश्र वस्ती असलेल्या परिसरापासून ते मालवणी, मनोरी, अंधेरी, कुरार व्हिलेज, सायनमध्ये कोळीवाडा, धारावी, माहिम-माटुंगा, प्रभादेवी अशा ठिकठिकाणी सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. मालाड पूर्वेकडील ज्ञानोदय विद्यालय, कुरार व्हिलेज, धारावी परिसर आणि भायखळ्यातील नागपाडा परिसरात दुपारीही मतदान केंद्रांवर तितकीच गर्दी होती. लोकांनी उन्हाचीही पर्वा न करता अनेक ठिकाणी उत्साहाने आणि घोळक्या-घोळक्याने जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला.

दादर, माहीममध्ये मतदानासाठीही चुरस

दादर-माहिम परिसरात जिथे कित्येक ठिकाणी तिरंगी लढती आहेत, चुरशीची स्पर्धा आहे अशा परिसरात लवकरात लवकर मतदान करण्यासाठी अगदी सकाळपासूनच मतदारांमध्येही चुरस लागल्याचे चित्र दिसून आले. पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आणि झोपडपट्टी परिसरातील रहिवाशांपासून गगनचुंबी इमारतीतील रहिवाशांपर्यंत प्रत्येक वर्गातील मतदार यंदा मोठय़ा उत्साहाने मतदानास उतरले होते. त्यामुळे मंगळवारी सकाळी अवघ्या चार तासांतच जवळपास १५ ते १६ टक्के मतदान पूर्ण झाले होते. दुपारी दीड वाजेपर्यंत मतदानाचा हाच टक्का ३२.१७ टक्के, तर साडेतीन वाजेपर्यंत एकूण ४१.३२ टक्के मतदान झाले.

उमेदवारांची चाचपणी

मतदान केंद्रांच्या बाहेर निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या माहितीचे लावलेले फलक हे या वेळी मतदारांसाठी मोठे आकर्षण ठरल्याचे दिसून येत होते. अर्थात, या फलकबाजीवरूनही अनेक उलटसुलट प्रतिक्रिया मतदारांमध्ये उमटल्या. बालमोहनच्या परिसरात हा फलक मतदान केंद्रासमोर मोठाच्या मोठा लावण्यात आला होता. या फलकांवर त्या त्या ठिकाणी निवडणुकीला उभ्या राहिलेल्या मतदारांची सारी माहिती, त्यांचे शिक्षण, संपत्ती, त्यांच्यावरचे गुन्हे, त्यांच्यावर असलेले कर्ज आणि कर्जाची थकीत रक्कम असा सगळा तपशील देण्यात आला होता. ज्या ठिकाणी हे बोर्ड चांगल्या पद्धतीने लागले होते तिथे मतदारांनी त्यावर नजर टाकून मगच मतदान कें द्रात प्रवेश केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई महापालिका निवडणूक २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bmc elections 2017 mumbai voting for bmc poll mumbai polling stations

ताज्या बातम्या