शिवसेना आणि भाजप यांची युती तुटल्याची घोषणा झाल्यानंतर आता मुंबईतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या ‘एकला चलो रे’ च्या  घोषणेमुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील आघाडीच्या चर्चेला एकप्रकारे नवसंजीवनी मिळाली आहे. गेले कित्येक दिवस राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्यास नकार देणारे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी अचानकपणे आपली भूमिका मवाळ करत राष्ट्रवादीशी चर्चा करायला तयार असल्याचे म्हटले आहे. मात्र, तत्पूर्वी शिवसेनेने केंद्र आणि राज्य सरकारला असलेला पाठिंबा काढून घ्यावा. जेणेकरून यामध्ये शिवसेना आणि भाजपची कोणताही चाल नसल्याचे सिद्ध होईल, असे निरूपम यांनी म्हटले.
यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर शरद पवार यांनीदेखील काँग्रेसच्या घोषणेमुळे मुंबईतील आघाडीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचे म्हटले होते. मात्र, त्यानंतरही काही कारणांमुळे राष्ट्रवादीशी युती केली जावी, असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये व्यक्त होताना दिसत होता. शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यास मुंबईत काँग्रेसला फटका बसू शकतो, असा निष्कर्ष नेतेमंडळींच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत काढण्यात आला होता. शिवसेना आणि भाजप यांची युती झाल्यास काँग्रेसचा पर्याय लोकांसमोर राहील, पण युती तुटली तर त्याचा फटका काँग्रेसला बसेल, असा सूर या बैठकीत व्यक्त करण्यात आला. याशिवाय, शिवसेना व भाजपला शह देण्याकरिता मुंबईतही आघाडी व्हावी, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मांडली होती. नगरपालिका निवडणुकांचा कौल लक्षात घेता भाजपशी लढा देण्याकरिता आघाडी व्हावी, असा दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांचा प्रस्ताव आहे. काँग्रेसमध्ये मात्र आघाडीवरून वेगवेगळे मतप्रवाह आहेत. नारायण राणे यांनी आघाडीच्या बाजूने ठाम भूमिका घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचीही आघाडी व्हावी, अशी भूमिका आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र आघाडीबाबत गुगली टाकली आहे. राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी करणार नाही, असे जाहीर करावे, अशी त्यांची मागणी आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे आघाडीला अनुकूल आहेत.