मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचा वाद उफाळून आला असतानाच मंगळवारी संध्याकाळी मुंबई काँग्रेसकडून ११५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये विरोधी पक्षनेत्यासह १९ नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये ९६ नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. मात्र, आता या यादीत काँग्रेसमधील प्रस्थापित नेत्यांच्या नातेवाईकांनाच संधी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यादीत आजी-माजी नगरसेवकांच्या पत्नी, वहिनी, मुलगी आणि मुलगा यांचा भरणा आहे. पक्षातील अंतर्गत वाद आणि बंडखोरी थोपविण्यासाठी आजी-माजी नगरसेवकांच्या कुटुंबातच तिकीटे देण्यात आल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय  निरुपम आणि माजी खासदार गुरुदास कामत यांच्यातील वाद उफाळून आला होता. या वादामुळे काँग्रेसमधून ७ नगरसेवकांनी पक्षाला सोडचिट्ठी  दिली आहे. यामध्ये कामत गटातील नगरसवेकांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर आणखी बंडखोर टाळण्यासाठी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी ही खबरदारी घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

काल जाहीर करण्यात आलेल्या या यादीत दिवंगत माजी नगरसेवक राजेंद्र चौबे यांचा मुलगा अभयकुमार चौबे यांना वॉर्ड क्रमांक ३ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. नगरसेवक सुरेश कोपरकर यांच्या पत्नी आशा कोपरकर यांना वॉर्ड क्रमांक ११०, वॉर्ड क्रमांक १४१ मधून सुनंदा लोकरे यांचे पती विठ्ठल लोकरे, वॉर्ड क्रमांक १४७ मधून राजेंद्र माहुलकर यांच्या पत्नी सीमा माहुलकर, वंदना साबळे यांचे पती गौतम साबळे यांना वॉर्ड क्रमांक १५१, सुनील मोरे यांच्या पत्नी सुप्रिया मोरे यांना वॉर्ड क्रमांक २०१, मनोज जामसूतकर यांच्या पत्नी सोनम जामसूतकर यांना वॉर्ड क्रमांक २१०, प्रमोद मांद्रेकर यांच्या पत्नी प्रिती मांद्रेकर यांना वॉर्ड क्रमांक २१९ आणि ज्ञानराज निकम यांची मुलगी निकीता ज्ञानराज निकम यांना वॉर्ड क्रमांक २२३ मधून उमेदवारी देण्यात आली आहे.

कामतांच्या मतदारसंघात एकालाही तिकीट नाही
काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत गुरुदास कामत यांच्या उत्तर -पश्चिम मतदारसंघातील प्रभागात एकालाही तिकीट देण्यात आले नाही. तसेच कांदिवलीमध्ये राहणा-यांना चारकोपमधून उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीवर निरुपम गटाचेच वर्चस्व असल्याचे स्पष्ट होत आहे.

चारकोपमध्ये राहणाऱ्यांना बोरीवलीमध्ये तिकीट
१) आशा कोपरकर
२) आशा कोपरकर
३) विठ्ठल लोकरे
४) सुप्रिया मोरे
५) निकीता निकम
६) सोनल जामसूतकर