मुख्यमंत्र्यांचे कांदिवलीत शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीकास्त्र

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प कोटय़वधी रुपयांचा असतानाही शहर पूर्णपणे विकसित का होऊ शकले नाही, असा सवाल करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नालेसफाई, रस्ते घोटाळ्याकडे अंगुलीनिर्देश केला. शिवसेनेचा उल्लेख न करता मुख्यमंत्र्यांनी पालिकेच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवत युतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

कांदिवलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या उत्तर भारतीय स्नेहसंमेलनात देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. करदात्यांचा पैसा भ्रष्टाचाराच्या माध्यमातून वाहत आहे. त्यामुळेच मुंबईचा पूर्णपणे विकास होऊ शकलेला नाही. पालिकेत होणारा भ्रष्टाचार आपण थांबवायला हवा. तरच मुंबई जगातील सर्वोत्तम शहर बनेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात भ्रष्टाचाराच्या विरोधात एक क्रांती सुरू केली आहे. या क्रांतीच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या प्रत्येक विभागात, पालिकेत सर्वत्र भ्रष्टाचारविरोधी मोहीम हाती घेतली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.