घाऊक ध्वजवंदनाचे कार्यक्रम; सत्यनारायण पूजांनाही मदत

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्षांची उमेदवारांची यादी अजून जाहीर झाली नसली तरी इच्छुकांनी मात्र वैयक्तिक स्तरावर प्रचाराचे रणिशग फुंकले आहे. यातच प्रजासत्ताक दिनाची संधी साधत अनेक इच्छुक उमेदवारांनी स्थानिकांच्या मदतीने घाऊक स्तरावर ध्वजवंदनाचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. याकरीता कार्यकर्त्यांमार्फत प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्याचे ‘संदेश’ आयोजक मंडळांना पाठविण्याची शक्कल अनेक उमेदवारांनी लढविली आहे. तर काही जण मंडळांच्या सत्यनारायण पूजांनाही ‘सढळ’ हस्ते मदत करण्याची तयारी उमेदवार दर्शवित आहेत. या बदल्यात फलकबाजी, पूजेला बसण्याचा, बक्षीस वाटपाचा मान मिळवून उमेदवार प्रजासत्ताक दिनी ‘चमकोगिरी’ची संधी साधून घेत आहेत.

परळ, लालबाग, शिवडी, वडाळा, दाद’  गिरणगाव परिसरातील अनेक चाळींमध्ये वा सोसायटय़ांमध्ये दरवर्षी प्रजासत्ताक दिनी सार्वजनिक सत्यनारायण पूजेचे आयोजन केले जाते. सकाळी ध्वजवंदन केल्यानंतर संध्याकाळच्या पूजा, सांस्कृतिक कार्यक्रम अशा भरगज्ज कार्यक्रमांची रेलचेल प्रजासत्ताक दिनी या ठिकाणी असते. पालिका निवडणुकीच्या तोंडावरच प्रजासत्ताक दिन आल्याने स्थानिक पातळीवर आयोजित केलेल्या कार्यक्रमांमधून इच्छुकगण आपला प्रचारही जोमाने करणार आहेत. इच्छुकांच्या निकटवर्तीयांकडूनच आयोजक मंडळांच्या कार्यकर्त्यांना ध्वजारोहण व सत्यनारायणाच्या पूजेच्या ठिकाणी उपस्थिती ‘दाखवण्या’बाबत विचारणा होत आहे. शिवाय कार्यक्रमाचा खर्च देण्याबाबतही इच्छुकगण उत्साह दाखवत आहे. या बदल्यात इच्छुक उमेदवारांच्या छायाचित्रांचे फलक लावण्याची अट असते. उमेदवारांना सत्यनारायण पूजेला बसण्याचा मान देणे, बक्षीस समारंभातून ‘चमकोगिरी’ची संधी उमेदवार साधत आहेत.

या सगळ्यात आयोजक मात्र हात साफ करून घेत आहेत. कार्यक्रमाचा बरासचा खर्च वेगवेगळ्या पक्षातील इच्छुकगण देत असल्याने आयोजकांची चंगळ झाली आहे. पालिकेच्या निवडणुकीसाठी पक्षांनी जरी उमेदवारांची यादी जाहीर केली नसली तरी उमेदवारी मिळण्याची आस मनी बाळगून स्थानिक पातळीवर स्वतचा जनसंपर्क वाढवण्यासाठी इच्छुक उमेदवार अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांची मदत घेत आहेत.