शिवसेना आणि भाजप यांची युती तुटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेल्या सूचक विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळीच रंगत येण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी मुंबईतील मेळाव्यात भाजपसोबतची युती तोडत आगामी काळात राज्यभरात एकट्याने भगवा फडकवणार असल्याची गर्जना केली. उद्धव यांच्या या घोषणेनंतर प्रसारमाध्यमांनी शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारली असता, इतके वर्ष एकत्र असणारे पक्ष वेगळे झाले, या गोष्टीचे अतीव दु:ख झाल्याचे म्हटले. विशेष म्हणजे यावेळी पवारांच्या चेहऱ्यावर मिष्किल हसू होते. त्यानंतर शिवसेनेने राज्य सरकारचा पाठिंबा काढल्यास राष्ट्रवादी सरकारला मदत करणार का, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. यावर मी जर तरच्या प्रश्नांची उत्तरे देत नाही. मात्र, एकदा निर्णय झाला की चर्चेला यावे, असे सांगत पवारांनी भाजपसाठी आपली दारे उघडी असल्याचे संकेत दिले. त्यामुळे आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीनंतरची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजपने शेवटच्या क्षणी शिवसेनेसोबतची युती तोडली होती. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. या अनपेक्षित धक्क्यातून सावरण्यास वेळ लागल्यामुळे या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकत सेनेवर सरशी साधली होती. मात्र, भाजप विधानसभेत बहुमत प्राप्त करु शकली नव्हती. त्यामुळे सत्ता स्थापनेच्यावेळी शिवसेना काही मुद्द्यांवरून अडून बसली होती. मात्र, त्यावेळीदेखील पवार यांनी अनपेक्षितपणे भाजपला पाठिंबा असल्याचे जाहीर करत शिवसेनेची किंमत शून्य करून टाकली होती. त्यामुळे विधानसभेत प्रत्यक्ष बहुमत सिद्ध करण्याच्यादिवशी सेनेला नाईलाजाने भाजपला पाठिंबा द्यावा लागला होता. मात्र, आता अडीच वर्षांच्या काळात परिस्थिती मोठ्याप्रमाणावर बदलली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या काही निर्णयांमुळे जनतेमध्ये नाराजी आहे. त्यामुळे आता भाजप पवारांच्या या प्रस्तावाला कशाप्रकारे प्रतिसाद देणार, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.

केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यापासून शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे मैत्रीपूर्ण संबंध नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केल्याने अनेकांच्या भुवयाही उंचावल्या होत्या. काही दिवसांपूर्वी झालेल्या सभेत नरेंद्र मोदी यांनी मी शरद पवार यांचे बोट धरून राजकारणात आल्याची जाहीर कबुली दिली होती. त्यामुळे शरद पवार यांना मिळालेला पद्मभूषण पुरस्कार ही गुरूदक्षिणा असल्याची चर्चाही रंगली आहे. उद्धव ठाकरे यांनीदेखील आजच्या भाषणात याचा उल्लेख केला.