उमेदवार निवडीसाठी भाजपची बैठक; रणनिती ठरवण्यासाठी महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती

प्रचारसभांच्या नियोजनासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक

maharashtra cabinet, ebc scheme
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई भाजपच्‍या उमेदवारयादीला अंतिम स्‍वरूप देण्‍यासाठी आणि मुंबईतील रणनिती ठरविण्‍यासाठी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. मुंबई भाजप अध्‍यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांच्‍या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला भाजपचे मुंबईतील खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. या निमित्‍ताने उमेदवार निवडीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. आज (रविवारी) तीन जिल्‍हयातील सुमारे १२० उमेदवारांची यादी अंतिम करण्‍यात आली तर उर्वरीत यादी उद्या तयार करण्यात येणार आहे.

भाजपाची निवडणूक तयारी जोरदार सुरू असून या संपूर्ण प्रक्रियेवर स्‍वतः मुख्‍यमंत्री लक्ष ठेवून आहेत. मुंबई भाजपाचे अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली मागील आठवडयात झालेल्‍या निवडणूक समितीच्‍या मॅरथॉन बैठकीत ५२७ जणांच्‍या नावाची यादी तयार करण्‍यात आली होती. त्‍याला आता अंतिम स्‍वरुप देण्‍यात येत आहे. आज (रविवारी) मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या उपस्थितीत आणि आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पुन्‍हा मुंबईतील सर्व भाजप खासदार, आमदार आणि जिल्‍हाध्‍यक्षांची बैठक वर्षा निवासस्‍थानी घेण्‍यात आली. या बैठकीत प्रचाराची रणनिती, सभा व प्रचार याबाबत चर्चा करण्‍यात आली. लवकरच भाजपची यादी आणि जाहीरनामा प्रकाशित करण्‍यात येणार असल्‍याची माहिती यावेळी प्रवक्‍ते अतुल शाह यांनी दिली.

या बैठकीला मंत्री विनोद तावडे, प्रकाश महेता, राज्‍यमंत्री विद्या ठाकूर, खासदार किरिट सोमय्या, पुनम महाजन, गोपाळ शेट्टी, आमदार राज पुरोहित, मंगलप्रभात लोढा, भाई गिरकर, मनिषा चौधरी, पराग अळवणी, प्रविण देरेकर, राम कदम, अमित साटम, योगेश सागर, अतुल भातकळकर, कॅप्‍टन तमिल सेलवन, आर. एन. सिंह, भारती लव्‍हेकर आदींसह संघटनमंत्री सुनिल कर्जतकर, गटनेते मनोज कोटक, आणि सर्व सहा जिल्‍हाध्‍यक्ष उपस्थित होते.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Important meeting of bjp leaders at cm bungalow to discuss strategy of mumbai corporation election

ताज्या बातम्या