शरद पवारांचे प्रतिपादन; मध्यावधी निवडणुकांचेही संकेत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपशी काडीमोड घेण्याच्या शिवसेनेच्या निर्णयानंतर राज्यातील सत्ताधारी युती सरकार अस्थिरतेच्या उंबरठय़ावर येऊन ठेपले आहे. या स्थितीत भाजपला पाठिंबा द्यायचा किंवा कसे याबाबतचा निर्णय एकत्र बसून घेण्यात येईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले. तसेच राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाकारता येत नसल्याचे संकेतही पवारांनी दिले.

विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने पवार कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते. मुंबईसह दहा महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २६ जानेवारी रोजी भाजपशी काडीमोड घेतला. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्यात सत्ताधारी असलेल्या युती सरकारचे अस्तित्व त्यामुळे धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. या सर्व पाश्र्वभूमीवर पवार यांना विचारले असता त्यांनी भाजपच्या पाठिंब्याबाबत वरीलप्रमाणे प्रतिपादन केले. ते म्हणाले की, ‘शिवसेनेने भाजपशी असलेली युती तोडण्याची घोषणा केल्याने राज्य सरकार आपोआपच अडचणीत आले आहे. अशा परिस्थितीत राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यताच अधिक वाटते. अशा निवडणुका झाल्याच तर समविचारी पक्षाला बरोबर घेऊन या निवडणुकांना सामोरे जाऊ’.

दरम्यान, शिवसेनेने राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यास राष्ट्रवादी पाठिंबा देणार काय, असे विचारले असता पवार यांनी ‘तूर्तास तसा विचार नाही. परंतु एकत्रित बसून आम्ही हा निर्णय घेऊ’, असे सांगत पाठिंब्याची शक्यता नाकारली नाही. एकाच वेळी मध्यावधी निवडणुकांचे संकेत आणि पाठिंब्याची तयारी दर्शवत पवारांनी या विषयावरील संदिग्धता कायम ठेवली आहे. राष्ट्रपती पदाबाबत मत व्यक्त करताना या पदी निवड होण्यासाठी आवश्यक संख्याबळ राष्ट्रवादीकडे नाही. त्यामुळे मला माझ्या मर्यादा माहीत असून या पदाबाबत मी फार आशावादी नाही, असे पवार यांनी अखेरीस सांगितले.

संजय निरुपममूर्ख माणूस

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची महापालिका निवडणुकांत आघाडी होण्यातील अडचणींबाबत विचारले असता पवार यांनी काँग्रेस नेत्यांवर तोफ डागली. मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांची संभावना त्यांनी ‘मूर्ख माणूस’ अशी केली. निरुपम यांचे महाराष्ट्राच्या विकासात काय योगदान आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, संजय निरुपम यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. विद्यमान परिस्थितीत राष्ट्रवादी नेमका कुणाचा पक्ष घेईल, याबाबत मात्र संदिग्धता कायम असल्याचे निरुपम म्हणाले. आघाडीबाबतची राष्ट्रवादीची भूमिका कायमच संशयास्पद राहिली असल्याचा आरोपही निरुपम यांनी केला. काँग्रेस आघाडीसाठी तयार असल्याचा दावाही निरुपम यांनी यावेळी बोलताना केला.

शिवसेना आता युती सरकारमधून बाहेर न पडल्यास सत्तेला चिकटून राहण्यासाठी हा पक्ष काहीही करू शकतो, असाच संदेश जनतेत जाईल.   शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस