युतीसाठी सन्मानपूर्वक प्रस्ताव येईल, अशी भाजपला प्रतीक्षा असली तरी त्यांना झुलवत ठेवण्याची खेळी शिवसेना करीत आहे. केवळ  ६० जागा देण्याची तयारी दाखवून भाजपला अवमानित केल्यावरही उदार होऊन त्या जागा दिल्या, असे सुनावल्याने भाजप नेत्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मात्र सरकारचे स्थैर्य महत्त्वाचे असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध व संयमाचीच भूमिका घेतली आहे. भाजपने ताकद वाढल्यामुळे ११४ जागांची मागणी करूनही शिवसेनेने केवळ ६० जागा देऊन खिल्ली उडविल्याने युतीची चर्चा थांबली आहे. शिवसेनेकडून अधिक जागा देण्याचा प्रस्ताव येईल, अशी आशा भाजप नेत्यांना वाटत आहे. मात्र कोणताही नवीन प्रस्ताव न देण्याची शिवसेनेची भूमिका आहे. शिवसेनेने स्वबळावर लढण्यासाठी उमेदवारांच्या मुलाखती व यादी तयार करण्याचे काम सुरू ठेवले आहे. भाजपनेही तशीच तयारी सुरू ठेवल्याने युतीची चर्चा होण्याची शक्यता नसल्याचे समजते.