शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेतला खरा पण, सत्तेतून बाहेर पडण्याची धमक सेनेत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. शिवसेना महाराष्ट्रात कुणाशीही युती करणार नाही, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपशी काडीमोड घेतल्याचे गुरूवारी मुंबईतील शिवसैनिकांच्या मेळाव्यात जाहीर केले. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले. गुळाला मुंगळा जसा चिकटतो, तशी शिवसेना अजूनही सत्तेला चिकटून आहे. निवडणुकीसाठी युती तोडली खरी, पण सत्तेतून बाहेर पडण्याची सेनेत धमक नाही, असे तटकरे यांनी सांगितले. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीदेखील शिवसेनेने केवळ दिखावा करू नये, हिंमत असेल तर सरकारमधून बाहेर पडावे, असे म्हटले.

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवसेनेला सत्तेतून बाहेर पडण्याचे आव्हान देत असतानाच दुसरीकडे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार काहीशी धुर्त खेळी केली आहे. शिवसेनेने राज्य सरकारचा पाठिंबा काढण्याचा निर्णय घेतलाच तर भाजपने आमच्याकडे चर्चेला यावे. आम्ही नक्कीच विचार करू, असे सांगत पवार यांनी भाजपपुढे टाळीसाठी हात पुढेल केला. याशिवाय, ‘एवढी वर्ष एकत्र काम करणाऱ्यांची युती तुटली याचं मला अतीव दु:ख वाटतं.’ अशी खोचक प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, उद्धव यांनी आपल्या भाषणात भाजपवर जोरदार हल्ला चढवत आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले. शिवसैनिकांनी मला वज्रमुठ द्यावी, दात मी पाडून दाखवतो. आता नव्या वर्षात मी तुमच्यासमोर शिवसेनेच्या नव्या वाटचालीची दिशा स्पष्ट करत आहे. महापालिका असेल, जिल्हा परिषद असेल, आता भविष्यात कुठेही युती करणार नाही. आता यापुढे लढाई सुरू झालेली आहे. मला आता एकच ध्यास आहे, ही संधी आहे, करीन तर आत्ताच आणि ते मी केल्याशिवाय राहणार नाही. तुमची साथ असल्यास भविष्यात शिवसेना महाराष्ट्रावर एकट्याने भगवा फडकवेल. या सत्तेमध्ये कोणीही वाटेकरी नसेल, ही सत्ता एकट्या शिवसेनेचीच असेल, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.