राज्य सरकारमधील शिवसेनेचे १२ मंत्री बॅग भरुन तयार आहेत, आम्ही फक्त आदेशाची वाट पाहत आहोत, असे वक्तव्य शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाई यांनी गोरेगावमधील मेळाव्यात केले.

तसेच शिवसैनिकांची इच्छा असेपर्यंतच आम्ही मंत्रिपदावर आहोत, असेही बोलायला ते विसरले नाही. राज्यातील निवडणुकीच्या तोंडावर सुभाष देसाईंचे हे वक्तव्य अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे. देसाई यांच्या दाव्याप्रमाणे शिवसेनेच्या १२ मंत्र्यांनी खरोखरच राजीनामा दिला तर राज्य सरकारला नव्याने बहुमत सिद्ध करावे लागेल.

त्यामुळे शिवसेनेच्या मेळाव्यात सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे यांनी केलेली वक्तव्ये प्रत्यक्षात उतरणार का, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.
आजच्या मेळाव्यात उद्धव यांच्या भाषणापूर्वी सुभाष देसाई यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी म्हटले की, ‘३ पायांची शर्यत आता खूप झाली, आम्ही एकटे महापालिकेवर भगवा फडकवायला समर्थ आहोत. शिवसैनिकांचीही तशीच इच्छा आहे. उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास पूर्ण ताकदीनिशी लढून ११४ जागा जिंकल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत सुभाष देसाई यांनी ‘एकला चलो रे’ची भूमिका जाहीर केली.

तर ठाण्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनीदेखील केव्हाही सत्तेतील मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी तयार असल्याचे सांगितले.

शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशापुढे मंत्रीपद मोठे नाही असे त्यांनी सांगितले. आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा घेतलेला निर्णय योग्य असून आम्ही शिवसेना पक्षप्रमुखांच्या निर्णयाच पालन करु, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली. शिवसैनिक आणि शिवसेना पक्षप्रमुखांमुळे मंत्रीपद मिळाली आहेत तर त्यांच्या आदेशापुढे मंत्रीपदाचा मोह आम्हाला नाही, म्हणूनच शिवसेना पक्षप्रमुखांचा आदेश आला तर मंत्रीपदाचा त्यागही आम्ही करू असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.