मुंबईत २८ जानेवारीला शक्तिप्रदर्शनाची तयारी

शिवसेनेच्या गुरुवारच्या मेळाव्यात स्वबळाचे रणिशग फुंकले जाण्याची शक्यता असल्याने त्यांना ‘त्याच जागी’  प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने गोरेगाव येथील एनएससी मैदानावर २८ जानेवारीला कार्यकर्त्यांचा जंगी मेळावा आयोजित केला आहे. युती तोडून स्वबळावर लढताना शिवसेनेकडून सत्ता हिसकावून घेण्याच्या तयारीत असलेल्या भाजपची ताकद काय आहे, याची प्रचिती दाखविण्यासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.

युतीसाठी सकारात्मक असताना शिवसेनेच्या आडमुठय़ा भूमिकेमुळे युतीच्या जागावाटपाची चर्चा थांबल्याची भाजपची भूमिका आहे. मात्र स्वबळावर लढताना भाजपही अजिबात कमी नाही, हे दाखवून देण्यासाठी लगेचच त्याच ठिकाणी जंगी मेळावा आयोजित करुन प्रत्युत्तर देण्याची रणनीती भाजपने आखली आहे. हा आमचा कार्यकर्ता मेळावा असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली तो होईल आणि राज्यातील अनेक नेते त्यास उपस्थित राहतील, असे मुंबई अध्यक्ष अ‍ॅड आशिष शेलार यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले. शिवसेनेकडून स्वबळाचे नारे दिले जाणार असल्याने सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप उत्सुक असून लवकरच चकमकी झडू लागण्याची चिन्हे आहेत.

फसवणूक म्हणजे भाजप;राणेंची टीका

ठाणे: कलंकित नेत्यांच्या पक्षात प्रवेश देण्यावरून भाजपामध्ये पक्षांतर्गत मतभेदाचे वारे वाहू लागले असतानाच याच मुद्दय़ावरून बुधवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी भाजपवर प्रहार केला. भाजपमध्ये सध्या भरती सुरू असून त्यामध्ये व्यक्तीचे स्वभाव आणि चारित्र्य पाहिले जात नाहीत. त्यामुळे या पक्षाची ध्येयधोरणे जनहिताची नसून राजकारणात स्वार्थ साधणारी आहेत, अशी टीका राणे यांनी केली आहे. ठाणे महापालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची मुलाखत घेण्यासाठी नारायण राणे बुधवारी ठाण्यात आले होते. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपवर  टीका केली. सत्तांतर झाल्याशिवाय मुंबईत दर्जेदारसुविधा मिळणार नाहीत. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली तर मुंबई जागतिक कीर्तीचे शहर बनवू, असा दावा राणे यांनी केला. फसवणूक म्हणजे भाजप असे आमचे घोषवाक्य असणार आहे, असेही त्यांनी सांगितले. मुंबई व ठाणे या दोन्ही शहरांत शिवसेना-भाजप युतीची २२ वर्षे सत्ता आहे. या काळात त्यांनी कोणत्या योजना राबविल्या आहेत आणि त्यापैकी एक तरी वैशिष्टय़पूर्ण आहे का, असा सवालही केला.