मुंबई  महापालिका निवडणुकीत शिवसेना- भाजपमधील युतीचा पेच अद्याप सुटला नसताना, शिवसेनेतील काही नगरसेवकांमधील वाद विकोपाला गेला आहे. दहिसर येथील एका उद्यानाच्या कार्यक्रमावरून आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार शिवसेनेचे नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी आपल्याच पक्षातील तीन नगरसेवकांच्या विरोधात केल्याने त्या नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर  या नगरसेविकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दाद मागितली आहे. या प्रकरणाची पक्षप्रमुखांनी गंभीर दाखल घेऊन  घोसाळकर यांच्या हकालपट्टीची आदेश  दिल्याची खात्रीदायक माहिती आहे . मात्र शिवसेनेकडून अजूनही  अभिषेक घोसाळकर यांच्या हकालपट्टीची अधिकृत घोषणा करण्यात  आली नाही. यानिमित्ताने निवडणुकीच्या तोंडावर सेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आहे आहे.


पालिका निवडणुकीची आचारसंहिता ११ जानेवारीपासून लागू झाली.  १४ जानेवारीला दहिसर मधील कर्मयोग या नुतनीकरण केलेल्या उद्यानात एका मंडळाने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला शिवसेनेच्या नगरसेविका व माजी महापौर शुभा राऊळ, शीतल म्हात्रे, व नामनिर्देशित नगरसेवक अवकाश जाधव हे उपस्थित होते. या उद्यानाचा उद्घाटन कार्यक्रम या तिन्ही नगरसेवकांनी परस्पर केला असून आचार संहिता भंग झाल्याची तक्रार नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी केली. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी  त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. त्यावर एका मंडऴाच्या निमंत्रणावरून आपण केवळ कार्यक्रमाला गेलो. तेथे पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह नव्हते शिवाय उद्घाटनचा कार्यक्रमही झालेला नाही. असे राऊळ यांनी सांगितले. मात्र या प्रकरणी पालिकेच्या अधिका-यांनी पुरेशी माहिती न घेता आमच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  अशा अधिका-यांविरोधात कारवाई करण्याची मागणीही पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान तिन्ही नगरसेवकांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे दाद मागून घोसाळकर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे . याबाबत पक्षप्रमुखांनी गंभीर दखल घेतली असून घोसाळकर यांची हकालपट्टी करण्याचे आदेश दिल्याची माहिती माजी महापौर राऊळ यांनी पत्रकारांना दिली.