पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील सभेची वाट पाहतो आहे. पंतप्रधान मोदींनी मुंबईत सभा घेऊनच दाखवावी, असे थेट आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चांदिवलीतील सभेत बोलताना दिले आहे. ‘आम्हाला भीक नको आहे. मुंबईकर हा प्रामाणिकपणे कर भरणारा आहे. मुंबईकरांना शिवसेना हवी. भाडोत्री माणसे नकोत,’ अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवर थेट निशाणा साधला आहे.

शिवसेनेला वारंवार पारदर्शकतेच्या मुद्यावरुन कोंडीत पकडणाऱ्या भाजपला उद्धव ठाकरेंनी धारेवर धरले. ‘मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शकच आहे. केंद्राच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालाने मुंबई महापालिकेच्या पारदर्शक कामकाजावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र पारदर्शक कारभाराचा आग्रह धरणाऱ्यांनी राज्यातील त्यांचे अल्पमतातील सरकार कोणाच्या पाठिंब्यावर तरले, हे एकदा पारदर्शकपणे राज्यातील जनतेला सांगावे,’ असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला.

‘मुंबई महापालिकेतील शिवसेनेचा कारभार पारदर्शकच आहे. मात्र केंद्राच्या आर्थिक सर्वेक्षणात भाजपची सत्ता असलेली नागपूर महापालिका कुठेच नाही. कारण भाजपचा नागपुरमधील कारभार अत्यंत वाईट आहे. मुंबईत प्रचारासाठी येणारे कोण आणि मदतीला धावून जाणार कोण, हे जनतेला माहिती आहे. अस्सल मुंबईकरांना मुंबईत फक्त शिवसेनाच हवी. भाडोत्री माणसे नकोत,’ अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपचा समाचार घेतला.

भाजपच्या मुंबईतील उमेदवारांनी रविवारी हुतात्मा स्मारकाजवळ पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराची शपथ घेतली. यावरदेखील उद्धव ठाकरेंनी तिखट शब्दांमध्ये टीका केली. ‘भाजपच्या उमेदवारांनी घेतलेली शपथ म्हणजे थोतांड आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या रक्षणाची शपथ घ्या. शिवसेना महाराष्ट्राचा तुकडा पडू देणार नाही,’ असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. ‘हुतात्मा स्मारकाजवळील शपथेच्या निमित्ताने का होईना, काही लोकांना मुंबई महाराष्ट्राला कशी मिळाली ते समजेल,’ अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावला.