उद्धव ठाकरे यांचे स्वबळाचे संकेत

राज्यात हिंदूू व मराठी माणसांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन ठाकरे यांनी केले आणि स्वबळाचेच संकेत दिले.

shivsena, uddhav thackeray, farmer issue
उद्धव ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

मोदींच्या जाहिरातबाजीवर टीकास्त्र; २६ जानेवारीच्या सेना मेळाव्यात युतीच्या काडीमोडावर शिक्कामोर्तब?

‘मी शेपूट घालणारा नाही,’ असे सुनावत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भाजपला आव्हान दिले. ‘जलिकट्ट’साठी तामिळनाडूत जी एकजूट दाखवून केंद्र सरकारला नमविले, त्याप्रमाणे राज्यात हिंदूू व मराठी माणसांनी एकजूट दाखवावी, असे आवाहन ठाकरे यांनी केले आणि स्वबळाचेच संकेत दिले. शिवसेनेने वचननाम्यामध्ये मुंबईकरांना जी आश्वासने दिली आहेत, त्यांची पूर्तता करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहिरातबाजीवर होत असलेल्या खर्चापेक्षा कमीच खर्च लागेल, असा टोला लगावत ठाकरे यांनी मोदी यांना पुन्हा ‘लक्ष्य’ केले आहे.  ‘सामना’ची भाषा तुम्हाला आवडो किंवा न आवडो, जहाल टीका करीतच राहणार, असे भाजपला सुनावत ठाकरे यांनी युतीबाबत २६ जानेवारीच्या मेळाव्यातच बोलणार असल्याचे स्पष्ट केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्ताने शिवसेनेने षण्मुखानंद सभागृहात आदरांजली समारंभाचे आयोजन केले होते. युतीची चर्चा थांबली असल्याच्या पाश्र्वभूमीवर ठाकरे काय बोलतात, याकडे सर्वाचे लक्ष लागलेले होते. मात्र ठाकरे यांनी युतीबाबत थेट भाष्य करणे टाळले. मराठी माणसाच्या मनगटातील ताकद शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दाखविली होती, याची आठवण करून देत ठाकरे यांनी सध्या निर्णायक टप्प्यावर आपण उभे आहोत, पण तुम्ही पाठीशी असाल, तर मला कोणाचीही भीती नाही, असे सांगितले. ‘सामना’तील लिखाणाबाबत आणि मोदी यांच्यासह भाजप नेत्यांवर केल्या जाणाऱ्या टीकेबाबत भाजपने वारंवार आक्षेप घेतले आहेत. पण हे आमचे शस्त्र आहे आणि कोणाला आवडो किंवा न आवडो, आम्ही चूक असेल त्यावर प्रखर टीका करीतच राहू, असे भाजपला सुनावले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई महापालिका निवडणूक २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Uddhav thackeray comment on alliance

ताज्या बातम्या