ठाकरे कुटुंबाचे निवासस्थान असणारे ‘मातोश्री’ म्हणजे शिवसेनेचे सत्ताकेंद्र.वांद्रे पूर्व येथे असणारे मातोश्री हे निवासस्थान लोकसभेच्या उत्तर-मध्य मतदार संघात येते. या मतदार संघाच्या खासदार आहेत भाजपाच्या पूनम महाजन. तर आमदार आहेत काँग्रेसचे झिशान सिद्दीकी. याचा अर्थ उद्धव ठाकरे राहतात त्या मतदारसंघात खासदार आणि आमदार शिवसेनेचा नाही. हा पूर्वीचा महानगर पालिकेचा वॉर्ड क्रमांक ९३ असून इथे शिवसेनेच्या नगरसेविका आहेत.

२०१७ साली रोहिणी कांबळे या निवडून आल्या होत्या. हा मतदार संघ शिवसेनेचे दिवंगत आमदार बाळा सावंत यांनी चांगला सांभाळला होता. त्यांच्या निधनानंतर झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत निवडून आल्या होत्या. त्यांनी या निवडणुकीत नारायण राणे यांचा पराभव केला होता. त्या नंतर झालेल्या  महापालिका निवडणुकीत या वॉर्डमधून शिवसेनेच्या रोहिणी कांबळे निवडून आल्या. मात्र आता २०२२ च्या महापालिका निवडणुकीच्या वेळी परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे.

२०१९ विधानसभा निवडणुकीत माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना शिवसेनेने उमेदवारी दिल्यामुळे तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केली. या बंडखोरीमुळे शिवसेनेच्या मतांचे विभाजन झाले आणि दोंघाच्या भांडणात काँग्रेसचा झेंडा या मतदार संघावर फडकला. नव्या वॉर्ड रचनेनुसार आता हा वॉर्ड क्रमांक ९५ आहे. तृप्ती सावंत यांच्या बंडखोरीमुळे या मतदार संघाची सर्व समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे मातोश्री असलेल्या वॉर्ड क्रमांक ९५ मध्ये अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी  शिवसेनेला संघर्ष करावा लागणार आहे.