शिवसेनेसाठी शिवाजी पार्कचे विशेष आणि अनन्य साधारण असं महत्वं आहे. आधी विविध सभांसाठी आणि त्यानंतर दसरा मेळाव्यामुळे, या भागात अससेले शिवसेना भवन, राज ठाकरे यांचे निवासस्थान, बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ, हाकेच्या अंतरावर असलेली चैत्यभुमी, सावरकर स्मारक, चौपाटी यांमुळे हा परिसर नेहमीच चर्चेत असतो. 

हा सर्व परिसर वॉर्ड क्रमांक १९१ मध्ये येतो. सध्या या वॉर्डच्या नगरसेविका आहेत शिवसेनच्या माजी महापौर विशाखा राऊत.हा भाग माहीम विधानसभा मतदारसंघात असून इथले आमदार आहेत शिवसेनेचे सदा सरवणकर.मात्र आता सदा सरवणकर यांनी शिवसेनेची साथ सोडून एकनाथ शिंदे यांचा हात धरला आहे.यापूर्वी सदा सरवणकर यांनी शिवसेना सोडली आणि नारायण राणे यांच्यासोबत कॉंग्रेसवासी झाले.या नंतर मनसेची स्थापना झाली.या काळात मनसेने संपूर्ण दादरवर महापालिका निवडणुकीत मनसेचा झेंडा फडकवला होता. संदीप देशपांडे या १९१ वॉर्डचे नगरसेवक झाले होते. 
यानंतर सदा सरवणकर पुन्हा शिवसेनेत आले.

२०१७ साली हा मतदारसंघ महिला आरक्षित झाल्यामुळे संदीप देशपांडे यांच्या पत्नीला उमदेवारी देण्यात आली. मात्र विशाखा राऊत यांनी त्यांचा पराभव केला. नव्या आरक्षणात सोडतीत या वॉर्डमध्ये आरक्षण राहीले नसल्याने मनसे नेते संदीप देशपांडे यांचा निवडणुक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तेव्हा सदा सरवणकर यामुळे सेनेत पडलेली फुट यामुळे मनसेसाठी- संदीप देशपांडेसाठी या वॉर्डमधून जिंकण्याच्या आशा वाढल्या आहेत.