13 August 2020

News Flash

अंत:स्थ संपदा हाच स्वर्ग

संपदा आपल्या आत आहे आणि आपण तिचा बाहेर शोध घेतो, मग आपल्याला अपयश येणारच.

प्रतिनिधिक छायाचित्र

ध्यान म्हणजे फक्त थोडंसं स्वत:च्या आतमध्ये वळणं.. आणि अचानक तुम्ही स्वामी होऊन जाता. काहीच कमी नसतं, काहीच हरवलेलं नसतं. तुम्हाला जे काही हवं ते पूर्वीपासूनच तुमच्या आत असतं. फक्त थोडं आतमध्ये वळा हे केवळ एका टप्प्यात घडू शकतं.  ते अचानकही होऊ शकेल, वीज चमकल्याप्रमाणे. तुमच्यामध्ये आत वळून बघण्याचं धैर्य किती आहे यावर ते अवलंबून आहे. धैर्यवान व्हा आणि स्वत:चा सामना करा..

ज्यांनी स्वत:च्या आतमध्ये बघितलं आहे आणि ज्यांना अंत:स्थ संपदा सापडली आहे, त्यांच्यासाठी आयुष्य नंदनवनासारखं होऊन जातं. नाही तर ते नरकासारखं आहे. आणि ज्यांनी ज्यांनी आत डोकावून पाहिलं आहे त्यांना हा अंत:स्थ खजिना गवसला आहे. मग वेळ वाया कशाला घालवायचा?

‘‘जरा आतमध्ये वळा, आतमध्ये शोधा. आपलं खरं वास्तव तिथेच आहे. आणि आश्चर्यातली आश्चर्याची बाब म्हणजे एकदा का तुम्हाला तुमची अंत:स्थ संपदा कळली की, तुमचं अवघं अस्तित्व अमर्याद सुंदर होऊन जातं, तुमच्या संपन्नतेचं प्रतिबिंब त्यात दिसू लागतं.

अस्तित्व हे एखाद्या आरशासारखं आहे. ते तुमचं प्रतिबिंब दाखवतं. तुम्ही संपन्न, संपूर्ण, समाधानी असाल तर ते तुमची संपन्नता, संपूर्णत्व, समाधान दाखवतं. तुम्ही दरिद्री, निराश असाल, तर तुमचं अस्तित्व ते तसंच दाखवतं. एकच अस्तित्व काही जणांसाठी नरकासारखं होऊन जातं, तर काही जणांना नंदनवनासारखं भासतं. हे सगळं तुमच्यावर अवलंबून असतं.

ध्यानाशिवाय हे जग म्हणजे नरक आहे.

सगळी जादू आहे ती ध्यानधारणेच्या कलेमध्ये. ध्यानाशिवाय सगळं जग नरकप्राय आहे, आयुष्य नरकासारखं भासतं. ध्यानामुळे ते स्वर्गवत आहे. संपदा आपल्या आत आहे आणि आपण तिचा बाहेर शोध घेतो, मग आपल्याला अपयश येणारच. प्रत्येक जण अपयशी होतो. जे अपयशी ठरतात, ते तर अर्थातच अपयशी असतात; आणि जे यशस्वी होतात, तेही अपयशीच असतात.

आपल्याकडे म्हण आहे- यशासारखं यशस्वी दुसरं काहीच नाही. मी या म्हणीशी सहमत नाही. मी म्हणतो, यशासारखं अपयशी काहीच ठरत नाही. तुम्ही अलेक्झांडर द ग्रेटला विचारा  तो अपयशी ठरला, कारण  ज्या कशात यश मिळवलं ते सगळं त्या पात्रतेचंच नव्हतं. ते कोणत्याही पद्धतीने त्याच्या अस्तित्वाचा विकास करणारं नव्हतं, ते त्याला अधिक संपन्न करणारं नव्हतं.

ते होते तसेच दरिद्री राहिले. खरं तर गरीब माणसाला त्याच्या आतल्या गरिबीची जाणीव कधीच होत नाही. हे भाग्य केवळ श्रीमंत माणसालाच मिळतं; त्याला त्याच्या आतल्या गरिबीची जाणीव होते. कारण, त्याच्याबाबत तुलना केली जाण्याची आणि विरोधाभास जाणवण्याची शक्यता असते. बाहेर तो खजिन्याच्या राशी रचत जातो आणि आत बघतो तेव्हा त्याला रितेपणा जाणवतो, केवळ रितेपणा.

धैर्यवान व्हा आणि स्वत:चा सामना करा.

ध्यान म्हणजे फक्त थोडंसं स्वत:च्या आतमध्ये वळणं.. आणि अचानक तुम्ही स्वामी होऊन जाता. काहीच कमी नसतं, काहीच हरवलेलं नसतं. तुम्हाला जे काही हवं ते पूर्वीपासूनच तुमच्या आत असतं. फक्त थोडं आतमध्ये वळा आणि सगळंच बदलून जातं. हे केवळ एका टप्प्यात घडू शकतं. ते हळूहळू होईल असंही नाही, ते अचानकही होऊ शकेल, वीज चमकल्याप्रमाणे. तुमच्यामध्ये आत वळून बघण्याचं धैर्य किती आहे यावर ते अवलंबून आहे. धैर्यवान व्हा आणि स्वत:चा सामना करा.

‘‘धार्मिक व्यक्ती आणि अ-धार्मिक माणूस यांच्यात हाच फरक असतो. धार्मिक नसलेला माणूस शांतता दुसरीकडे कुठेतरी शोधत राहतो, स्वत:च्या अस्तित्वात डोकावणं सोडून सर्वत्र शोध घेतो. तो सगळीकडे जातो आणि शोधतो. तो एव्हरेस्टवर पोहोचतो, तो चंद्रावर पोहोचतो; आता लवकरच ताऱ्यांमध्येही पोहोचेल. हा शोध मात्र अस्पष्ट असतो. तो काय करतोय हे त्यालाच स्पष्ट माहीत नसतं. तो का चंद्रावर जातोय हे त्यालाच नीट कळत नसतं.’’

‘‘आपण अजून या पृथ्वीलाही आनंदी करू शकलेलो नाही आहोत. मानवजातीपैकी अर्धी मरतेय, उपाशी

आहे आणि बाकीची अर्धी उपाशी नसली, तरी कोणत्याही बाजूने आनंदी निश्चित नाहीये. कदाचित शारीरिकदृष्टय़ा या माणसांचं योग्य पोषण होतंय, पण मानसिकदृष्टय़ा ते वेडसर होत चालले आहेत, त्यांचा समतोल हरवला आहे. संपूर्ण पृथ्वीवर अव्यवस्था माजलेली असताना आपण केवढा तरी पैसा,

तेवढी तरी बुद्धी आणि केवढे तरी प्रयत्न चंद्रावर पोहोचण्यासाठी लावतोय. कशासाठी? ’’

‘‘काहीतरी अस्पष्ट अशी इच्छा : आपल्याला हे इथे सापडत नाहीये, म्हणजे कदाचित ते दुसरीकडे कुठे असेल. आपण चंद्रावर जाऊ, मग मंगळावर जाऊ आणि मग आणखीही कुठे कुठे जात राहू.. आणि या विश्वला तर अंतच नाही.’’

‘‘धार्मिक व्यक्ती म्हणजे जी प्रथम स्वत:च्या आतमध्ये शोध घेते ती.’’

‘‘आणि हे किती तर्कशुद्ध वाटतं बघा : अन्यत्र कुठेही शोधासाठी जाण्यापूर्वी, किमान एकदा आतमध्ये डोकावून बघा. तुम्ही जे शोधत आहात, ते इथे नसेल तर मग जा अन्यत्र शोधासाठी. पण ज्याने कोणी आतमध्ये डोकावून बघितलं त्याला ते नेहमीच तिथे सापडलं आहे. याला कोणाचाही अपवाद नाही.

आयुष्याच्या काही सर्वात मूलभूत नियमांबाबत हे म्हणता येतं, ते कोणत्याही अपवादाशिवाय सिद्ध झालेले आहेत : ज्याने कोणी स्वत:च्या आतमध्ये पाहिलं तो श्रीमंत झाला, त्याला कधीही न संपणारा खजिना सापडला. त्याला दिव्य असं काहीतरी सापडलं, शाश्वत असं काहीतरी गवसलं.’’

ओशो, फिंगर पॉइंटिंग टू द मून, टॉक #१

सौजन्य : ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन

ओशो टाइम्स इंटरनॅशनल

भाषांतर – सायली परांजपे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2018 4:10 am

Web Title: article from finger pointing to the moon by osho
Next Stories
1 फसवा अर्थसंकल्प
2 हवा में उडता जाये
3 आपत्ती व्यवस्थापनाची अवस्था दयनीय
Just Now!
X