रविवार हा यंदाच्या बीएमएम अधिवेशनाचा शेवटचा दिवस. द्वारकानाथ संझगिरी यांनी मुख्य सभागृहात रसिकांच्या उपस्थितीत भारताचा माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्याशी संवाद साधला. याच कार्यक्रमाने दिवसाची सुरुवात झाली. इंग्लंड, वेस्ट इंडिज दौरे, जगातील नामवंत क्रिकेट खेळाडू, भारतीय संघातील कपिल देव, सुनील गावसकर आणि सचिन तेंडुलकर यांच्या अनेक आठवणी दिलीप वेंगसरकर यांनी रसिकांना सांगितल्या. ध्वनिचित्रफितीद्वारे काही गोष्टी दाखवल्याने कार्यक्रम अधिक वैविध्यपूर्ण वाटला. अधिवेशनाला आलेल्या अनेकांना परतीचा प्रवास रविवारी दुपारीच सुरु करावयाचा असल्याने यादिवशी मोजकेच कार्यक्रम ठरले होते.
“युवांकुर” कार्यक्रमात अनिकेत विश्वासराव, उमेश कामत , भार्गवी चिरमुले यांनी त्यांच्या सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमाचा सूत्रधार म्हणून अभिजीत खांडकेकर याची भूमिका रसिकांना विशेष भावली. त्याने प्रेक्षकांमध्ये जाऊन त्यांना बोलते केले आणि त्यांनाही कार्यक्रमात सहभागी करून घेतले. अमेरिकेत या आधी आले असले, तरी अनेक कलाकार प्रथमच बीएमएमच्या अधिवेशनाला आले होते. बीएमएमच्या मंचावर नव्या मराठी कलाकारांनी आपली कला सादर करण्याचे रसिकांनी मन:पूर्वक स्वागत केले. नृत्य आणि गाण्य़ाच्या या कार्यक्रमात अतिशा नाईक व वैभव मांगले यांनी विनोदी नाटयछटा सादर करून सर्वांची मने जिंकली. वैभव मांगले यांनी सादर केलेला (लतादीदीच्या नकलेसह) प्रत्येक आविष्कार रसिकांना खूप भावला.
या अधिवेशनात एक आगळा कार्यक्रम सादर झाला तो म्हणजे अमेरिकन व्यक्तींनी सादर केलेला भारतीय आणि पाश्चिमात्त्य संगीताचा मिलाफ असलेला “नटराज” हा वादयमेळ. नटराज म्युझिक.कॉम या साईटवर त्याविषयी अधिक माहिती मिळेल.
मिळाले नवे-जुने मित्र
अधिवेशनात चाईल्ड केअर सर्व्हिस अतिशय उत्तम होती, असे मत अनेक पालकांनी व्यक्त केले. अधिवेशनाला आलेले पालक मुलांना या चाइल्ड केअरमध्ये सकाळी ८.३०च्या सुमारास नेत असत आणि रात्री ११.३०ला घ्यायला येत. जेवणाच्या वेळा आणि दिवसभर पालक व मुलांचा संपर्क असे. काही कार्यक्रम बघायला मुले आई वडीलांबरोबरही राहू शकत. या चाइल्ड केअर सेंटरमध्ये मुले वेगवेगळे खेळ खेळत, पुस्तके वाचत. वेगवेगळ्या राज्यांतून आलेल्या अनेक मुलांची पहिल्याच दिवशी गट्टी जमली होती. दुस-या दिवसापासून त्या त्या मित्र मैत्रिणीचा उल्लेख पालकांशी बोलताना होत होता. एकमेकांचे फोन ई-मेल याची देवाणघेवाण झाली होती. या अधिवेशनाच्या निमित्ताने पालक आणि मुले दोघांनाही नवे जुने मित्र मिळाले. या पुढील बीएमएमचे अधिवेशन कॅलिफोर्नियातील लॉस अ‍ॅंजेलिसला होणार आहे. तेथील स्थानिक मराठी मंडळाला अधिवेशनाच्या तयारी करता मन:पूर्वक शुभेच्छा!