अवनीश पाटील avnishpatil@gmail.com

लो. टिळक व ना. गोखले यांच्या तुलनात्मक अभ्यासाने आपल्या इतिहासलेखनाचा प्रारंभ करणारे, भारत-पाकिस्तानच्या इतिहासाचे अभ्यासक प्रा. स्टॅनले वोल्पर्ट यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्या लेखनाविषयचे हे टिपण..

Did Marathas renamed Ramgarh as Aligarh
मराठ्यांनी रामगढचे अलिगढ असे नामांतर केले? इतिहासकार डॉ. उदय कुलकर्णींनी मांडलं सत्य
once upon a tome the misadventures of a rare bookseller book review
बुकमार्क : पुस्तकवेडे आणि बाकीचे सगळे!
NCERT tweaks Class 12th History book: Harappans indigenous, doubts over Aryan migration
एनसीईआरटी अभ्यासक्रमात बदल; ‘आता आर्य भारतातलेच’, काय सांगते नवे संशोधन?
shree ram mandir
१२वीच्या पुस्तकातून बाबरी पतनाचा उल्लेख गायब…

भारत आणि पाकिस्तानच्या इतिहासाचे अभ्यासक प्रा. स्टॅनले वोल्पर्ट यांचे अलीकडेच (१९ फेब्रुवारी) निधन झाले. ते कॅलिफोर्निया विद्यापीठात इतिहास विषयाचे प्राध्यापक होते. भारतीय व पाकिस्तानी लोकनेत्यांचा चरित्रात्मक इतिहास त्यांनी लिहिला.

न्यू यॉर्कमध्ये १९२७च्या २३ डिसेंबर रोजी एक रशियन ज्यू कुटुंबात जन्मलेल्या वोल्पर्ट यांनी मरिन इंजिनीअिरगचे शिक्षण घेतले. या शिक्षणामुळे आपल्याला जगभर प्रवास करायला आणि वेगवेगळ्या देशांबद्दल लेखनही करायला मिळेल, अशी त्यांची धारणा होती. तसे झालेही. १९४७ ते १९५१ या काळात आशियाई, युरोपीय आणि लॅटिन अमेरिकी देशांचा प्रवास त्यांनी केला. या प्रवासात १९४८च्या फेब्रुवारीत त्यांचे जहाज मुंबई बंदरावर आले. योगायोग असा की, वोल्पर्ट मुंबई बंदरावर उतरले त्या दिवशी महात्मा गांधींची रक्षा विसर्जित करण्याचा कार्यक्रम सुरू होता. श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रचंड मोठय़ा संख्येने उपस्थित राहिलेल्या जनसमुदायाला पाहून त्यांना आश्चर्य वाटले. तोवर वोल्पर्ट यांनी म. गांधींबद्दल फारसे ऐकलेले नव्हते. त्यामुळे गांधीजींसाठी शोकाकुल झालेल्या सामान्य जनांच्या महासागराला पाहून त्यांना कुतूहल वाटले. त्याआधी त्यांनी असा जनसमुदाय कधीच पाहिलेला नव्हता. वोल्पर्ट भारतात जवळपास तीनेक महिने राहिले. या काळात त्यांनी भारताचा इतिहास आणि इथली संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पुढे प्रवास संपवून ते १९५१ मध्ये अमेरिकेला परतले आणि त्यांनी मरिन इंजिनीअिरगचा व्यवसाय सोडून दिला. याचे कारण त्यांच्यात भारतीय इतिहासाबद्दल प्रचंड जिज्ञासा निर्माण झाली होती. त्यातून त्यांनी मग इतिहास अभ्यासण्याचा निर्णय घेतला. त्या काळात पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठात दक्षिण आशियाई देशांचा अभ्यास करण्यासाठीचे केंद्र स्थापन झाले होते. ‘भारतीय इतिहास’ या विषयात पदवी देणारे अमेरिकेमधील हे एकमेव अभ्यासकेंद्र होते. वोल्पर्ट तिथे दाखल झाले. भारतीय इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी संस्कृत आणि मराठी भाषाही शिकून घेतल्या.

वोल्पर्ट यांना आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये रुची निर्माण झाली होती. लोकमान्य टिळक आणि नामदार गोखले यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाने त्यांना आकर्षित केले होते. वोल्पर्ट यांनी आपल्या पीएच.डी. पदवीसाठी लो. टिळक आणि ना. गोखले यांच्या सामाजिक आणि राजकीय विचारांचा तुलनात्मक अभ्यास केला. यासाठी १९५७ साली वोल्पर्ट पुण्याला आले. त्यांनी टिळकांच्या ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या वृत्तपत्रांचा सखोल अभ्यास केला. ना. गोखलेंच्या ‘सव्‍‌र्हण्ट्स ऑफ इंडिया सोसायटी’ची कागदपत्रे त्यांनी बारकाईने वाचली. वोल्पर्ट पुण्यामध्ये जवळपास एक वर्ष राहिले. टिळक व गोखले यांच्याबरोबर संबंध आलेल्या अनेकांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या. पुढे १९६२ मध्ये हाच पीएच.डी. प्रबंध वोल्पर्ट यांनी ग्रंथ स्वरूपात प्रकाशित केला. ब्रिटिश राजवटीला टिळक आणि गोखलेंनी वेगवेगळा प्रतिसाद का दिला, या प्रश्नाचा वेध घेण्याचा प्रयत्न त्यांनी या ग्रंथात केला आहे. हा ग्रंथ म्हणजे दुहेरी चरित्र लेखनाचा एक उत्कृष्ट नमुना ठरावा. वोल्पर्ट यांनी त्यात टिळकांनी क्रांती आणि गोखलेंनी सुधारणेसाठी कसे प्रयत्न केले होते, हे दाखवून दिले आहे. क्रांती आणि सुधारणा या दोन विचारधारांचे प्रतिनिधित्व करीत टिळक आणि गोखले यांनी भारताची राजकीय विचारधारा समृद्ध केली. वोल्पर्ट यांच्या मते, पुढील काळात म. गांधी यांनी क्रांती आणि सुधारणेच्या परस्परभिन्न परंपरांना एकत्रित आणले, तर जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचे एकत्व टिकवून ठेवले.

महापुरुषांच्या भावना, संवेदना आणि मानस त्यांच्या कार्यकर्तृत्वावर कसा परिणाम करीत असातात, या गोष्टीचा उलगडा करण्यात वोल्पर्ट यांना सुरुवातीपासूनच रुची होती. एखाद्या व्यक्तीच्या चरित्राचा अभ्यास करताना निर्माण होणाऱ्या आव्हानांची त्यांना पूर्ण जाणीव असायची. आपल्या अभ्यास पद्धतीचे वर्णन करताना त्यांनी व्यक्तीची निर्णायक भूमिका मान्य केली आहे. मात्र काळ व अवकाश व्यक्तीवर अनेक बंधने निर्माण करीत असतो, हेही त्यांना मान्य होते. थोर नेत्यांचा चरित्रात्मक इतिहास म्हणजे इतिहास केवळ त्यांनीच घडवला हे सांगणे नसते, तर त्यांच्या विचार-कृतीवर परिस्थिती आणि विविध सामाजिक संस्थांचा प्रभाव कसा पडतो, हेही सांगणे आवश्यक असते.

वास्तविक एखाद्या महापुरुषाने आपल्या जीवनातील प्रसंगांना दिलेला प्रतिसाद कशा प्रकारे तर्कसंगत होता, हे सांगण्यावर इतिहासकारांचा भर असतो. व्यक्तीच्या भावना, संवेदना, आवेश आणि वासना यांनी तिच्या कृतीवर कसा परिणाम केला, या प्रश्नाला इतिहासकार फार महत्त्व देत नाहीत. तथापि, इतिहासकाराला याची जाणीव असते की, व्यक्तीने आपल्या जीवनात केलेल्या अनेक गोष्टी या तर्कविसंगत असतात. व्यक्तीच्या अहंभाव व भावनिक संवेदनांवर समाजामध्ये प्रचलित चालीरीती, रीतिरिवाज आणि परंपरा यांचा ठसा उमटत असतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या कृत्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी फक्त त्याच्या मानसिकतेचे अथवा तत्कालीन समाजाचे विश्लेषण करणे पुरेसे ठरत नाही. वोल्पर्ट यांच्या मते, या दोन्ही गोष्टी एकत्रित आणल्या तरच कोणत्याही महापुरुषाच्या जीवनाचा योग्य इतिहास लिहिला जाऊ शकतो. वोल्पर्ट यांनी हा मनोवैज्ञानिक दृष्टिकोन वापरलेला दिसतो. कॅलिफोर्निया विद्यापीठातील त्यांचे सहकारी आणि मनोविश्लेषणात्मक इतिहासकार पीटर लोवेनबर्ग यांच्या विचारांची त्यांच्यावर मोठी छाप होती.

लो. टिळक आणि ना. गोखले यांची कागदपत्रे वाचताना वोल्पर्ट यांना जॉन मोर्ले यांचा संदर्भ वारंवार आलेला दिसला. जॉन मोर्ले हे सन १९०५ ते १९१० या काळात ब्रिटिश प्रशासनात ‘भारत मंत्री’ या पदावर कार्यरत होते. वोल्पर्ट यांच्या लक्षात आले की, ना. गोखलेंनी आपल्या लिखाणात मोर्ले यांची नेहमीच स्तुती केली, तर लो. टिळकांनी मात्र त्यांच्यावर कडक टीका केली. भारताच्या दोन लोकप्रिय नेत्यांनी मोर्ले यांच्याबद्दल घेतलेल्या परस्परविरोधी भूमिकांमुळे वोल्पर्ट यांचे कुतूहल चाळवले. मग त्यांनी लंडन येथील इंडिया ऑफिस रेकॉर्ड्समधील मोर्लेशी संबंधित सर्व कागदपत्रे अभ्यासली. त्याचे फलित म्हणजे ‘मोर्ले अ‍ॅण्ड इंडिया, १९०६-१९१०’ हा १९६७ सालचा ग्रंथ!

वोल्पर्ट यांनी लिहिलेली महंमदअली जिना आणि जवाहरलाल नेहरू यांची चरित्रे वादग्रस्त ठरली. ‘जिना ऑफ पाकिस्तान’ (१९८४) या चरित्रावर पाकिस्तानचे तत्कालीन कट्टरपंथीय राष्ट्राध्यक्ष झिया उल हक यांनी बंदी घातली. वोल्पर्ट यांनी या पुस्तकात जिना यांना डुकराचे मांस आणि विदेशी मद्य प्रिय असल्याचा उल्लेख केला होता. त्यावर पाकिस्तानातील कट्टरपंथीयांनी आक्षेप घेतला. परंतु पुढे १९८९ साली बेनझीर भुत्तो यांनी या पुस्तकावरची बंदी उठवली. जिना यांच्यावर संशोधन करीत असताना वोल्पर्ट यांना झुल्फिकार अली भुत्तोंविषयीही कुतूहल निर्माण झाले. कराची येथे ठेवलेली झुल्फिकार अलींची कागदपत्रे वोल्पर्ट यांना अभ्यासण्यास बेनझीर भुत्तोंनी खुली केली. ती अभ्यासून वोल्पर्ट यांनी ‘झुल्फी भुत्तो ऑफ पाकिस्तान : हिज लाइफ अ‍ॅण्ड टाइम्स’ हे चरित्र १९९३ साली प्रसिद्ध केले.

वोल्पर्ट यांनी लिहिलेल्या नेहरू चरित्राचीही खूप चर्चा झाली. ‘नेहरू : अ ट्रीस्ट विथ डेस्टिनी’ (१९९६) हे ते चरित्र! या पुस्तकात त्यांनी काही विवादास्पद विधाने केली. नेहरू हे इंग्रजांचे प्रशंसक होते, इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांचे एका तरुणाबरोबर समलिंगी संबंध होते.. अशी कोणताही पुरावा नसलेली विधाने त्यांनी या पुस्तकात केली आहेत. नेहरू आणि एडविना माऊंटबॅटन यांच्या संबंधांविषयीही त्यांनी निराधार दावे केले होते. या वादग्रस्त विधानांमुळे हे पुस्तक काही काळ चर्चेचा विषय बनले. वोल्पर्ट यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले होते की, त्यांना नेहरू आणि एडविना यांच्यामधील पत्रव्यवहार वाचायला मिळाला नाही. वास्तविक या पत्रव्यवहाराच्या दोन पूर्ण प्रती अस्तित्वात होत्या. एक प्रत लॉर्ड माऊंटबॅटन यांचे नातू लॉर्ड रॉमसे यांच्याकडे व दुसरी प्रत सोनिया गांधींकडे होती. परंतु दोघांनीही वोल्पर्ट यांना पत्रे देण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे तो पत्रव्यवहार त्यांना अभ्यासता आला नाही.

वोल्पर्ट यांनी इतिहासलेखन केले तसे ऐतिहासिक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यांची ‘नाइन आवर्स टु रामा’ (१९६२) ही कादंबरी बरीच वादग्रस्त ठरली. ३० जानेवारी, १९४८ रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधीजींची हत्या केली. ही कादंबरी या घटनेचा एक काल्पनिक वृत्तांत होता. कादंबरीत वोल्पर्ट यांनी नथुराम गोडसेसंबंधी अनेक काल्पनिक गोष्टींचा अंतर्भाव केल्याने भारत सरकारने या कादंबरीवरही बंदी घातली. पुढे १९७० मध्ये त्यांनी ‘अ‍ॅन एरर ऑफ जजमेंट’ ही जालियानवाला बाग हत्याकांडावर आधारित कादंबरी लिहिली होती.

सन १९९८ मध्ये वोल्पर्ट पुन्हा भारतात आले. ज्या दिवशी ते भारतामध्ये उतरले, त्याच दिवशी भारताने अणुचाचणी केली होती. भारत आणि पाकिस्तानमध्ये अणुचाचणीमुळे तणाव निर्माण झाला. अणुचाचणीस भारतातील कोणत्याही व्यक्तीने ठोस विरोध केला नसल्याचे पाहून वोल्पर्ट चकित झाले, कारण त्यांनी गांधीजींचा प्रभावही पाहिला होता आणि ही घटना गांधीजींच्या विचाराला पूर्णपणे विरोधाभास दर्शवणारी होती. त्यांनी भारतीय समाजात हा विरोधाभास का निर्माण झाला, या प्रश्नाचा शोध घेण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी गांधीजींच्या चरित्राचा सखोल अभ्यास केला. त्यातून ‘गांधीज् पॅशन : द लाइफ अ‍ॅण्ड द लीगसी ऑफ महात्मा गांधी’ हे पुस्तक लिहिले. २००३ साली ते प्रसिद्ध झाले. तसेच ‘शेमफूल फ्लाइट’ (२००६) हे भारताच्या फाळणीवरील किंवा ‘इंडिया अ‍ॅण्ड पाकिस्तान’ (२०१०) हे भारत-पाकिस्तान संबंधांवरचे वोल्पर्ट यांचे पुस्तक असो, इतिहासलेखनाची अनवट वाट चोखाळणारा इतिहासकार म्हणून ते नेहमीच स्मरणात राहतील.

लेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत. त्यांचा ईमेल :