साहित्य-संगीत, नाट्य-चित्रपट आणि क्रीडा अशा सर्व क्षेत्रातले मान्यवर आणि मातब्बर जुलै २०१३ मध्ये होणार्‍या बीएमएम (बृहन्महाराष्ट्र मंडळ) अधिवेशनाच्या व्यासपीठावर झळकणार आहेत. या सर्वांची उपस्थिती निश्चित झाल्यानं, या १६ व्या अधिवेशनाच्या तयारीत चांगलीच रंगत आली आहे. 
सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता महेश मांजरेकर या अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे असतील; आणि प्रसिद्ध विज्ञानलेखक तसंच विज्ञान-प्रचारक डॉ. बाळ फोंडके यांना प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे. मांजरेकर यांच्या उपस्थितीनं नाट्य-चित्रसृष्टीतील ‘मराठी ग्लॅमर’ या अधिवेशनाला लाभेल, तर डॉ. फोंडके यांच्या प्रभावी वक्तृत्वामुळे मराठी विचारधारेतल्या आणि साहित्यातल्या एका सशक्त प्रवाहाचा उपस्थितांना आणखी एकदा परिचय होईल.
‘विक्रमवीर’ प्रशांत दामले यावेळी जरा वेगळ्या रुपात रंगमंचावर अवतरणार असून, या गायक-अभिनेत्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, ते खुल्या गप्पांमधून रसिकांसमोर येणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक विजय केंकरे त्यांच्याशी संवाद साधतील. त्याचबरोबर, भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर हेही मुलाखतीद्वारे रसिकांना सामोरे जाणार असून, सुप्रसिद्ध स्तंभलेखक द्वारकानाथ संझगिरी त्यांची मुलाखत घेतील.
बीएमएमच्या अधिवेशनात कोणतं नाटक येतं, याकडे अमेरिकेतील नाटकप्रेमी नजर लावून असतात. यावेळी सुकन्या कुलकर्णी, अजित भुरे, अद्वैत दादरकर आदींच्या भूमिका असलेलं, ‘एकदंत क्रिएशन्स’ निर्मित आणि विजत केंकरे दिग्दर्शित ‘फॅमिली ड्रामा’ रसिकांच्या भेटीला येत आहे.
त्याबरोबर यावर्षी रसिकांना संगीत-नाटकाचीही मेजवानी मिळणार आहे. राहुल देशपांडे यांनी पुनरुज्जीवित केलेलं ‘संगीत मानापमान’ यावेळी सादर होणार आहे. नव्या रुपातलं, नव्या संचातलं हे ‘मराठी म्युझिकल’ नव्या पिढीलाही आवडेल, अशी आयोजकांना खात्री वाटते.
बीएमएम सारेगम २०१३ या संगीतस्पर्धेच्या अंतिम फेरीचा सोहळा या अधिवेशनात होणार आहे. या सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेत्री प्रिया बापट करणार असून, प्रशांत दामले हेही या सोहळ्यात ‘स्पेशल गेस्ट’ म्हणून सहभागी होतील. येत्या जुलैमधे होणार्‍या बीएमएम अधिवेशनाच्या निमित्ताने अनेक उत्तम सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक आणि आर्थिक उपक्रम होत आहेत.