News Flash

संपूर्णपणे जगा

भिंतीवर उलटय़ा चिकटलेल्या पालीला वाटत असतं की, तिच्याच आधारावर घर तोललं जातंय.

| February 11, 2017 01:13 am

जो भूतकाळासाठी मृत होतो, तोच वर्तमानात जगतो. तुम्ही जे होता ते विसरून जा. जे आहात त्याला ओळखा. या दोन गोष्टी अगदी भिन्न आहेत, तुम्ही जे होतात ते आज नाही. आज जे आहात ते पूर्वी कधीच नव्हता. भूतकाळासाठी प्रत्येक क्षणी मरत जा. गेलं ते गेलं. आहे ते आहे. त्याच्याबद्दल पूर्ण जागृत व्हा, त्यात संपूर्णपणे जगा म्हणजे भार नाहीसा होईल.

ईश्वर थांबलेला नाही म्हणून तो रोज नवीन नवीन गोष्ट उत्पन्न करू शकतो, नाहीतर रोज अनेक राम, कृष्ण आले असते. तुम्हा-आम्हाला कधी उत्पन्नच केलं नसतं. कारण तुम्ही अगदी नवीन आहात. फोर्डच्या मोटारी जशा रोज एकसारख्या अनेक निघत असतात. एकसारख्या हजार असू शकतात; पण लाख माणसं एकसारखी असू शकत नाहीत. जे रोप एकदा उगवतं ते पुन्हा उगवत नाही. दोन पानं एकसारखी नसतात. दोन दगडही सारखे नसतात दोन माणसं सारखी नसतात. कधीतरी तुम्हाला हे समजेल की, माझ्यासारखा कधी कुणी नव्हता आणि कुणी नसेल त्या दिवशी तुम्हाला किती कृतज्ञ वाटेल!

या अनंत जगतात अनंत लोक जन्माला आलेत; पण माझ्यासारखा कुणी कधीच झाला नाही. होणार नाही. एक-एक व्यक्ती आगळी आहे. तुमची पुनरावृत्ती नाही. तुम्ही फक्त तुम्हीच आहात. ईश्वरानं प्रत्येक माणसाचा इतका सन्मान केला आहे की, काय सांगावं! या सन्मानाची परतफेड आपण कोणत्याही प्रकारे करू शकणार नाही. काही मार्ग नाही. एकेक माणूस, एकेक फूल, एकेक पान अद्वितीय आहे. सारीकडं अद्वितीयता भरून राहिली आहे; पण आपण स्वत:ला जुन्या साच्यात ओतत राहतो. स्वत:ला नवीन होऊच देत नाही. आपण म्हणतो, मी जो काल होतो, परवा होतो, तोच आज आहे. जो मी नेहमी होतो तोच आता आहे. आम्ही स्वत:ला जुनं करण्याच्या प्रयत्नात आहोत आणि ईश्वर आम्हाला नवीन करण्याचा प्रयत्न करीत असतो म्हणून सारा विरोध निर्माण झाला आहे. या विरोधामुळंच ताण आहे. गुंतागुंत आहे. त्रास आहे. आम्ही जुने तर होऊ शकतच नाही. नवेच होऊ शकतो, मग कशाला जुन्याच्या पाठीमागं लागता? नवे का नाही होत? जे आहे त्याच्यासाठी स्वत:ला उघडत का नाही? जे घडून गेलं त्यात बंद का होऊन बसता?

जो भूतकाळासाठी मृत होतो, तोच वर्तमानात जगतो. जो भूतकाळासाठी मरू शकत नाही, तो वर्तमानात जगू शकत नाही आणि भूतकाळाच्या बाबतीत मरणं ही ध्यानाची अद्भुत प्रक्रिया आहे. कमीत कमी एवढा प्रयोग करून पाहा. भूतकाळासाठी मृत व्हा. तुम्ही जे होता ते विसरून जा. जे आहात त्याला ओळखा. या दोन गोष्टी अगदी भिन्न आहेत, तुम्ही जे होतात ते आज नाही. आज जे आहात ते पूर्वी कधीच नव्हता. भूतकाळासाठी प्रत्येक क्षणी मरत जा. गेलं ते गेलं. आहे ते आहे. त्याच्याबद्दल पूर्ण जागृत व्हा, त्यात संपूर्णपणे जगा म्हणजे भार नाहीसा होईल. गाडीत तुम्ही डोक्यावर भार घेऊन बसला आहात आणि गाडी तुम्हाला डोक्यावर घेऊन धावतेय. कशाला घेऊन बसलात तो भार, फेकून द्या खाली. इतकं विराट रहाटगाडगं चाललंय, मग ‘मी हे ओझं सांभाळलं नाही, तर जगाचं कसं होणार’ ही काळजी तुम्हाला कशाला?

भिंतीवर उलटय़ा चिकटलेल्या पालीला वाटत असतं की, तिच्याच आधारावर घर तोललं जातंय. ती बाजूला झाली, तर घर कोसळेल. विचारा एखाद्या पालीला! ती हेच म्हणत असेल, की मी दूर झाले तर घर खाली येईल. कोंबडय़ांना वाटतं आम्ही आरवतो म्हणून सूर्य उगवतो – एका गावात एक माणूस होता. साऱ्या गावात त्याच्या जवळच फक्त कोंबडा होता. त्याचं गावकऱ्यांशी भांडण झालं. तो म्हणाला, मी माझा कोंबडा घेऊन दुसऱ्या गावी जातो. मग बघा सूर्य उगवणारच नाही.

आपल्या कोंबडय़ाला घेऊन तो दुसऱ्या गावाला गेला. पहाटे कोंबडा त्या गावात आरवला तेव्हा सूर्य उगवल्यावर तो म्हणाला, ‘बरं झालं. आता बसले असतील शंख करीत! सूर्य तर इथं उगवला. आता माझ्याशी भांडून  आपत्ती ओढवल्याचा पश्चात्ताप होत असेल त्यांना. माझा कोंबडा जिथं आरवतो तिथंच सूर्य उगवतो.’आपण सगळे याच भ्रमात आहोत. सगळ्या जगाचा भार आपल्या डोक्यावर घेतला आहे! प्रत्येकाला वाटतं की मी नसलो तर कसं होईल. काही होत नाही. कुठं पानसुद्धा हलणार नाही. कितीतरी लोक आले नि गेले जगातून. एक तुम्ही नसल्यानं काय होणार आहे? सर्वाना हा भ्रम असतो. या भ्रमाला जपतात, जोपासतात. आपल्या अस्तित्वाचं मोठ्ठं ओझं घेऊन चालतात. हे ओझं घेऊन जो चालतो, तो आपल्या अस्तित्वाला जाणू शकणार नाही. स्वत:चं अस्तित्व जाणण्यासाठी निर्भार होणं आवश्यक आहे.

म्हणून पहिलं ओझं आहे, अतीताचं. टाकून द्या ते! दुसरं ओझं म्हणजे सगळं जग मीच चालवतो हा भ्रम! प्रत्येकाला असंच वाटतं. प्रत्येक माणूस स्वत:ला केंद्रबिंदू मानत असतो. सारं विश्व त्याच्याच केंद्रभूत लोलकावर चाललं आहे असं वाटतं; पण नाही. कोणीही केंद्र नाही. कोणीही जग चालवत नाही, ते आपोआप चालतंय. त्याच्याबरोबर आपण चालतोय.

पण आपली सर्वाची हीच कल्पना असते की, ‘आम्ही चालवतोय.’ का आहे अशी कल्पना? कारण, ‘आम्ही चालवतो’ ही कल्पना मोठी सुखद आहे. आपल्या अहंकाराला  फुलवणारी आहे. ‘मी चालवतो’ या कल्पनेनं आमचा अहंकार तृप्त होतो. ‘मी चालवतो’ ही वस्तुस्थिती इतकीच आहे, की या कल्पनेमुळं ‘मी’ मजबूत होतो आणि ‘मी’ जितका मजबूत तितका ध्यानात प्रवेश अशक्य! तेव्हा दुसरी गोष्ट ध्यानात घ्या की, तुम्ही काहीही चालवत नाहीय. एका चालणाऱ्या फार मोठय़ा विश्वाचे, विराट ब्रह्मांडाचे, फार मोठय़ा गतीचे तुम्ही एक अंश आहात.

हाताला बुद्धी असती तर त्याला वाटलं असतं, मीच सर्व काही आहे. तो एका मोठय़ा शरीराचा भाग आहे हे त्याला कळलं नसतं, त्याला वाटलं असतं, ‘मी हलतो’ डोळ्यांना वाटलं असतं, ‘मी पाहतो.’ पोटाला विचारशक्ती असती तर वाटलं असतं, ‘मी भूक निर्माण करतो. अन्न पचन करतो;’ पण हे हात, डोळे, पोट वगैरे काहीही करीत नाहीत. एका मोठय़ा शरीराचे ते अवयव आहेत. जीवन हे एकत्रित आहे. संपूर्ण विश्व एकत्रित आहे. या योजनेत आम्ही तुकडय़ांसारखे काम करीत असतो; पण आम्हाला वाटतं, सर्व आम्हीच करतो. त्यामुळंच सगळा ताप सुरू होतो. सर्व काही घडतंय.

आम्ही एक अंश आहोत. सूर्य दहा कोटी मैलांवर आहे; पण तो थंड पडला, तर आम्ही या क्षणी थंड पडू. सूर्य कधी थंड झाला, तेही कळणार नाही. कारण कळण्यासाठी आम्ही असलो तर पाहिजे! सूर्य थंड झाला की, आम्ही थंड झालोच! आणि त्यावेळी कळेल की सूर्यामुळं आम्ही जिवंत होतो. सूर्याबरोबर आम्ही जगत होतो. आमच्या हृदयाचं स्पंदन सूर्याच्या स्पंदनाशी जुळलेलं होतं. कदाचित दुसरा कुठला तरी सूर्य त्या सूर्याला जीवन देत असेल. कुणी सांगावं! सगळं एकात्म आहे आणि या एकतेत, ‘मी करतो, मी चालवतो’ ही धारणा. म्हणजे उगीच आपल्या डोक्यावर भार उचलणं आहे.

या दोन-तीन गोष्टी सांगितल्या त्यातलं  एक अतीताचं ओझं समजून घ्या. ते निर्थक वाहू नका. दुसरं, मी करतो या कर्त्यांच्या भारापासून मुक्त व्हा. घटना घडत असतात. आपण करीत नसतो, घटनांचं किती विराट जाळं आहे! त्याच्या आदिअंताचा आम्हाला पत्ता नव्हता. पत्ता लागणारही नाही. घडण्याच्या सर्व विराट व्यवस्थेत स्वत:ला सोडून द्या. कर्तृत्व, कर्ता हे सारं विसरा. ‘जो आहे, तोच राहू द्या. म्हणजे सगळं घडेल. ते घडणं, आम्ही जिथं असतो, त्या मूळस्थानी पोहोचवेल, जिथून आम्ही कधी चळलो नाही, दूर गेलो नाही; पण त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ‘करण्याच्या’ या भारापासून मुक्त होणं अतिशय आवश्यक आहे.

(साकेत प्रकाशनच्या ‘शक्यतांची चाहूल, चेतनेचे द्वार’ या ओशो यांच्या पुस्तकातील निवडक भाग)

ओशो – chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2017 1:13 am

Web Title: article from osho books
Next Stories
1 द्वेष
2 इच्छाशक्ती
3 सद्गुण
Just Now!
X