20 November 2019

News Flash

द्वेष

अशी जर माझ्या मनाची तयारी असली, तर द्वेष व तिरस्कार यांकडे पाहाण्याचा माझा दृष्टिकोनच बदलतो.

द्वेषामुळे क्षोभ, चिंता, उद्विग्नता, वेदना यांचा प्रादुर्भाव होतो व ती वृत्ती क्षुद्रपणाची आहे असे मला वाटते म्हणूनच मला त्यापासून सुटका हवी आहे. म्हणून माझी खरी हरकत द्वेषाला नाही, तर ती द्वेषाने उत्पन्न होणाऱ्या खळबळीला आहे. मी माझ्या लहरीप्रमाणे वेळोवेळी त्याला निरनिराळी नावे देईन. आज मी एक नाव देतो तर उद्या दुसरेच; पण ‘स्वत:ला त्रास नको’ हीच इच्छा तिथे मूलत: असते.

प्रश्न : प्रामाणिकपणे सांगायचे तर मी बहुतेक करून प्रत्येक माणसाचा तिरस्कार किंवा कधी कधी द्वेषही करतो, हे कबूल केले पाहिजे. त्यामुळे माझे जीवन खडतर व दु:खी झाले आहे, मी म्हणजे द्वेषाचा पुतळा आहे हे मला बुद्धीच्या पातळीवर कळते; पण मी या वृत्तीला आळा घालू शकत नाही. तुम्ही मला मार्ग दाखवू शकाल काय?

कृष्णमूर्ती : ‘बुद्धीच्या पातळीवर’ म्हणजे काय? एखादी गोष्ट ‘मला बुद्धीच्या पातळीवर कळली’ असे तुम्ही म्हणता तेव्हा त्याचा अर्थ तरी काय? बुद्धीच्या पातळीवर समजणे असे काही आहे का? की आपण परस्परांशी केवळ शाब्दिक पातळीवरच संपर्क साधू शकतो, म्हणून मनाला फक्त शब्द कळतात? आणि मनाच्या पातळीवर शब्दरूपाने कळले म्हणजे खरे ज्ञान झाले असे होते का? आपण प्रथम या बाबतीतच स्पष्ट असायला हवे. तथाकथित बौद्धिक ज्ञान हे आपल्या बोधाच्या आड येत नाही. समजूत ही खरोखरी एकजिनसीच असते, तुकडय़ातुकडय़ांची नसते, एकांगी नसते. एखादी गोष्ट मला समजते तरी, नाही तर समजत तरी नाही. मला ‘बुद्धीच्या पातळीवर काही तरी कळले’ असे म्हणणे, हेच मुळी ज्ञानाला अडसर घालण्यासारखे आहे. बुद्धीला पटणे वगैरे प्रक्रिया एकांगी असते आणि म्हणून ते खरे ज्ञान नसतेच.

प्रश्न असा आहे की, ‘मी द्वेषाने भरलेला आहे, तिरस्कार करणारा आहे आणि असा मी त्या समस्येपासून मुक्त कसा होऊ किंवा तिला तोंड कसे देऊ?’ आपण एखाद्या समस्येला तोंड कसे देतो? समस्या म्हणजे असते तरी काय? समस्या म्हणजे आपल्याला क्षुब्ध करणारी अशी काही तरी गोष्ट होय. मी तिरस्काराने, द्वेषाने भरलेला आहे. मी लोकांचा द्वेष करतो आणि त्यामुळे दु:ख प्राप्त होते याची मला जाणीवही आहे. याला मी काय करावे? माझ्या जीवनात खळबळ उडविणारा हाच घटक आहे. जर द्वेषामुळे अशी खळबळ माझ्या जीवनात झालीच नसती तर हा प्रश्नच मला पडला नसता. पडला असता का? द्वेषामुळे क्षोभ, चिंता, उद्विग्नता, वेदना यांचा प्रादुर्भाव होतो व ती वृत्ती क्षुद्रपणाची आहे असे मला वाटते म्हणूनच मला त्यापासून सुटका हवी आहे. म्हणून माझी खरी हरकत द्वेषाला नाही, तर ती द्वेषाने उत्पन्न होणाऱ्या खळबळीला आहे. होय की नाही? मी माझ्या लहरीप्रमाणे वेळोवेळी त्याला निरनिराळी नावे देईन. आज मी एक नाव देतो तर उद्या दुसरेच; पण ‘स्वत:ला त्रास नको’ हीच इच्छा तिथे मूलत: असते. इंद्रियभोगामुळे सुख होते, त्रास होत नाही, म्हणून मी त्या सुखाचा स्वीकार करतो. मला सुखापासून मुक्त व्हायला नको असते, कारण सुखाने काही त्रास होत नाही, निदान तात्कालिक त्रास तरी होत नाही, पण द्वेष व तिरस्कार हे घटक मात्र माझ्या जीवनात फार घालमेल उत्पन्न करणारे आहेत, म्हणून मला ते टाकावेसे वाटतात.

मला कोणताही त्रास नको असतो. म्हणून जेथे मला उपद्रव होणार नाही असा मार्ग शोधण्याचा मी प्रयत्न करतो; पण मला त्रास होऊ नये म्हणजे काय? खरे काय तपासून पाहायचे म्हणजे मी कोणत्याही कष्टाला, खळबळीला तोंड दिले पाहिजेच, होय की नाही? त्यासाठी वेळ पडली तर आयुष्यातील प्रचंड उलथापालथ, चढउतार, घोर चिंता, यातूनसुद्धा जायला मी तयार असले पाहिजे; पण मला कोणताही उपद्रव नको असेल तर मी झोपलेलाच राहीन आणि तेच तर आपल्यापैकी पुष्कळांना हवे असते. इतरांनी आपले सांत्वन करावे, आपल्याला थोपटून शांत करावे, आपण डोळ्याला ढापणे लावून राहावे, त्रासापासून दूर जावे, एकांतवास पत्कारावा, अलगपणे सुरक्षित राहावे,  असे आपल्याला वाटते, पण मला तर सत्याचा प्रत्यय घ्यायचा आहे, तेव्हा जो काही त्रास होईल तो होऊ दे. त्याची मी पर्वा करणार नाही. नुसता वरवरचा त्रास नव्हे, तर अंत:करण ढवळून निघाले तरी हरकत नाही. अशी जर माझ्या मनाची तयारी असली, तर द्वेष व तिरस्कार यांकडे पाहाण्याचा माझा दृष्टिकोनच बदलतो.

कद्रूपणाचेच उदाहरण घ्या. आपल्यापैकी बहुतेकांना त्यांच्या कंजूषपणाची जाणीव नसते. पैशाच्या बाबतीतला चिक्कूपणा, दुसऱ्याला क्षमा करण्याच्या बाबतीतला संकुचितपणा, कोतेपणा वगैरे कंजूषपणाचे प्रकार आपल्याला माहितीचेच आहेत. आता जर आपल्या कोतेपणाची आपल्याला जाणीव झाली तर तो अवगुण कसा टाकावा? म्हणजे उदार बनायचे असे नव्हे – तो मुद्दा महत्त्वाचा नाही. कद्रूपणातून मुक्त होण्याचे औदार्य अध्याहृतच असते, त्यासाठी तुम्हाला मुद्दाम उदार व्हावे लागत नाही हे सहज लक्षात येण्यासारखे आहे. तुम्ही एखाद्या संस्थेला किंवा मित्राला एकीकडे भरघोस देणगी किंवा भेट देत असाल आणि वेटरला थोडी जास्त बक्षिसी देण्यास मात्र का कू कराल. मी कद्रूपणा कशाला म्हणतो ते आले का लक्षात? याचे भान आपल्याला सहसा असत नाही; पण जर का याचे भान झाले तर काय घडते? आपण मुद्दाम उदार होण्याचा प्रयत्न करतो. कोतेपणावर मात करण्याचा प्रयत्न करतो. आपण स्वत:ला त्यासाठी वेळोवेळी औदार्य दाखविण्याची शिस्त लावून घेतो आणि असे अनेक उपाय करतो; पण आपण कोणी तरी होण्यासाठी केलेला इच्छाशक्तीचा उपयोग म्हणजेही एक प्रकारे क्षुद्रतेच्या जरा मोठय़ा वर्तुळाचाच अद्यापि भाग असतो. म्हणून, जर आपण यापैकी काहीही केले नाही आणि फक्त क्षुद्रपणाचे सारे स्वरूप नीट अवलोकन केले आणि क्षुद्रपणा वगैरे कोणतेही नाव न देता त्याचे आपण भान ठेवले तर आमूलाग्र परिवर्तन घडून आल्याचे आपल्याला दिसेल.

आपल्यापैकी बहुतेकांना आपल्या संथ जीवनात खळबळ नको असते. आपल्याला वाटते की, आपल्याला विशिष्ट प्रकारची जीवनपद्धती गवसली आहे – त्यात आपले गुरू, आपल्या श्रद्धा वगैरे जे काही असेल ते असो – असे पाहून आपण तिथे स्थिरावतो. हा सारा प्रकार एखादा चांगला हुद्दा मिळाल्यावर जन्मभर आरामात नोकरी करीत बसण्यासारखाच असतो. अशाच मनोवृत्तीने आपण आपल्याला जे अवगुण टाकावेसे वाटतात त्याच्याकडे पाहातो व उपाय करतो. आपल्याला संपूर्णपणे खळबळीला तोंड देणे, अंतरंगातून पूर्णपणे ढवळून निघणे, कोणताही आधार नसताना असुरक्षित राहाणे, याचे महत्त्वच कळत नाही; पण जेव्हा तुम्ही पूर्ण निराधार व असुरक्षित असता तेव्हाच तुम्हाला नवीन शोध लागू शकतो. स्वत:चेच ज्ञान होऊ शकते.

(‘केशव भिकाजी ढवळे प्रकाशन’च्या जे. कृष्णमूर्ती लिखित ‘प्रथम अर्थात अंतिम मुक्ती’ या पुस्तकातून साभार.)

First Published on February 4, 2017 12:45 am

Web Title: article taken from book pratham arthat antim mukti
Just Now!
X