संकटकाळी भीती व दहशतीच्या प्रतिक्रिया हानीकारक ठरू शकतात. ‘लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो’ कंपनीतील एका व्यवस्थापकाला दुसऱ्या शहरात कारखान्याची शाखा सुरू करण्याचे काम सोपविले गेले. जबाबदारीच्या सुरुवातीस तो थोडा घाबरला व विचार करू लागला की, आपल्याकडून हे काम होणार नाही. मला माझ्या कुटुंबापासून लांब राहावे लागेल इत्यादी; परंतु त्याच्या पत्नीने त्याला प्रोत्साहन दिले. ती म्हणाली, ‘‘तुम्ही निश्चिंत मनाने जा आणि पूर्ण प्रयत्न करा. जरी तुम्ही अयशस्वी झालात तरी तुम्हाला दोषी ठरविले जाणार नाही.’’ या प्रेरणेने भारावून तो दुसऱ्या शहरात गेला. काही महिन्यांनंतर जेव्हा त्या शहरात कारखाना सुरू झाला तेव्हा त्याने सांगितले की, माझा आत्मविश्वास खूपच वाढला आहे. अशा प्रकारचा कारखाना मी इतर देशांतही चालू करण्यास समर्थ आहे.’’ परिस्थिती कोणतीही असो, परीक्षा असो किंवा नोकरी, उद्योगधंदा असो, सर्व गोष्टी आव्हान म्हणून स्वीकारल्यास आपली मानसिक शक्ती वृद्धिंगत होईल.

ऊर्जेचा स्तर उंचावणे

महाविद्यालयातून घरी परत आल्यावर अभ्यास होत नाही, असं अनेक विद्यार्थी म्हणतात, ‘‘अरे! मी फारच थकलो बुवा! म्हणूनच अभ्यास होत नाही. मला टीव्ही पाहून, मित्रांशी गप्पाटप्पा करून ताजेतावाने झाले पाहिजे.’’ परंतु एका ठरावीक पातळीनंतर आपल्या ऊर्जेला उतरती कळा लागल्याचे आपणास जाणवते. म्हणून आपल्या शक्तीची पातळी वाढविण्यासाठी झोप, दूरचित्रवाणी, मित्रपरिवार यांचा आधार घेण्यापेक्षा नैसर्गिक गोष्टींचा आधार घ्यावा. मी आपणास ऊर्जेची पातळी उंचावण्याचा सोपा प्रकार सांगू इच्छितो. हे फार सोपे असून निश्चितच  परिणामकारक ठरेल.

किती तरी वेळा मी असे अनुभवले आहे की, २५ टक्के लोकांची श्वासोच्छ्वासाची पद्धत चुकीची आहे. अशा चुकीच्या पद्धतीमुळे त्या व्यक्ती दहा ते वीस टक्के कमी प्राणवायू शरीरात खेचू शकतात. म्हणून आपण काय केले पाहिजे? आपल्या श्वासोच्छ्वासाची पद्धत तपासून बघा.

लहानपणापासूनच आपल्यापैकी बऱ्याच जणांनी चुकीचा श्वासोच्छ्वास घेण्याची सवयच लावून घेतली आहे. एकदा ही पद्धत सुधारली की त्यानंतर काही महिने योग्य रीतीने श्वासोच्छ्वास घेण्याचा परिपाठ ठेवा. हळूहळू ही चांगली सवय अंगी बाणली जाईल. यामुळे मेंदूला प्राणवायूचा अधिक पुरवठा होईल व परिणामस्वरूपी आपल्या ऊर्जेचा दर्जा उंचावेल आणि साहजिकच मानसिकदृष्टय़ा आरामाचा अनुभव येईल. या योग्य क्रियेमुळे पोटाच्या सर्व भागालादेखील चांगला व्यायाम होतो.

हल्लीच्या सहज आणि ताबडतोब तयार होणाऱ्या खाण्याच्या पदार्थासारखीच आपल्याला ऊर्जादेखील ताबडतोब पाहिजे असते. म्हणून आपण काय करू लागतो? जेवणाच्या ऐवजी चटकन एक कप चहा पितो. तासाभराने जरा थकवा आल्यासारखे वाटले तर हुशारी येण्यास पुन्हा एक कप चहा पितो. असे हे दुष्टचक्र सुरू होते. खरे पाहता शक्ती, जोम आणि उत्साह वाढविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे व्यायाम!

आपण मनोरंजनासाठी कोणता खेळ खेळता? अलीकडे तर व्हिडीओ गेम. हे अयोग्य आहे. व्हिडीओ गेम्समुळे बुद्धीचा विकास होतो यात शंका नाही; परंतु सर्वागाचा व्यायाम होत नाही. सतत गेम्स खेळल्यामुळे आपले डोळे बिघडू शकतात. नियमित व्यायामाने स्नायू, पेशी यामध्ये वाढ होते, ते बलवान होतात. जर मधेच व्यायाम करणे सोडले तर स्नायू दुर्बल होतात.

याच प्रकारे एकदा अभ्यास पूर्ण झाला, की आपल्याला मेंदूला जास्त ताण देणे योग्य वाटत नाही. परिणामस्वरूपी मेंदूमध्ये विकसित होत असलेली अनेक विद्युतचक्रे नष्ट होऊ शकतात. हे एक प्रकारे योग्य आहार फुकट घालविण्यासारखे आहे. यासाठी दररोज नित्यनेमाने काही तास अभ्यासाच्या माध्यमाद्वारे नवीन माहिती मिळविण्याची सवय लावल्यास आपली मानसिक व बौद्धिक शक्ती तीव्र गतीने काम करू लागते. जर म्हातारपणात आपणास काही नवीन वाचावयाचे, शिकावयाचे असेल तर सुरुवातीला आपले शरीर व मन विरोध करेल, बंड पुकारेल! परंतु लवकरच वाचनाची गती वेगाने वाढत जाईल. घरी आणि आपल्या कार्यस्थळी आपण पैसे, दागिने तसेच बाकीचे मौल्यवान सामान जिवापाड सांभाळतो. समजूतदार व्यक्ती या गोष्टींची पर्वा करते, तसेच त्या गोष्टी व्यर्थ जाऊ नयेत याची काळजी घेते. अशा प्रकारे वेळ, ऊर्जा आणि संकल्प या गोष्टी आपली खरी मौल्यवान संपत्ती आहे. या संपत्तीचा काळजीपूर्वक सांभाळ व उपयोग करा.

चेतनेचे नियम

फ्रँक कॅप्रिओ यांच्या मते स्वत्व ओळखण्याची गुरुकिल्ली आहे – ती म्हणजे ‘आपल्या अंतर्मनाचा शोध घेणे’. अशा प्रकारचा प्रयोग व्यावहारिक अडचणी, मानसिक त्रास, आजार, भीती, काळजी तसेच व्यक्तिगत समस्या इत्यादी अडचणींना जाणून घेऊन त्या सोडविण्याचा मार्ग दाखवेल. फ्रँक कॅप्रिओंच्या वरील विधानाला पुष्टी देताना ते म्हणतात की, ‘‘जेव्हा आपण वर दिलेल्या अडचणींच्या मागे लपलेल्या प्रेरणा (कारणे ओळखतो) तेव्हा त्यांच्यातून सुटण्याचे मार्ग शोधणे किंवा त्या अडचणींना पार करून स्वत:मध्ये योग्य ते बदल घडविणे खूप सोपे जाते. परिणामस्वरूपी आपणास यश, सुस्वास्थ्य व आनंद अनुभवायला मिळतो.’’

चेतना ज्या नियमांचे पालन करून कार्यान्वित होते ते नियमही आपण जाणून घेतले पाहिजेत. आपला प्रत्येक दैनंदिन व्यवहार पुढील तीन गोष्टींचा परिणाम असतो.

प्रथम : आंतरिक – जन्मापासून (जन्मत:) अंगीभूत असलेले संस्कार व बाह्य़ घटनांचा प्रतिसाद. द्वितीय : संस्कार – वाढत्या वयाबरोबर यात प्रगती होत असते. तृतीय : असे संस्कार जे जन्माला आल्यावर ग्रहण केले जातात.

वरील तीन प्रकारच्या संस्कारांवर आपला प्रत्येक व्यवहार अवलंबून असतो. मेंदूचा बाह्य़पृष्ठ निम्न दर्जाच्या प्राण्यांमध्ये कमी विकसित असतो. त्यांच्यात पहिल्या प्रकारचे आंतरिक संस्कार महत्त्वाची भूमिका पार पाडतात. उदाहरणार्थ सापाची पिल्ले दिसण्यात व वागण्यात मोठय़ा सापांसारखीच असतात. साप आपल्या आंतरिक संस्कारावर आधारितच वर्तन करतो. पक्ष्यांमध्ये जन्मानंतर लगेचच खूपच जलद गतीने प्रगती होते, त्यामुळे शिकण्याची संधी किंवा शिकायला फारच कमी वाव मिळतो.

स्वयंगतिक लेखन

जाणिवेच्या खोलवर थरांमध्ये भावना, इच्छा, आकांक्षा, आदेश साठवलेले असतात, याचे आपल्याला भान नसते. ही गोष्ट मान्य करण्यासाठी आपणास एक उदाहरण देतो –

अनिता मेहुल या सुप्रसिद्ध मनोचिकित्सक होत्या. त्यांनी केलेल्या या परीक्षणाबद्दल त्या खूप लोकप्रिय झाल्या. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे वाचून हे आश्चर्य वाटेल की, या जगात काही माणसे स्वयंगतिक असतात, जी पुस्तक वाचत असताना उजव्या हाताने एका विषयावर व डाव्या हाताने त्याहून अगदी भिन्न विषयांवर लिहिण्याचे काम करू शकतात. म्हणजे एकूण तीन वेगवेगळे व्यवहार अशी माणसे एकाच वेळी करू शकतात. यात तसे आश्चर्य वाटण्याजोगे काहीच नाही. डॉ. मेहुल यांचा ठाम विश्वास आहे की, पाचपैकी चार व्यक्ती वरील कौशल्य विकसित करू शकतात. डॉ. मेहुल यांनी पन्नास लोकांवर वैयक्तिक प्रयोग करून पाहिला.

त्या स्वत: लेखनकौशल्याला चेतनेच्या सात वेगवेगळ्या स्तरांमुळे मिळालेली देणगी मानतात; परंतु दुर्दैवाने चेतनेच्या स्तरांच्या अभ्यासाच्या दिशेने फारच कमी प्रयत्न केले गेले आहेत. चेतनेच्या या खोलवरच्या थरांमध्ये सक्रिय योग्यतेची अमर्याद शक्ती केवळ अध्ययन व संशोधनाच्या अभावी निष्क्रिय होऊन पडली आहे. या वास्तवाबद्दल प्राचीन ग्रीक चिकित्सक हिप्पोकेट्र्स व एक्स्युलेपिअस जाणून होते.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला मानसिक निरीक्षणाविषयीच्या अभ्यासाचे जनक सिग्मंड फ्राइड यांनी अर्धजागृत म्हणजेच अचेतन अवस्थांचा खूप अभ्यास केला; परंतु त्या वेळचे वातावरण आजच्या तुलनेत संकुचित होते, त्यामुळे त्यांच्या अभ्यासाला एक मर्यादा होती. वर्तणूक निरीक्षणतज्ज्ञ डॉ. स्किनर हॅमिल्टनने विश्वविद्यालयात शिकत असताना स्वत:च्या हाताने तीन पात्रे असलेले एक नाटक एकाच दिवसात लिहून काढले.

जेव्हा आपण ताजेतवाने असतो तेव्हा दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे किंवा सायंकाळी असा प्रयोग करावा. कमीत कमी दहा वेळा तरी याचा अभ्यास करावा. अभ्यास महत्त्वाचा आहे, कारण आपण पहिल्यांदाच यशस्वी झालात तर चेतनेच्या गाभ्यावर आपला चटकन विश्वास बसेल; शिवाय अभ्यासामुळे आपण अचेतन अवस्थेचा उपयोग करण्याची कलासुद्धा आत्मसात कराल. आपल्या अचेतन अवस्थेशी पूर्ण ओळख होण्याची आपली क्षमतादेखील वाढीस लागेल. यामुळे मिळणाऱ्या संकेतामुळे आपण आपली काळजी, चिंता या गोष्टींचे निराकरण करू शकाल. जर आपण एकदा अचेतन अवस्थेबद्दल व्यवस्थित समजून घ्याल, तर या पुस्तकात इतरत्र दिलेल्या उपायांनी त्यात बदलही घडवून आणू शकाल.

(समाप्त)

(साकेत प्रकाशनाच्या ‘स्ट्रेस मॅनेजमेंट – तणावातून मन:शांतीकडे ’या डॉ. गिरीश पटेल लिखित आणि राजश्री खाडिलकर अनुवादित पुस्तकातील संपादित भाग.)

 

डॉ. गिरीश पटेल

chaturang@expressindia.com