20 November 2019

News Flash

सद्गुण

मनाच्या म्हणजेच अहंच्या व्यापाराची संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यातच खरा सद्गुण उदयास येत असतो.

मनाच्या म्हणजेच अहंच्या व्यापाराची संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यातच खरा सद्गुण उदयास येत असतो. कशाचा तरी सतत केला जाणारा प्रतिकार म्हणजे सद्गुण नव्हे. जे जसे आहे, तसेच त्याचे दर्शन होणे आणि त्याची स्वयंस्फूर्त जाणीव होणे, यातच खऱ्या सद्गुणांचे सार साठलेले असते.

सागर अतिशय शांत, नि:स्तब्ध होता. किनाऱ्यावरच्या शुभ्र वाळूवर क्वचितच एखादा तरंग उठताना दिसत होता. त्या प्रशस्त खाडीच्या सभोवताली उत्तरेकडे शहर वसले होते आणि दक्षिणेकडे किनाऱ्याच्या अगदी लगतच ताडामाडांची  झाडे उभी होती. कुंपणाच्या पलीकडे पहिलेवहिले शार्क मासे दृष्टीस पडत होते आणि त्यांच्या पलीकडे मच्छीमारीसाठी निघालेल्या कोळ्यांच्या होडय़ा दिसत होत्या. त्या ताडामाडांच्या दक्षिणेकडील एका खेडय़ाकडे त्या होडय़ा चालल्या होत्या. सूर्यास्ताचे रंगवैभव विलक्षण तेजाने लखलखत होते. पण ज्या दिशेस सूर्यास्ताचे दृश्य दिसेल, अशी आपली साहजिकच अपेक्षा असते, तेथे ते नसून पूर्वेकडे  होते. तो जणू प्रतिसूर्यास्त होता. सुंदर डौलदार मेघराशी इंद्रधनुष्याच्या सप्तरंगांनी लखलखत होत्या. ते दृश्य खरोखर कल्पनातीत, विलक्षण होते. सौंदर्यातिशयामुळे ते मानवी ग्रहणशक्तीच्या मर्यादा जणू विच्छिन्न करून टाकीत होते. ते सारे तेजस्वी रंग समुद्रजलाने झेलून घेतले होते आणि त्यातूनच क्षितिजापर्यंत पोचणारा एक तेजस्वी मार्ग निर्माण झाला होता.

काही थोडे कोळी शहरातून आपापल्या खेडय़ाकडे परत जाताना दिसत होते. पण एकंदर सागरकिनारा शांत व जवळजवळ निर्मनुष्य झाला होता. तिकडे ढगांच्या किंचित वरच्या बाजूला एकुलता एक सायंतारा चमकू लागला होता. आम्ही परत जाण्यास निघालो. इतक्यात एक स्त्री आमच्याबरोबर चालू लागली आणि तिने गंभीर विषयांवर बोलणे सुरू केले. ती सांगू लागली की, जेथे ध्यानधारणा करण्यात येते आणि महत्त्वाच्या सद्गुणांचे संवर्धन करण्यात येते, अशा एका समाजाचे आपण सदस्य आहोत; या समाजात तर महिन्याला एका सद्गुणाची निवड केली जाते व महिनाभर त्या सद्गुणाचे संवर्धन करून तो आचरणात आणला जातो. त्या स्त्रीच्या वृत्तीवरून व एकंदर भाषणावरून साधनेच्या शिस्तीत ती मुरलेली दिसली आणि तिच्या साध्याशी व वृत्तीशी जे समरस होऊ शकत नव्हते, त्यांच्या बाबतीत एक प्रकारचा त्रासिक उतावळेपणाही तिच्यात दिसून आला.

वस्तुत: खरा सद्गुण हा हृदयाचा असतो. मनाचा नसतो. आपले मन जेव्हा सद्गुणांचे संवर्धन करू पाहते, तेव्हा तो मनाचा निव्वळ धूर्त हिशेबीपणाच असतो, हे सद्गुणसंवर्धन म्हणजे त्याचे केवळ आत्मसंरक्षणच असते; ती परिस्थितीशी केली जाणारी कुशल तडजोड असते. वस्तुत: स्वत:लाच परमोच्च पद प्राप्त व्हावे यासाठी गुणसंवर्धन करणे, म्हणजे खऱ्या सद्गुणाला पारखे होऊन बसणे होय. जेथे भीती असते, तेथे सद्गुण वसणे शक्य तरी आहे का? भीती ही मनाची निर्मिती असते, हृदयाची नव्हे. तथाथित सद्गुण, प्रतिष्ठितपणा, तडजोड व सेवा, यांच्यासारख्या बुरख्यांखाली ही आंतरिक भीती लपून राहत असते. मनाने निर्माण केलेले सारे हे संबंध व सारी नाती आणि मनाचे संपूर्ण व्यापार, या सर्वाच्या बुडाशी भीती ही सदैव राहणारच. वस्तुत: मन हे आपल्या व्यापारांहून भिन्न नसते. पण ते स्वत:ला आपल्या व्यापारांपासून वेगळे काढते आणि अशा रीतीने स्वत:ला सातत्य व शाश्वतता प्राप्त करून घेते. ज्याप्रमाणे एखादे वाद्य वाजविता येण्यासाठी मूल, त्याची दररोज तालीम करीत राहते, त्याप्रमाणे मन हे मोठय़ा धूर्तपणाने सद्गुणांची तालीम करीत असते. कारण जीवनात येणाऱ्या सर्व प्रसंगांना तोंड देण्यासाठी, तसेच सर्वोच्च वाटणाऱ्या ध्येयासाठी त्याला सातत्य व सामथ्र्य मिळवावयाचे असते. पण वस्तुस्थिती अशी आहे की, जीवनातील प्रसंगांना तोंड देण्यासाठी, मन पूर्णपणे कधीही आघाताभिमुख किंवा सहजभेद्य होऊ शकणार नाही.

स्वत:चे सातत्य कायम ठेवण्यासाठी मन नेहमी सर्व गोष्टींशी धूर्तपणाने जुळवून घेत राहते आणि या त्याच्या करामतीमुळे अंतर्यामात भीती सतत पोसली जात असते. सत्यदर्शनासाठी, खोलात जाऊन या भीतीचे मूळ प्रथम समजून घेतले पाहिजे, सद्गुणसंवर्धन करीत राहणे, हा काही त्याचा उपाय नव्हे. क्षुद्र मनाने सद्गुणसंवर्धनाची कितीही पराकष्ठा केली, तरी ते अखेर क्षुद्रच राहते. कारण हे सद्गुणसंवर्धन, ही केवळ क्षुद्र मनाला आपल्या क्षुद्रतेपासून दूर नेणारी पळवाट असते. म्हणूनच अशा मनाने केलेला सद्गुण हाही क्षुद्रच राहतो. अशी वस्तुस्थिती असल्यामुळे ही क्षुद्रता काय वस्तू आहे हे समूळ, समग्रपणे समजून घेतल्याशिवाय सत्य अनुभवास येणे, हे कसे शक्य होईल? मन जोवर असे क्षुद्र, संकुचित व सद्गुणी राहील, तोवर त्या अमर्याद सत्याचा स्वीकार करण्यास ते कसे समर्थ ठरेल?

मनाच्या म्हणजेच अहंच्या व्यापाराची संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यातच खरा सद्गुण उदयास येत असतो. कशाचा तरी सतत केला जाणारा प्रतिकार म्हणजे सद्गुण नव्हे. जे जसे आहे, तसेच त्याचे दर्शन होणे आणि त्याची स्वयंस्फूर्त जाणीव होणे, यातच खऱ्या सद्गुणांचे सार साठलेले असते. जे जसे आहे, जे वास्तव आहे, तसेच ते समजून घेण्याचे सामथ्र्य मनाला कधीच प्राप्त होणे शक्य नसते. जे काही समजले असेल ते कृतीत उतरविणे एवढेच मनाच्या आवाक्यात  असते. पण जे जसे आहे, तसेच ते अवधानपूर्वक समजून घेणे हे मात्र मनाच्या आवाक्यात येणे शक्यच नसते. जे जसे आहे, तसेच ते समजून घेण्यासाठी त्याची जिव्हाळ्याची ओळख पटावी लागते आणि त्याच्या स्वागतासाठी ऊर भरून यावे लागते. मन जेव्हा पूर्ण निष्क्रिय व नि:स्तब्ध असते, तेव्हा केवळ हृदयालाच हे वास्तवाचे स्वागत करणे शक्य होते.  परंतु मनाची ही नि:स्तब्धता म्हणजे हिशेबी धूर्तपणाने घडवून आणलेली अवस्था नव्हे. नि:स्तब्धता ही प्रयत्नाने घडवून आणण्यासाठी इच्छा उद्भवणे हा साध्यसाधनेच्या प्रकाराला जडलेला शापच होय. अशा या साध्य साधनाप्रकारातून संघर्षांच्या व दु:खाच्या कधीही न संपणाऱ्या श्रेणीवाचून दुसरे काहीही निष्पन्न होणे संभवनीय नसते. दुर्गुणांचा निषेध करून किंवा सद्गुणांचे संवर्धन करून काहीही विशेष होण्याची हाव बाळगणे म्हणजे हृदयाच्या स्वयंभू सद्गुणाला पराङ्मुख होऊन बसणे होय.

सद्गुण म्हणजे संघर्ष व त्याच्यावर मिळविला जाणारा विजय नव्हे; प्रदीर्घ साधना व तिच्यातून निष्पन्न होणारा परिणाम म्हणजे सद्गुण नव्हे, तर सद्गुण ही सहजपणे असण्याची एक अवस्था आहे.  मनोनिर्मित व स्व-विक्षेपित वासनेतून निर्माण होणारी अशी ती अवस्था नव्हे. जोवर काही तरी विशेष होण्यासाठी माणसाची धडपड चालू असते, तोवर ते ‘सहज असणे’ नसते. काहीतरी विशेष होण्याच्या धडपडीत प्रतिकार, निषेध, आत्मक्लेश व त्याग, यांचेच थैमान चालू असते. पण या थैमानावर विजय मिळविणे म्हणजे सद्गुण नव्हे. काही विशेष होण्याच्या हव्यासातून मुक्तता व या मुक्ततेतून निर्माण होणारी सहजशांती, हाच खरा सद्गुण होय. ही शांती हृदयाची असते, मनाची नव्हे. साधना, बुद्धिपुरस्सर निरोध व प्रतिकार यांच्या साह्य़ाने मनाला कृत्रिम शांती प्राप्त करून घेता येईल. परंतु अशा प्रकारच्या शिस्तबद्धतेच्या आहारी जाणे, म्हणजे हृदयाच्या सद्गुणांची हत्या करणेच होय आणि हृदयाच्या सद्गुणांशिवाय शांती व सत्यानुग्रह हे संभवतच नाहीत. कारण हृदयाची सहज सद्गुणमयता म्हणजेच सत्यदर्शन!

(जे. कृष्णमूर्ती यांच्या ‘जीवनभाष्ये’ (खंड पहिला, अनुवाद -विमलाबाई देशपांडे)  या पुस्तकातील संपादित भाग)

First Published on January 21, 2017 1:59 am

Web Title: virtue
Just Now!
X