आचारसंहिता लागू झाल्यानंतर पाच राज्यांतील निवडणुकांच्या आधी १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प जाहीर करणे योग्य नाही. त्यातील काही तरतुदी मतदारांना आकर्षित करणाऱ्या असू शकतात. यावर माजी निवडणूक आयुक्त एस वाय कुरैशी म्हणतात, असे निष्पन्न झाल्यास आयोग हस्तक्षेप करू शकतो. पण त्याचा काय उपयोग, कारण तोपर्यंत जे व्हायचे ते झालेले असते. म्हणून अर्थसंकल्प पुढे ढकलावा ही विरोधकांची मागणी रास्त आहे. या आधी २०१२ मध्ये यूपीए सरकारच्या काळात अर्थसंकल्प १६ मार्चला मांडला होता.

– राम देशपांडे, नेरुळ

 

असे प्रश्न सत्तेचा माज आलेलेच विचारतात

जे लोक १ जानेवारीपासून ५०० वा १०००च्या नोटा बदलण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेत गेले त्यांना ‘इतके दिवस काय झोपला होतात? ३० डिसेंबपर्यंत का नाही आलात?’ असे प्रश्न विचारले गेले. असे प्रश्न सत्तेचा माज आलेलेच विचारत असतात.

– सुधीर केशव भावे, जोगेश्वरी (मुंबई)

 

हॉटेलांकडून ग्राहकांची लूटच

हॉटेलांतील सेवा शुल्कासंदर्भातील बातमी (५ जाने.) वाचली. हॉटेलांनी सेवा शुल्क ग्राहकांच्या पसंतीनुसार घ्यावे यात काही अर्थ नाही. कारण यातून कोणताही ठोस निर्णय होईल याची शाश्वती नाही. मूळ बिल, सíव्हस चार्ज आणि सेवा कर असे दर आकारणे म्हणजेच ग्राहकांची लूट आहे. आज एकंदरीतच हॉटेल उद्योगाकडे बघितले तर त्यांनी केलेली अंतर्गत सजावट व त्यावर केलेला खर्च अशा माध्यमातून ग्राहकांकडून वसूल करण्याचा उद्योग राजरोसपणे चालू आहे. सध्या आकारला जाणारा १५% भार हा माथी आहेच. त्यातून सेवा शुल्क. यावर केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्रालयाने दिलेला निर्णय हा खरोखरीच स्वागतार्ह असून त्याची अंमलबजावणी कठोरपणे व्हावी हीच अपेक्षा.

– पुरुषोत्तम कृ. आठलेकर, डोंबिवली

 

प्रत्येक कामास अभियंताच जबाबदार कसा?

वीज वितरण कंपनीमधील अभियंता लांडगे (औरंगाबाद) यांना  कामाच्या ताणाने हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले तर मोहोळ (सोलापूर) येथील अभियंता पानसरे यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. एकूणच सर्व प्रकारची कामे, जबाबदारी, कर्मचाऱ्यांची उपलब्धता याचा सारासार विचार न करता प्रत्येक कामास अभियंत्यांनाच जबाबदार धरले जाते. बिलिंग, जनतेची गाऱ्हाणी, वसुली यांसारख्या कामासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली असूनही या अभियंत्यांनाच त्या कामासाठी जबाबदार धरले जाते. प्रत्येक ठिकाणी सारखेच वर्कलोड राहील, असेही नाही. मानसिक आधारही कुणाचाच नाही. प्रत्येकाची कामाची पद्धत वेगळी असते. सर्वाची मानसिक स्थिती सारखी नसते. अशा वेळी कंपनीच्या सर्व स्तरांवरील अधिकाऱ्यांनी एकत्र मार्ग काढला पाहिजे. पगार व भत्ते यासाठी भांडणाऱ्या संघटना काय करीत आहेत? वीज मंडळात ३८ वष्रे सेवा केलेली असल्यामुळेच हा पत्रप्रपंच!..

– शरद लासूरकर, औरंगाबाद</strong>

 

मग खलिते सुरक्षित होते आणि आहेत काय?

अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संगणक आणि इंटरनेटवर आधारित माहितीची देवाणघेवाण ही सुरक्षित नसल्याचा आणि खलित्यावर आपला विश्वास असल्याचा गौप्यस्फोट केला. मग खलिते आणि पत्रव्यवहार तरी कितपत सुरक्षित होते आणि आहेत? एकदा का कुठलीही माहिती वा दस्तावेज लिखित किंवा संगणकीकृत स्वरूपात अस्तित्वात आली की ती माहिती गहाळ होण्याची, चोरी होण्याची, भलत्याच हाती लागण्याची, दुरुपयोग होण्याची जोखीम असते आणि ही जोखीम माहिती देणारा आणि घेणारा यांना स्वीकारावीच लागते, हे ट्रम्प यांना लवकर कळावे ही इच्छा. नाही तर अशा ‘लीक’ झालेल्या माहितीच्या जोरावरच  प्रतिस्पर्धी उमेदवारास नामोहरम करून आपण अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली हे खलित्याच्या जोरावर नक्कीच नव्हे ना!

– प्रा. ज्ञानेश्वर चक्रदेव, मुंबई

 

दंडवसुलीपेक्षा मद्यपी चालकांवर कारवाई करा

नववर्षांचे स्वागत करताना इतके लोक दारू पिऊन गाडी चालवत होते हे सत्यच भयंकर आहे. यातल्या एक-दोघांनी जरी गाडी ठोकली असती तरी अनेक निरपराध लोकांचे प्राण गेले असते. नुसता दंड किती जमा झाला हे महत्त्वाचे नाही. या चालकांवर अशी कारवाई हवी की ते यापुढे कधीही मद्य प्राशन करून वाहन चालवणार नाहीत.

– शं. रा. पेंडसे, मुलुंड, मुंबई   

 

श्रद्धाळूंची फसवणूक

त्र्यंबकेश्वरी नारायण नागबळीसारख्या निर्थक कर्मकांडांचे पौरोहित्य करणाऱ्या पुजाऱ्यांकडे प्राप्तिकर अधिकाऱ्यांना कोटय़वधी रुपयांची रोकड, पाच किलो सोने आणि स्थावर मिळकत अशी अवैध संपत्ती हाती लागली. श्रद्धेला बळी पडलेल्या भक्तांकडून हे पैसे पुरोहितांनी लुटले, हे स्पष्ट आहे. सर्व धर्मातील बहुतेक कर्मकांडे श्रद्धाळूंना लुबाडण्यासाठीच पुरोहितांनी रचलेली असतात. त्यांचा खऱ्या धर्माशी काही संबंध नसतो. अंत्यसंस्कारांतील दहावे, बारावे, तेरावे, मासिक श्राद्ध, हे विधी पैसे लुटण्यासाठी रचले आहेत हे उघड दिसते. अशा विधींवर श्रद्धा ठेवणे हे अविवेकीपणाचे लक्षण आहे.   नारायण नागबळी, दशक्रिया विधी अशी सर्व कर्मकांडे निर्थक आणि निरुपयोगी आहेत. त्यामुळे श्रद्धाळूंची अतोनात हानी झाली आहे आणि होत आहे. श्रद्धेमुळे माणसाची विचारशक्ती ठप्प होते. त्यामुळे तो आपली श्रमा-घामाची कमाई वाया घालवतो. श्रद्धाळू माणसे फसणुकीला सहजगत्या बळी पडतात. श्रद्धाक्षेत्रात बुद्धी चालत नसल्याने आपली फसवणूक होत आहे हेच श्रद्धाळूंना समजत नाही. जगभरातील श्रद्धाळूंची ही शोकांतिका आहे. ‘गतजन्मी तुमच्या हातून पाप घडले. म्हणून तुमच्यावर अशी संकटे येत आहेत. आता नारायण नागबळी विधी केला की त्या पापाचे क्षालन होईल. मग कुठलेही संकट येणार नाहीत,’ हे पुजाऱ्याचे सांगणे या श्रद्धाळूंना कसे खरे वाटते ते त्यांचा देव जाणे!

– प्रा. य. ना. वालावलकर, पुणे</strong>