News Flash

Union Budget 2017: ‘इस मोडम् पर घबरा के न थम जाइए आप..’

जेटलींच्या भाषणामध्ये शेरोशायरीची पखरण; आठवलेंनीही सर्वाचे लक्ष वेधून घेतले

जेटलींच्या भाषणामध्ये शेरोशायरीची पखरण; आठवलेंनीही सर्वाचे लक्ष वेधून घेतले

इस मोडम् पर घबरा के न थम जाइए आप

जो बात नयी हैं उसे अपनाइए आप

डरते हैं नई राह पर क्यो चलने से

हम आगे आगे चलते हैं आ जाईए आप..

सलग चवथा अर्थसंकल्प मांडण्यासाठी उभे राहिलेल्या अरुण जेटलींचा मूड बुधवारी कदाचित वेगळाच असावा. माजी केंद्रीय मंत्री व केरळचे ज्येष्ठ खासदार ई. अहमद यांच्या निधनाने अर्थसंकल्प लांबणीवर टाकण्यावरून थोडा वाद चालू असतानाच जेटलींनी भाषण सुरू केले आणि काही मिनिटांतच नोटाबंदी आणि डिजिटायझेशनचा संदर्भ देऊन त्यांनी ‘इस मोडम् पे..’ची शायरी सुनावली. मुद्दाम निवडली असावी विरोधकांना डिवचण्यासाठी. सत्तारूढ मंडळींनी टाळ्या वाजवल्या, पण विरोधी बाकांनी काही प्रतिक्रिया दिली नाही. मग जेटली वाचत गेले.. यासाठी एवढी तरतूद, त्यासाठी एवढी रक्कम. अर्थसंकल्पाचा पहिला भाग नेहमीच कंटाळवाणा असतो. जेटलीही त्यास अपवाद नव्हते. पण त्या ओघात दलितांच्या विकासासाठी ५२,३९३ कोटींची म्हणजे मागील वर्षांच्या तुलनेत थेट ३५ टक्क्यांनी वाढ केल्याचे ऐकताच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले एकदम उत्तेजित झाले आणि उठून काँग्रेसच्या मंडळींकडे, विशेषत: मल्लिकार्जुन खरगेंकडे इशारे करीत म्हणाले, ‘सुनो सुनो काँग्रेसवालों..’ नंतर क्षणभर थांबले आणि एकदम त्यांची ‘फेमस’ काव्यप्रतिभा उफाळून आली.

इधर ना आना है,

तो मत आईये आप,

नरेंद्र मोदी है,

देश के विकास का बाप..

सत्तारूढ मंडळींनी तर कडकडाटच केला. सगळे सभागृह हास्यकल्लोळात बुडाले होते. गृहमंत्री राजनाथ सिंहांच्या चेहऱ्यावरही हास्य उमटले. त्यांनी शेजारी बसलेल्या मोदींकडे पाहिले, पण कोणतीच प्रतिक्रिया मिळाली नाही.. स्वत: जेटलींनी आठवलेंकडे एक हसरा कटाक्ष टाकला आणि पुन्हा वाचायला सुरुवात केली. थोडय़ाच वेळात जेटलींनी सव्वा कोटींनी डाऊनलोड केलेल्या ‘भीम अ‍ॅप’चा उल्लेख केल्यानंतरही आठवले पुन्हा उत्तेजित झाले. शेजारी बसलेले त्यांचे कॅबिनेट मंत्री थावरचंद गेहलोत त्यांना किंचितसा अडविण्याचा प्रयत्न करीत होते. पण या वेळी खरगे काही गप्प बसले नाहीत. त्यांच्यातीलही काव्यप्रतिभा एकाएकी बहरली आणि आठवलेंच्या बोचकाऱ्यांचा हिशेब चुकता करीत म्हणाले,

आप तो इधर के थे

उधर कैसे गये,

एक ना एक दिन

तुम्हे फिर इधर आना है..

आता बाके विरोधकांची दणाणली. सभागृहातील एवढी हालचाल वगळल्यास शांतता होती. जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या संगणकीकरणासाठी १९०० कोटींच्या तरतुदीचा उल्लेख करताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे काही तरी म्हणत होत्या. कदाचित त्यांचा रोख जिल्हा बँकांवर घातलेल्या र्निबधांकडे असावा. आंध्र प्रदेशच्या नव्या राजधानीला सवलती जाहीर केल्यानंतर तेलुगू देशमचे खासदार उत्साहित झाले, तर शेतकऱ्यांचा पतपुरवठा वाढविल्याचे सांगताच कर्नाटकातील काँग्रेसचे खासदार ‘दुष्काळावर बोला’ असे म्हणत होते.

पण सभागृहात खरी जान आली ती ‘आता कर प्रस्ताव..’ असे जेटलींनी म्हणताच. सर्वानी कान टवकारलेले होते. सव्वा कोटी मोटारी विकणाऱ्या आणि परदेशांत सहलीला जाणारे दोन कोटी पर्यटक असलेल्या देशात पाच लाखांहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांची संख्या फक्त ७६ लाख असल्याची माहिती त्यांनी देताच सभागृह अवाक् झाले. असेच आश्चर्याचे उद्गार पडले ते नोटाबंदीनंतर सुमारे १.४८ लाख बँक खात्यांमध्ये सरासरी ३.३१ कोटी रुपये भरल्याचे गुपित त्यांनी उघड केल्यानंतर. स्वाभाविक गाडी नोटाबंदीच्या निर्णयावर आणि त्याच्या पडसादांवर आली. काळ्या पैशांविरुद्ध लढण्याचा आमचा निर्धार पक्का असल्याने काळ्या पैशालाही आपला रंग बदलणे भाग पडल्याचे सांगताना जेटली पुन्हा शायरीकडे वळले..

नई दुनिया है, नया दौर है, नई है उमंग

कुछ थे पहले के तरीके, तो कुछ है आज के ढंग

रोशनी आके अंधेरों से जो टकरायी है,

काले धन को भी बदलना पडम, आज अपना रंग

एकीकडे प्राप्तिकर कमी केला आणि दुसरीकडे नवा कर किंवा करवाढ न केल्याने भाजपकडून सारखीच बाके वाजविली जात होती. भाषण संपवितानाही जेटली इंग्रजीतील एक पल्लेदार वाक्य उद्गारले..

व्हेन माय अेम इज राइट, व्हेन माय गोल इज इन साइट,

द विंड्स फेव्हर मी.. अ‍ॅण्ड आय फ्लाय

भाषण संपताच जेटलींभोवती गराडाच पडला. सर्वात अगोदर पोचले ते व्यंकय्या नायडू. त्यांनी जेटलींचा हात बराच वेळ धरून ठेवला. मग मोदींनीही हस्तांदोलन केले. लगेचच मोदींभोवतीही गराडा पडला. त्यात आठवले होते. मघाशी चेहऱ्यावरची रेषा हलू न देणाऱ्या मोदींनी आठवलेंना हसत हसत प्रतिसाद दिला आणि म्हणाले, ‘दलितांसाठी खूप मोठी तरतूद केलीय. आता जनतेपर्यंत ही माहिती पोचवा..’ आठवलेंनी मान डोलाविली. मग मोदीही निघाले. जाता जाता त्यांनी अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना शाबासकी दिली. त्यानंतरही ‘मॅन ऑफ दि मोमेंट’ असलेले जेटली बराच काळ सभागृहात रेंगाळले होते..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 12:05 am

Web Title: union budget 2017 arun jaitley 7
Next Stories
1 Union Budget 2017: प्राप्तिकर सवलत फेरफार किरकोळच!
2 Union Budget 2017: स्मार्टफोनच्या किमती वधारणार
3 Union Budget 2017: डिजीटल इंडियासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद
Just Now!
X