केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. अरुण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे देशातील रोजगाराच्या संधी वाढतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली बुधवारी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली. मोदी म्हणाले, अर्थसंकल्पासाठी जेटली आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन करतो. प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या अंर्थसंकल्पात ठोस पावले उचलण्यात आली आहेत असे मोदींनी सांगितले. जेटलींनी उत्तम बजेट सादर केले असून या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना बळ मिळाल्याचे मोदी म्हणालेत. रेल्वे अर्थसंकल्पाचा सर्वसाधारण अर्थसंकल्पात समावेश झाल्याने परिवहन क्षेत्राचा विकास होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

शेतक-यांच्या उत्पन्नात दुप्पटीने वाढ व्हावी असा केंद्र सरकारचा प्रयत्न असून अर्थसंकल्पात सर्वाधिक भर शेतकरी, गाव, गरीब, पीडित, शोषित यांच्यावर दिल्याचे मोदींनी सांगितले. रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वे सुरक्षा निधीवर लक्षकेंद्रीत केल्याचे मोदींनी नमूद केले आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला हद्दपार करण्यासाठी असलेली सरकारची कटिबद्धता अर्थसंकल्पातून दिसून येते असे त्यांनी सांगितले.  या अर्थसंकल्पातून देशात बदल घडतील असा दावाही त्यांनी केला. देशातील लघुउद्योजकांना जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत उतरणे शक्य होणार असल्याचे मोदी म्हणालेत.

दरम्यान, अर्थसंकल्पात जेटलींनी सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत तीन लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कर लागणार नाही अशी घोषणा केली आहे. याशिवाय तीन लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना आता कर लागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.