रेल्वेचे ऑनलाइन तिकिट बूक करणा-या रेल्वे प्रवाशांना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भेट दिली आहे. आयआरसीटीसी या वेबसाईटवरुन रेल्वे आरक्षणाची नोंदणी करणा-या प्रवाशांना आता तिकिट बुकींगवर सेवा कर आकारणार नाही असे त्यांनी सांगितले.

सध्या आयआरसीटीसी या वेबसाईटद्वारे तिकिट बूक करणा-या प्रवाशांना स्लीपर कोचसाठी २० रुपये तर एसी कोचसाठी ४० रुपये आकारले जात होते. तिकिट रद्द करणा-यांनाही सेवा कर आकारला जायचा. मात्र एक्सप्रेस रद्द झाल्यास प्रवाशांना सेवा कर म्हणून आकारलेली रक्कमही परत दिली जायची. आता या पुढे ऑनलाइन तिकिट बूक करणा-यांना सेवा कर आकारणार नाही असे जेटलींनी जाहीर केले आहे.
नोव्हेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयानंतर नरेंद्र मोदींनी लेस कॅश अर्थव्यवस्थेचा नारा दिला होता. या पार्श्वभूमीवर जेटलींनी ई तिकिटांवरील सेवा कर आकारणे बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आयआरसीटीसी या वेबसाईटवरुन दररोज १३ लाख तिकिटांची बुकिंग करणे शक्य होते. सध्या या वेबसाईटवरुन मिनिटाला १५ तिकिट बूक करता येतात. एकाच वेळी ३ लाख युजर्स या वेबसाईटवर भेट देऊ शकतात. २०१४ – १५ मध्ये आयआरसीटीसीवरुन १८. ३ कोटी तिकिट बूक झाले होते.

२०१९ पर्यंत देशातील सर्व एक्सप्रेस गाड्यांमध्ये बायो टॉयलेट सुरु केले जातील अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. आगामी पाच वर्षांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे सुरक्षा निधीअंतर्गत आगामी पाच वर्षात १ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय पर्यटन आणि यात्रेच्या एक्सप्रेस गाड्या सुरु करणार असे त्यांनी सांगितले. नवीन मेट्रो रेल धोरण तयार झाले असून यामुळे तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याचे जेटली यांनी सांगितले.