Union Budget 2017: आयआरसीटीसी शेअर बाजारात येणार

नफ्यात असलेल्या पायाभूत कंपन्यामध्ये निर्गुंतवणूक करण्याची तयारी

Share Market , Capital market, LIC loses 7000 cr , Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
संग्रहित प्रातिनिधीक छायाचित्र

दहा टक्के सकल राष्ट्रीय उत्पन्नाचे लक्ष्य गाठण्यासाठी केंद्र सरकारने इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रासाठी अनेक नवीन घोषणा केल्या आहे. रेल्वे, रस्ते, हवाई मार्ग आणि जल मार्गाच्या विकासावर सरकारचा भर आहे. पण या अर्थसंकल्पामधील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जेटली यांनी तीन कंपन्यांना शेअर बाजारमध्ये उतरणार असल्याची घोषणा केली आहे. आयआरसीटीसी, इर्कोन आणि आयआरएफसी या तीन कंपन्या शेअर बाजारात उतरणार आहेत.

रेल्वेच्या नफ्यात असलेल्या पायाभूत कंपन्यामध्ये निर्गुंतवणूक करण्याची केंद्र सरकारची योजना असल्याची चर्चा होती. या कंपन्या अजूनही बाजारात सूचिबद्ध झाल्या नव्हत्या. या कंपन्यांना शेअर बाजारात आणायची तयारी आता सरकारने केली आहे. या कंपन्यांचे आयपीओ लवकरच शेअर बाजारात आणले जातील असे अरुण जेटली यांनी जाहीर केले आहे. या माध्यमातून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

आयआरसीटीसी म्हणजेच इंडियन रेल्वे कॅटरींग आणि टुरिझम कॉर्पोरेशन ही रेल्वेसाठी महत्त्वाची कंपनी आहे. रेल्वेमधील सुविधांचा विकास आणि विस्तारावर केंद्र सरकारने भर दिला आहे. भारतातील वाढती लोकसंख्या, शहरीकरण पाहता या कंपन्यांमधील गुंतवणूक फायदेशीर ठरु शकते. चीनने सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा १० टक्क्यांपर्यंत गाठण्यासाठी रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती.
इर्कोन ही कंपनी भारत सरकारची बांधकाम कंपनी आहे. या कंपनीमार्फत देशात विमानतळ, रेल्वे रुळ, महामार्ग, ओव्हरब्रिज आणि स्थानकांचे बांधकाम केले जाते. आयआरएफसी म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्शिअल कॉर्पोरेशन ही कंपनी भारतीय रेल्वेला आर्थिक पुरवठा करते. रेल्वेतील पायाभूत सुविधांचा विकास करण्यात या कंपनीचे महत्त्वाचे योगदान असते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Union budget 2017 ipo for public sector undertakings like irctc irfc and ircon