केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणारा ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनांना योग्य हमी भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात घेण्यात आला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

२०२२ देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल अशीही घोषणा अरूण जेटली यांनी केली. या घोषणेचेही कौतुक देवेंद्र फडणवीस यांनी केले. शेती आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी अर्थसंकल्पात १४.३४ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ‘नवभारत निर्माणा’च्या दृष्टीने टाकलेले हे पाऊल आहे असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

देशातल्या ५० कोटी लोकांना ५ लाखापर्यंतचा इलाज हा मोफत मिळणार आहे. आरोग्यसेवेबाबत घेण्यात आलेला हा सर्वात मोठा निर्णय आहे. आत्तापर्यंत जगातल्या एकाही देशाने आरोग्य योजनेसाठी एवढ्या मोठ्या रकमेची तरतूद केलेली नव्हती असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाचेही कौतुक केले आहे.

गरीब आणि मध्यमवर्गीयांना या योजनेचा फायदा होणार आहे. तसेच मुद्रा योजना ही देशातली आणि जगातली रोजगार देणारी सगळ्यात मोठी योजना ठरली आहे. १० कोटी लोकांना या योजनेच्या माध्यमातून रोजगार मिळाला आहे. या १० कोटी लोकांमध्ये ७ कोटी महिला आहेत. पुढच्या टप्प्यासाठी ३ लाख कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळातही रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

‘देशातील प्रत्येक नागरिकाला घर’ ही संकल्पना या सरकारने मांडली आहे. बजेटमध्ये घेण्यात आलेले हे मोठे निर्णय आहेत. शेती, आरोग्य आणि रोजगार यासंदर्भात ऐतिहासिक निर्णय घेऊन केंद्र सरकारने सगळ्यांनाच दिलासा दिला आहे असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.